
Solapur News,21 Apr 2025: महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोण ओळखतंय?’ अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अधूनमधून टीका होते. राज्यात सध्या ‘पॉवरफुल्ल’ असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर सपकाळ यांच्या राज्यस्तरीय ओळखीबाबत आणि क्षमतेवरच फडणवीस समर्थक थेट बोट ठेवतात.
आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणात काम करत असतानाच प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलाच्या माध्यमातून स्थानिक काँग्रेसला नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. साधारणतः एक ते दीड महिन्यात काँग्रेसचे नवीन स्थानिक चेहरे जाहीर होतील, अशी शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा लढा सध्या दोन पातळीवर सुरू आहे. सत्ताधारी महायुतीसोबतचा एक राजकीय लढा आणि स्वपक्षातील नाराज व ‘कोण हर्षवर्धन सपकाळ?’ असा प्रश्न विचारणाऱ्या प्रस्थापित वर्गाबरोबर दुसरा लढा ते देत आहेत. काँग्रेसला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा लढा सध्या दोन पातळीवर सुरू आहे. सत्ताधारी महायुतीसोबतचा एक राजकीय लढा आणि स्वपक्षातील नाराज व ‘कोण हर्षवर्धन सपकाळ?’ असा प्रश्न विचारणाऱ्या प्रस्थापित वर्गासोबतचा दुसरा लढा ते लढत आहेत. काँग्रेसला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रक्रियेचा भाग म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक एप्रिल अखेरपर्यंत राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाऊन जनमतांचा अंदाज आणि कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेणार आहेत. निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्षसंघटनेत बदल करण्यात येणार आहेत. फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. रिक्त पदावर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच जिथे आवश्यक आहे तिथे नवीन चेहऱ्यांना जबाबदारी दिली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात अव्वल क्रमांक मिळवणारा काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकाकी पडताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील बेबनाव, प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या नावांना सोडून अचानक हर्षवर्धन सपकाळ यांची झालेली नियुक्ती, यामुळे राज्यातील काँग्रेसचे वातावरण अजूनही स्थिर होताना दिसत नाही.
जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष निवडीच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा एकदा चर्चेत येण्याची मोठी संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील होणारे हे संघटनात्मक बदल अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरू शकतात. नवीन पदाधिकाऱ्यांसाठी त्या त्या भागातील जुन्याच प्रस्थापित नेत्यांची शिफारस घेणार,की प्रदेशाध्यक्ष निवडीचाआश्चर्याचा धक्का जिल्हाध्यक्ष निवडीतही दिसणार, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची ठिकठिकाणी पडझड होताना दिसत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सध्या सुरू आहे. तब्बल १५०० कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेली ही बाजार समिती सोलापूर शहर व परिसराच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकते. बाजार समितीच्या राजकारणात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने व काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याकडे निर्णयाची ताकद आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास माने व हसापुरे इच्छुक होते. उमेदवारांच्या यादीत माने यांचे नाव आले. परंतु सोलापुरात असलेला ‘बी. फॉर्म’ माने यांना मिळू दिला नाही, यावेळी आमदारकीची चांगली संधी असताना हुकल्याने माजी आमदार माने नाराज आहेत.
सोलापुरातील काँग्रेसचे दोन महत्त्वाचे नेते माने व हसापुरे हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या जवळ गेल्याचे दिसते. बाजार समिती निवडणुकीसाठी काँग्रेसची भूमिका काय? याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे मौन राखून आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतील शिंदे पिता-कन्येने राखलेले मौन काँग्रेससाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली. महाराष्ट्राला फारसे माहिती नसलेल्या सपकाळ यांना महाराष्ट्रातील काँग्रेस व काँग्रेसचा मूळ विचार चांगलाचाच ठाऊक आहे. त्याच विचारावर महाराष्ट्रातील काँग्रेसला स्थिर करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील मराठा विरुद्ध वंजारी हा जातीचा संघर्ष असो, की नागपूर दंगलीच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होण्याचा बाका प्रसंग आला असतानाही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सद्भावना यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे अस्तित्व दाखवून दिले.
महाराष्ट्रातील जातीय व धार्मिक वातावरण बिघडत असताना काँग्रेसने सद्भावना यात्रेतून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे. काँग्रेसमधील ‘केडर’ पुन्हा एकदा विचाराने जिवंत होत असल्याचे दिसू लागले आहे. दोन महिन्यांच्या कारकिर्दीत सपकाळ यांनी कोकण, नाशिकसह राज्यातील १५ जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. येत्या काळात हे दौरे आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोबत ‘ना पैसा, ना ग्लॅमर’ तरीही पक्ष वाढीसाठी प्रदेशाध्यक्षांची तळमळ आणि धडपड वाखाणण्याजोगी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.