Maharashtra Politics: ‘छावा’ संघटनेवरील हल्ला ‘राष्ट्रवादी’ला जड जाईल?

NCP, Chhava Sanghatna workers clash: माणिकराव कोकाटे आणि सुरज चव्हाण यांच्या या केलेल्या कृत्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कशाप्रकारे भोगावा लागू शकतो, हे काळच ठरवणार आहे. या प्रकरणाचे पडसाद दीर्घकाळ उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ajit Pawar and suraj chavan
Ajit Pawar and suraj chavan . Sarkarnama
Published on
Updated on
  1. मंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळताना आढळले, याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अडचणीत आली.

  2. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सूरज चव्हाण यांचा हल्ला, यामुळे पक्षविरोधात रोष वाढला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

  3. पक्षाची प्रतिमा धोक्यात, आणि या दोन्ही घटनांचा आगामी निवडणुकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन संपत असतानाच, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वादाला सुरुवात झाली. यातूनच लातूर येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. मात्र, या प्रकरणाचे पडसाद दीर्घकाळ उमटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तब्बल तीन आठवड्यांनंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. विधिमंडळात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसला, मात्र राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष घडलाच नाही. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिवेशन काळात फार वादात सापडले नाहीत. त्यामुळे अधिवेशन त्यांच्या दृष्टीने अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडले. मात्र अधिवेशन संपल्याबरोबर त्यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेच्या सभागृहात मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर पसरवून एकच खळबळ उडवून दिली.

‘‘लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणारा सत्ताधाऱ्यांसाठी ‘माणिक’ असला, तरी तो शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यावा आणि रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी खाते संवेदनशील मंत्र्याकडे द्यावे. तसेच शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव हे सरकार कायमच आणते, पण सरकारला खरेच कळवळा असेल तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, भावांतर योजना, पीक विम्याचे जुने ट्रिगर पुन्हा लागू करण्याची आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता देण्याची हीच योग्य वेळ आहे.

अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा उद्रेक झाला तर त्यात हे मग्रूर सरकार भाजून निघाल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय, काही महिन्यांत विविध भानगडीत अडकलेल्या, नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत असलेल्या आणि असंवेदनशीलपणे गरळ ओकणाऱ्या सर्वच मंत्र्यांच्या हाती सरकारने सरळसरळ नारळ द्यावा,’’ अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

अधिवेशनात अनेकदा कृषिमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला, मात्र हा विषय थेट त्यांच्या अखत्यारीत नसल्याने त्यातून निभावून गेले. तर कृषी विभागाच्या अन्य प्रश्नांवर विरोधक कोकाटे याना फारसे घेरू शकले नाहीत. मात्र, पत्ते खेळण्याच्या व्हिडिओमुळे कोकाटेच नव्हे तर संपूर्ण पक्षच अडचणीत आला.

त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर येथील दौऱ्यात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष आणि प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे नेट विजयकुमार घाटगे यांना आपल्या कार्यकर्त्यांसह बेदम मारहाण केली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच; परंतु तटकरे यांना खेळण्याचे पत्ते भेट दिले. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राग आला. त्याचे पर्यवसान छावा संघटनेचे पदाधिकारी घाटगे यांना मारहाण करण्यात झाला.

Ajit Pawar and suraj chavan
Operation Sindoor Debate: पाकिस्तानी दहशतवाद्यांना क्लीन चीट देणाऱ्या चिदंबरमांना शहांनी पुरावे देत धू धू धुतले

या प्रकारणाने कोकाटे प्रकरण बाजूलाच पडले आणि सूरज चव्हाण हेच विरोधकांच्या रोषाचे बळी ठरले. वास्तविक छावा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कार्यकर्त्यांचे चांगलेच जाळे आहे. गेली अनेक वर्षे राजकारणापासून अलिप्त राहून काम करणारी संघटना असली, तरी मराठा समाजाच्या जवळची समजली जाणारी ही संघटना आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या या कृत्याचा थेट परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) निवडणुकांमध्ये भोगावा लागला असता.

झाल्या प्रकारावरून सूरज चव्हाण यांनी तातडीने माफी मागितली. मात्र तरीही हे प्रकरण वाढणार असल्याचे लक्षात येताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी तातडीने सूरज चव्हाण याना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला विरोध असल्याचे सांगत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी सूरज चव्हाण यांना पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी असल्याचे अजित पवार वारंवार सांगत असले, तरी त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या अशा कृत्यांमुळे पक्षाच्या भूमिकेला तडे तर जात नाहीत ना, याचाही विचार पक्षश्रेष्ठींनी करणे गरजेचे आहे. कोकाटे आणि सुरज चव्हाण यांच्या या कृत्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत कशाप्रकारे भोगावा लागू शकतो, हे काळच ठरवणार आहे.

✅ 4 FAQs

Q1. माणिकराव कोकाटे कोणत्या कारणामुळे चर्चेत आले?
ते विधानसभेत रमी खेळताना पकडले गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Q2. लातूरमध्ये छावा संघटनेवर हल्ला का झाला?
रमी प्रकरणावरून जाब विचारल्यामुळे सूरज चव्हाण यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला.

Q3. सूरज चव्हाण यांना राजीनामा का द्यावा लागला?
पक्षविरोधी हिंसक वर्तन केल्यामुळे अजित पवार यांनी त्यांना राजीनाम्याचे आदेश दिले.

Q4. या प्रकरणांचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा बिघडून मतदारांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com