Arjun Dangle: दिवस आंदोलन, चळवळीचे! कम्युनिस्ट होणे म्हणजे बरबाद होणे असे समजले जायचे....

Maharashtra Dalit Movement Arjun Dangle Analysis: माझ्या वडिलांचे काही मित्र होते. त्यांनी वडिलांचे कान भरले, ‘बंधू, तुमची मुलं बिघडतील, लक्ष ठेवा.’ वडिलांनी खोली विकली आणि या मित्रांच्या साह्याने चेंबूरला प्रगती सोसायटीत घर घेतले.
Maharashtra Dalit Movement
Maharashtra Dalit MovementSarkarnama
Published on
Updated on

अर्जुन डांगळे

गेल्या काही वर्षांत म्हणजे साधारणतः नव्वदीच्या उतरणीनंतर एकूणच महाराष्ट्रातील चळवळीचे स्वरूप बदललेले दिसते. याचा अर्थ चळवळी संपल्या असे नाही, तर त्याची शैली बदललेली आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात चळवळीचे मोहोळ उठले होते. मुंबईत धारावीच्या माटुंगा लेबर कॅम्पात मी जन्मलो. आंबेडकरी-कम्युनिस्ट या दोन्ही चळवळींच्या संस्कारात मी वाढलो. कुमारवयात मी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा झंझावात अनुभवला आहे. या सगळ्यातून माझी मानसिक वैचारिक जडणघडण सांधली गेली.

माझा मोर्चातला पहिला सहभाग मी तेरा चौदा वर्षांचा असतानाचा आहे. १९५८ मध्ये देशातील पहिले केरळमधील कम्युनिस्ट सरकार बरखास्त केले. त्यावेळी अजय घोष यांची शिवाजी पार्कवर निषेध सभा होती. त्यात आम्ही लाल झेंडे हातात घेऊन केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत पोहोचलो होतो. याच लेबर कॅम्पात त्यावेळी चोखा गांगुर्डे नावाच्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याचा काँग्रेसच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खून केला होता.

‘बंधू, तुमची मुलं बिघडतील, लक्ष ठेवा.’

आम्ही त्या दिवशी शाळेच्या बाहेर येऊन शाळेवर चार-दोन दगड मारायचो आणि ‘हरताळ- हरताळ’ असे ओरडायचो. शाळा म्युनिसिपाल्टीच्या आणि शिक्षक, शिपाई हे दलित समाजातलेच. त्या काळात कृष्ण मेनन लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे उभे होते. कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता. आम्ही मुले निवडणूक कार्यालय, मंडपात बसून मतदाराची कार्ड लिहिणे, भिंती रंगविणे वगैरे कामे करायचो. माझा मोठा भाऊ विनायकही असायचा. त्यावेळी कम्युनिस्ट होणे म्हणजे बरबाद होणे असे समजले जायचे. माझ्या वडिलांचे काही मित्र होते. त्यांनी वडिलांचे कान भरले, ‘बंधू, तुमची मुलं बिघडतील, लक्ष ठेवा.’ वडिलांनी खोली विकली आणि या मित्रांच्या साह्याने चेंबूरला प्रगती सोसायटीत घर घेतले.

चेंबूरला आलो तेव्ही मी बीपीटी स्टोअर्सला नोकरी करत होतो अन् परळच्या दयानंद कॉलेजमध्ये मॉर्निंग कॉलेजमध्ये होतो. पुढाऱ्यांच्या सभा असल्या की मोर्चे, निदर्शने, भाषणे करायची असा आमचा कार्यक्रम असे पण प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यानी आमच्यापैकी अनेकांना त्यांच्यात सामावून घेतले आणि चळवळ संपुष्टात आणली. साधारणतः हा १९६५-६६ चा काळ होता. त्यावेळी महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा ही आंबेडकरी विचारांची संस्था होती. मी तिथेही सक्रीय झालो होतो.

महाराष्ट्रभर ‘छावण्या’ उभ्या राहिल्या...

पुढे सत्तरीच्या दशकात दलित साहित्य चळवळीला गती मिळाली होती.अनियतकालिकाच्या चळवळीतले डाव्या पुरोगामी चळवळीतील आणि आंबेडकरी चळवळीतले कलावंत तरुण मराठी कवी वडाळ्याच्या सिद्धार्थ वसतिगृहात राहायचे. आम्ही तिथे जमायचो. दरम्यान इंदापूर तालुक्यातील बावडा येथील बौद्धांच्या विरुद्धचे सामाजिक बहिष्कार प्रकरण घडले. राजा ढाले आणि मी पुढाकार घेत वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन युवक आघाडी नावाची संघटना स्थापन केली. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर धरणे, बावडा येथे प्रत्यक्ष भेट असे कार्यक्रम केले आणि हा प्रश्न धसास लावला.

१९७२ मध्ये उभ्या राहिलेल्या ‘दलित पँथर’चा काळ हा तर आंदोलनाचाच काळ होता. दलित पँथरचे पहिले पर्व दोन-अडीच वर्षांचे असले तरी आंदोलन, मोर्चे, निदर्शने, सभा, बैठक, प्रसिद्धी पत्रक याच्याशिवाय दिवस जात नव्हता. त्या काळी जे काही नेते किंवा कारभारी होते, त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी दौरे न करता महाराष्ट्रभर ‘छावण्या’ उभ्या राहिल्या. छावणी हे पर्यायी नाव शाखा-वॉर्डाला मी दिले होते.

