
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही राज्यातील सर्व पक्षांसाठी ताकद आजमावण्यासाठीचा अंतिम सामना असणार आहे. मात्र त्यापैकी दोन्ही शिवसेनेसाठी तर ही ‘करो या मरो’ची लढाई असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये कोण बाजी मारणार याविषयीची उत्सुकता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागच्या निवडणुकीच्या वर्षाप्रमाणे २०२५ हे वर्ष देखील राज्यासाठी निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे. आगामी पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतर गणेशोत्सवासोबतच निवडणुकांचे नगारे वाजू लागतील आणि दिवाळीपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचे बार उडतील.
तीन ते चार वर्षानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अर्थ वेगळे आहेत. राज्यात प्रथमच महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला पाहिजे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक ही राज्यातील सर्व पक्षांसाठी ताकद आजमावण्यासाठीचा अंतिम सामना असणार आहे. मात्र त्यापैकी दोन्ही शिवसेनेसाठी तर ही ‘करो या मरो’ची लढाई असणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मतदारांची सहानुभूती असताना देखील प्रत्यक्षात विधानसभा निवडणूक निकालात शिंदेच्या शिवसेना पक्षाने बाजी मारलेली आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये कोण बाजी मारणार याविषयीची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या ६० जागा या नेतृत्वाचा विश्वास दुणावणाऱ्याच आहेत. तर महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या २० जागा या अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा वेध घेण्याची आवश्यकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ महापालिकांपैकी मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या महापालिका ताब्यात असणे महत्वाचे मानले जाते. त्यापैकी दोन्ही शिवसेनेचा जीव हा मुंबई आणि ठाणे महापालिकांत अडकला आहे. शिवसेना शिंदे पक्षाला ठाण्यामध्ये ठाकरेंपेक्षाही भाजपचे आव्हान अधिक असणार आहे. मात्र तरीही ठाणे शिंदेंसाठी अजूनतरी आवाक्यात आहे.
शिंदेंचा कस मुंबई महापालिकेत लागणार आहे. अखंड शिवसेना असताना ठाणे महापालिका एकनाथ शिंदे एकहाती सांभाळत असत. परंतु मुंबई महापालिकेच्या राजकारणात त्यांचा फार हस्तक्षेप नसे. निवडणुकीत ‘रसद’ पुरविण्यासाठी शिंदेंची मदत होत असे. पण मागच्या तीन वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे.
एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मुंबई शहराचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवले आहे. मागच्या युतीच्या सरकारमध्ये शिंदेंनी पालकमंत्रीपद दीपक केसरकरांना दिले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईचे पालकमंत्रिपद शिंदेंनी स्वत:कडे ठेवत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पायाभरणी सुरु केली आहे.
जिल्हा नियोजन व विकास निधीच्या माध्यमातून शिंदेंनी ‘टार्गेट’ ठेवून कामे सुरु केली आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिंदेंना मानणारा कमी प्रमाणात का होईना वर्ग तयार झाला आहे आणि शिंदेंकडे स्वत:हून संपर्क करण्याची, रस्त्यावर उतरुन काम करण्याची स्वत:ची स्टाईल असल्याने नवीन माणसे त्यांच्याकडे जोडली जात आहेत.
शिवसेना शिंदे पक्षामध्ये दरदिवशी पक्षप्रवेश सुरु आहेत. ठाकरेंची शिवसेना असतानाही मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे पक्षाकडे रीघ का लागली आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. आज घडीला शिवसेना ठाकरे पक्षातून शिवसेना शिंदे पक्षाकडे मुंबईतील आजीमाजी ६० पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेंच्या छावणीत रुजू झाले आहेत.
मावळत्या महापालिकेतील ६० पेक्षा अधिक नगरसेवक तरी यावेत, असे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न आहेत. त्यापूर्वीच्या माजी नगरसेवकांसाठी देखील शिंदेंची दारे उघडी आहेत. शिंदेंची भाजपसोबत युती होणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना साथ देईल का? या प्रश्नांची उत्तरे काळच देणार असलातरी आपल्याला कोणी ‘हलक्यात’ घेऊ नये इतके कार्यकर्ते आपल्या जवळ असावेत यावर एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक काम करत आहेत. या बळाचा वापर शिवसेना ठाकरे पक्षावरच नव्हे तर भाजपवर देखील वेळ पडल्यावर त्यांना करता येणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.