Maharashtra Politics : महायुती, महाआघाडीत अंतर्गत संघर्ष विकोपाला; निवडणुकीत 'मतदार राजा' मात्र दुर्लक्षित

Voter Ignored : राज्यात काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत असताना अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीत एकवाक्यता झाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या मतदारांच्या जिवावर सर्वच राजकीय पक्ष निवडणूक लढवित आहेत. ते मतदार मात्र या दुर्लक्षित आहेत.
Political situation of Maharashtra
Political situation of MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : नेत्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षा आणि आम्ही कसे पक्षाचे एकनिष्ठ हे दाखविण्याच्या स्पर्धेत महायुती आणि महाविकास आघाडीत राज्यातील जागांचा अंतिम निर्णय झाला नाही. या सर्व घडामोडीत दोन्ही आघाड्यांचे मतदारांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत मतदार महायुती आणि महाविकास आघाडीला धडा तर शिकविणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते. जागावाटप सुरू आहे, चर्चा सुरू आहे, येत्या दोन दिवसांत घोषित करू, आमच्यात काही मतभेद नाही, जागावाटप अंतिम टप्प्यात, आज सर्व जागावाटप जाहीर करू या सर्व पोकळ चर्चांना महाराष्ट्रातील मतदार कंटाळला आहे. त्यामुळे आता थेट मतदानाच्या दिवशी या नेत्यांना धडा शिकविण्याची तयारी मतदारांनी सुरू केली आहे. निवडणुकीत मतदार हा राजा असताना त्याच्याकडे फोकस नाही. तो फोकस नेत्यांकडे वळला असून, तूर्तास मतदार राजा नेते येतील आणि आम्हाला वचन देतील अशा याचकाच्या अवस्थेत आहे. नेत्यांवरचा सर्वाधिक फोकस मतदारांना जास्त रुचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा दुर्लक्षित मतदार या निवडणुकीत कोणाला मतदान करणार हे पाहण्यासारखे असेल.

महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात म्हणता म्हणता भाजपने काही जागांची घोषणा केली. आणि दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीला गृहीत धरले. शिवसेनेच्या 13 खासदारांपैकी तिघांचे तिकीट कापवे लागणार, असा इशारा महाशक्तीने दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे खासदार अस्वस्थ आहे. त्यांच्यापैकी नेमके कोणाचे तिकीट कापले जाणार हे निश्चित नाही. ज्यांचे कापले जाणार त्यांच्या पुनर्वसन प्लॅन भाजपने सादर केला नाही. त्यामुळे भाजपच्या एकाधिकारशाही समोर शिवसेनेचे नेते गप्प गुमान पदरात जे पडते ते घेण्याच्या मनस्थितीत आहेत. अशीच काय ती परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यांना चार ते सहा जागांवर घड्याळ चिन्हांवर उमेदवार उभे करता येतील. त्यात राष्ट्रवादीला स्वपक्षीय जुन्या नेत्यांसोबत संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष लोकसभा निवडणुकीत करावा लागू नये, यासाठीच भाजपने राष्ट्रवादी फोडली होती काय ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो. ज्या ठिकाणी विजयाची शक्यता नव्हती, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघात आपसात निवडणूक लढविण्यात भाजप तरबेज आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पथ्यावर पडली आणि शिवसेनेचे थेट खासदारच भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपने मोठा भाऊ असे मिरविणे सुरू केले आहे. हे सर्व करताना भाजप त्यांच्यासाठी सोयीच्या सर्व जागा स्वतःच्या ताब्यात ठेवल्या. शिवसेनेच्या काही जागांवर दावा करत त्या ही भाजप हस्तगत करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Political situation of Maharashtra
Aaditya Thackeray News : चहल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात; आदित्य ठाकरे म्हणतात, "मर्जीतल्या कंत्राटदारांना..."

डबल इंजिन सरकार, मोदींची गॅरंटी, 400 पार च नारा, विधानसभा निवडणुकीचे चाॅकलेट, राज्यात पुन्हा सरकार आले तर मंत्री पद, एखादे दुसरे केंद्रात मंत्री पद, अशी अनेक प्रलोभने भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाला अगदी सहज वाटत फिरत आहे. त्यातून राज्यातील काही मतदारसंघावर भाजपने भक्कम दावा केला आहे. विशेषतः शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांना यातून डच्चू दिला जाणार आहे. तिकीट कापल्यानंतर हे खासदार चूप बसले तर ठीक नाही तर, त्यांच्या जुन्या बंद फाइल्स केव्हाही खुल्या करण्याचे जुनेच तंत्र सत्तापक्षाला आत्मसाद आहे. त्यामुळे महायुतीच्या कितीही नेत्यांनी विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांनी ओरड केली तरी, भाजपला हवा असलेला लोकसभेचा मतदारसंघ ते घेतील. त्यात कुठे ही सामंजस्य राहणार नाही. त्यात मनसेला एक - दोन जागा देण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे दुसऱ्याच्या जागा तिसऱ्याने मोठे मन करत दान देण्याचा उद्योग असल्याची चर्चा महायुतीत आहे. महायुतीत सामंजस्य असते तर आतापर्यंत राज्यातील जागावाटप झाले असते आणि मतदारांकडे महायुतीच्या नेत्यांनी लक्ष दिले असते. पण, केवळ मतदारांना गृहीत धरत महायुतीचे नेते जागावाटपाचा तिढा अंतिम क्षणापर्यंत कायम ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहे. यातून ज्या खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे त्यांना अंतिम क्षणापर्यंत गाफील ठेवण्याचा उद्योग होत आहे.