Maharashtra Dalit Movement
Maratha Reservation: 'हैदराबाद गॅझेट'ची अंमलबजावणी सुरु असतानाच मराठा समाजातील 70 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

या उद्रेकातून निघालेला पहिला मोर्चा १४ ऑगस्ट १९७२ रोजी दलित पँथर, युवक क्रांती दल, युवक आघाडी यांचा आझाद मैदान ते जुने विद्याभवन असा संमिश्र मोर्चा निघाला होता. मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात मी, राजा ढाले, हुसेन दलवाई, रेखा नाईक व रेखा ठाकूर हे होतो. पॅंथरचा दुसरा मोर्चा म्हणजे ‘साधना’तील राजा ढालेच्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखाच्या आणि ‘साधना’च्या समर्थनार्थ पुण्याच्या कौन्सिल हॉलवर काढलेला मोर्चा होय. रात्री नामदेव ढसाळला अटक झाली. दलित पँथर आंदोलनातील ही पहिली अटक होय. बाबा आढाव जामीन राहिले होते.

पोलिसांनी मोर्चा उधळला..

दलित पँथरच्या चळवळीतला महत्त्वाचा मोर्चा म्हणजे १० जानेवारी १९७४ रोजी नायगाव येथून निघालेला मोर्चा. राजा ढालेची सुटका करावी, पोलिसी अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा होता. वातावरण अतिशय तंग होते. कोणत्याही क्षणी भडका उडले अशी परिस्थिती होती. या मोर्चाचे संयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. नामदेव, ज. वि, भाई, आणि अवि यांच्यावर अटक वॉरंट होते. माझ्यावर नव्हते. मोर्चा पोलिसांनी योजनाबद्ध उधळला. याच मोर्चात पँथर भागवत जाधवचा इमारतीच्या वरून डोक्यात पाटा टाकून बळी घेण्यात आला होता.

Maharashtra Dalit Movement
Maratha Reservation: जरांगेंसोबतच्या तहात फडणवीसांची सरशी; ‘टायमिंग’ साधलं

बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेली आंदोलने ही देखील लक्षणीय होती. एक मार्च ते ८ मार्च रोजी ‘सम्यक समाज आंदोलन’ या संघटनेच्या वतीने नाशिक ते मुंबई असा पायी इशारा मोर्चा आयोजित केला होता. दलित शोषित भूमिहिनांचे प्रश्न होतेच पण नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला रिपब्लिकन पक्षाची पूर्वबांधणी करायची आहे, या हेतूने केलेले हे जनजागरण होते. साखरसम्राटांच्या महाराष्ट्रातील राजकीय वर्चस्वाला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने माणगाव (कोल्हापूर) ते पुणे असा दहा दिवसांचा मार्च काढण्यात आला होता. पश्चिम महाराष्ट्रातून या मार्चचा प्रवास करणे हे धाडसाचे काम होते.

बाळासाहेबांनी डाव्या पुरोगामी पक्षासोबत केलेल्या आघाडीमुळे तिसऱ्या आघाडीला बळ मिळाले होते. या तिसऱ्या आघाडीच्या वतीने अनेक महाराष्ट्रव्यापी आंदोलने करण्यात आली. मुंबईत जी जातीय दंगल झाली होती त्या संदर्भातील श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात आली.

आंबेडकर भवन पाडण्याचे जे षड् यंत्र

मुंबई बंदची घोषणा दिली आणि यशस्वी केली. भूमिहीन हक्क संरक्षण समितीच्या वतीने पहिल्या गायरान जमिनीसाठी महाराष्ट्रव्यापी विराट सत्याग्रहाचे आयोजन केले गेले. झोपडपट्टीवासीयांसाठी आंदोलने मोर्चे तर होतेच. मंडल आयोग बौद्धाच्या सवलतीसाठी आंदोलने-मोर्चे तर होतेच. पण नागपूरला भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी मोर्चा काढला गेला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले ‘रिडल्स’चे आंदोलन तर ऐतिहासिकच ठरले.

नंतरच्या काळात माझा सहभाग असलेले आंदोलन म्हणजे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले दादर येथील आंबेडकर भवन पाडण्याचे जे षड् यंत्र काही मंडळींनी केले. त्याविरुद्धचे निखिल वागळेशी बोलून यासंदर्भातील कार्यक्रम ज्यात मी सहभागी होतो. त्यानंतर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली होती.

लेखक कार्यकर्ता म्हणूनही आंदोलने केली आहेत. निखिल वागळेच्या ‘महानगर’वर शिवसैनिकांनी हल्ला केला तेव्हा आम्ही शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. विजय तेंडुलकर, दया पवार आदी उपस्थित होते. दाऊदी बोहरा समाजाचे कार्यकर्ते असगर अली इंजिनियर यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करीत होते, तेव्हा आम्ही डावी, पुरोगामी, आंबेडकरवादी लेखक मंडळ त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. इतकेच काय आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचे समर्थनही केले. खूप गोष्टी आहेत इथेच थांबतो.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com