देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका निभावलेल्या, स्वातत्र्यानंतर अनेक वर्षे देशात, बहुतांश राज्यांत सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाची (Congress)स्थिती आज दयनीय झाली आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिल्यामुळे नेत्यांच्या अंगी भिनलेली सरंजामी वृत्ती, वाढलेला अहंकार, भ्रष्टाचारात सहभाग यासह रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची नसलेली तयारी आदींमुळे काँग्रेसची वाताहत झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र, त्यांना नेत्यांकडून म्हणावी तशी साथ मिळत नसल्याचे चित्र दिसत होते, या निवडणुकीत त्यात बराच बदल झाला आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे.
2014 पासून देशात भाजपचे सरकार आहे. भाजपच्या नेत्यांनी, विशेषतः नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोपांची राळ उठवली. विविध आर्थिक घोटाळ्यांचा आरोप काँग्रेस सरकारवर करण्यात आला. त्यातील अनेक घोटाळे सिद्ध झाले नाहीत, हा भाग वेगळा. राजकारणात आरोप-प्रत्यारोप केले जातात. ते सर्वच खरे असतात किंवा सिद्ध होतात; असे नाही.
एकीकडे काँग्रेसवर, काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करायचे आणि त्याच नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पायघड्या अंथरायच्या, असे चित्र देशाने राज्याने पाहिले आहे. वर्षानुवर्षे सत्तेत राहून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायचे विसरलेल्या काँग्रेस नेत्यांना ही आयतीच संधी होती. सरंजामी वृत्तीच्या, भ्रष्टाचारात अडकलेल्या काँग्रेसमधील काही नेत्यांनी मग भाजपची वाट धरली.
काँग्रेसने देशाला, राज्याला मोठे, दिग्गज नेते दिले आहेत. सामाजिक सलोखा जपत पक्षाची वाढ करण्यात या नेत्यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यांचे राजकीय चातुर्य, पक्षसंघटनेवरील पकडही कौतुकास्पद, डोळे दीपवणारी होती. अशा नेत्यांमध्ये राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा समावेश होतो. ओघवत्या वक्तृत्वशैलीसाठीही ते प्रसिद्ध होते.
पक्षाची पडझड होत असताना निष्ठावंत काँग्रेसजनांना विलासरावांची नक्कीच आठवण येत असणार, त्यांची कमतरता भासत असणार. तशीच आठवण विलासरावांचे पुत्र, माजी मंत्री, लातूरचे आमदार अमित देशमुख यांनाही आली. विलासराव हयात असते तर काँग्रेसची राज्यात इतकी पडझड झाली नसते, त्यांचे मार्गदर्शन सर्वांनाच मिळाले असते, त्यांचा आधार मिळाला असता, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ अमित देशमुखही भाजपमध्ये जातील, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. तिकडे अशोक चव्हाण आणि इकडे माजी राज्यमंत्री, औशाचे माजी आमदार बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अमित देशमुखही जातील, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला. ही चर्चा खोटी ठरली.
अमित देशमुख काँग्रेसमध्येच राहिले आणि नव्या जोमाने सक्रिय झाले, कामाला लागले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी देशमुख लातूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्येही फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी अमित देशमुख यांच्या आग्रहाखातर लातूर येथे मुक्काम केला. त्यामुळे तर अमित देशमुख यांचे पक्षसंघटनेतील महत्व अधोरेखित झाले आहे.
विलासराव देशमुख हे चाणाक्ष राजकीय नेते होते. सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. भाजपचे दिवंगत दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री चर्चेचा विषय होती. राजकारणात या मैत्रीचे दाखले दिले जायचे. दोघांचीही वक्तृत्वशैली अमोघ अशी होती.
हे दोघे एका व्यासपीठावर येणार म्हटले की प्रचंड गर्दी व्हायची. कार्यकर्त्यांना, नेत्यांना विलासरावांबद्दल जिव्हाळा होता. असा जिव्हाळा उगाच निर्माण होत नाही. त्यासाठी नेत्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी लागते. विलासराव हे कार्यकर्त्यांना, नेत्यांना मोठा आधार वाटायचे. त्यामुळे अमित देशमुख बोलले त्याला आधार आहे. विलासराव हयात असते तर काँग्रेसची इतकी पडझड झाली नसती. पक्ष सोडणाच्या मनःस्थितीत असणाऱ्या काही नेत्यांना त्यांचा आधार, त्यांचे मार्गदर्शन मिळाले असते.
अमित देशमुख यांनी त्यांचे काका, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सल्ला ऐकला आणि काँग्रेस न सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता पक्षसंघटनेत अमित देशमुखांचे महत्तव वाढले आहे.
विलासराव देशमुख हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. अमित देशमुखांचीही तशी महत्त्वाकांक्षा असणार, हे निश्चित आहे. ते भाजपमध्ये गेले असते तर त्यांनी ही संधी मिळालीच नसती. काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस आले तर त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पक्षसंघटनेत ते आता अधिक सक्रिय झाले आहेत. पक्षाच्या पडझडीत विलासरावांची आठवण काढणे, हा राजकीय मुत्सद्देगिरीचाच एक भाग समजला पाहिजे. याद्वारे अमित देशमुखांनी पक्षसंघटनेत एक संदेश दिला आहे. असे असले तरीही विलासराव देशमुख आज हयात असते तर काँग्रेसची स्थिती वेगळी राहिली असती, हे विरोधकही मान्य करतील.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.