Political situation of Maharashtra
Sharad Pawar News: मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांची टोलेबाजी; म्हणाले, माझं बोट धरून राजकारणात आले असते तर...

दुसरीकडे आमच्यात वाद नाही. तुम्ही सर्व जागा लढा आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, असे म्हणत काँग्रेसने शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपावरून जोरदार वाद आहे. यात वंचित नेत्यांनी महाविकास आघाडीला जेरीस आणले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महाविकासची आघाडी होण्याची सुतराम शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत या विभाजनाचा फायदा हा महायुतीला होण्याची चिन्हं आहेत. महाविकासच्या सोबत वंचित आल्यास मतांचे विभाजन टाळता येईल. पण, तसे होण्याची शक्यता आंबेडकर यांच्या अस्थिर स्वभावामुळे शक्य नाही.

महाविकासमध्ये फक्त वंचित नेत्यांची महत्त्वाकांक्षा आड येत नाही तर शिवसेना नेत्यांची महत्त्वाकांक्षा आणि स्वभाव आडकाठी आणत आहे. वंचितप्रमाणे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची स्थिती आहे. त्यांना राज्यात 23 जागा पाहिजे होत्या. पण, इतक्या जागा देण्यास काँग्रेस सकारात्मक नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, काँग्रेस नेत्यांनी शिवसेना नेत्यांना या पुढील चर्चा हायकमांड सोबत दिल्लीत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जागावाटप उद्याच जाहीर होणार, आमच्यात वाद नाही हे नाना पटोले यांच्या वक्तव्याने यंदा विक्रम मोडल्याचे चिन्हं आहे. सांगलीप्रमाणे इतर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही मतदारसंघात उमेदवारांसाठी घोषित करत बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील संघर्ष आता विकोपाला गेल्याचे चित्र आहे.

महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांचेदेखील मतदारांकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारराजा दुर्लक्षित ठेवत नेते मात्र चर्चा, बैठका आणि हाॅटेलमध्ये चैन करण्यात व्यस्त आहे. फाइव्ह स्टार हाॅटेलच्या बैठकामध्ये व्यस्त नेत्यांना राज्यातील लोकांच्या समस्या, मतदारांचे मुद्दे विस्मृतीत गेल्याचे चित्र आहे. अनेक मतदारसंघात सर्वच पक्षांचा दबदबा आहे. प्रत्येक ठिकाणी नेत्यांचा जिंकण्याचा भक्कम दावा आहे. निवडणुकीत जिंकण्याचे हे दावे - प्रतिदावे पाहता जिंकणाऱ्या उमेदवारांची फुगलेली संख्या लक्षात घेता राज्यातील लोकसभा मतदारसंघ कमी पडतात की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुद्द्यांच्या आधारावर लोकसभा निवडणूक न राहता केवळ राजकीय पक्ष, महायुती व महाविकास आघाडीत नेत्यांचे हेवेदावे यावर लोकसभा निवडणुकीचा महत्त्वाचा वेळ खर्च होत आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. असे असताना अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा बाहेर आला नाही. त्यांचे लोकसभा निवडणुकीतील वचननामे धूळखात पडले आहे. मतदारांना गृहीत धरण्याचा राज्यातील राजकीय नेत्यांचा प्रयत्न गंभीर आहे. केवळ जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू ठेवले जात आहे. लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात मतदारांना मुद्द्यांसाठी आश्वासनांसाठी वाट पाहावी लागत आहे. मतदारांना उमेदवारांच्या प्रतीक्षेत ठेवणे.

मतदारांना गृहीत धरत 'राज्यात फक्त आम्ही जिंकणार' असा अहंभाव नेत्यांमध्ये गेला तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. या पण, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात जिंकण्यासाठी मतदार हा महत्त्वाचा आणि एकमेव मुख्य घटक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र मतदारांना विसरले आहेत. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांचा, पक्षांचा विसर मतदारांना पडण्याची भीती आहे. वाढत्या उन्हामुळे कमी मतदानाची टक्केवारी ही केवळ राज्यात नाही तर देशात राजकीय भूकंप घडवू शकते.

R

Political situation of Maharashtra
Prakash Ambedkar : नितीन गडकरी पुढचे पंतप्रधान असणार; प्रकाश आंबेडकारांनी सांगितलं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com