
Marathwada Congress: जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि परभणीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरच या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जालना, परभणी या काँग्रेससाठीच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकांची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी विधानसभा निवडणुकीतील पराभूत आणि अनेक माजी आमदार अस्तित्वासाठी धडपडताना दिसत आहेत. आपले राजकीय बस्तान शाबूत ठेवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची स्पर्धाच लागली आहे.
मराठवाड्यातील जालना आणि परभणीमध्ये कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर या काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे या दोघांनाही पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली होती.
गोरंट्याल जालन्यातून, तर माजी मंत्री असणारे वरपुडकर पाथरी मतदारसंघातून पराभूत झाले. आपापल्या मतदारसंघात आपले राजकीय दुकान सुरू ठेवण्यासाठी गोरंट्याल आणि वरपुडकर यांनी पक्ष बदलला, अशी टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आहे. ही टीका होत असली, तर या दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे परभणी, जालना या दोन जिल्ह्यांत काँग्रेसचा ‘हात’ दुबळा होणार, एवढे मात्र निश्चित.
कैलास गोरंट्याल हे जालन्यातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार झाले. नगर परिषदेतील सत्तेच्या जोरावर जालना शहरात त्यांनी दहा-पंधरा वर्षांत काँग्रेसचा हात मजबूत केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली.
काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर निवडणुकीत काम न करण्याचा आरोप हा त्यातूनच केला गेला. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत शेवटी नाव जाहीर झाल्याबद्दलही गोरंट्याल यांच्या मनात राग आहे. तीन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीचे नाव शेवटी का? असा त्यांचा सवाल आहे. परंतु निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हा आरोप केल्यामुळे त्याला फारसा अर्थ उरत नाही.
लोकसभा निवडणुकीत जो करिष्मा काँग्रेस महाविकास आघाडीला करता आला. तो विधानसभेत दाखवता आला नाही. महायुतीने मारलेली जोरदार मुसंडी पाहता काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेकांनी सत्ताधारी पक्षांची वाट धरली. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर या पक्षांतराला वेग आला. गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश हा विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. शतप्रतिशत भाजप आणि नगरपरिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा महापौर बसवण्यासाठीची रणनीती या मागे आहे.
दानवेंचा काट्याने काटा भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी हातभार लावला होता. त्या दरम्यानच्या काही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या, याची सल दानवे यांच्या मनात आजही आहे. गोरंट्याल काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांची दानवे यांच्याशी मैत्री आहे. कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय संघर्ष, शत्रुत्व याचा पुरेपूर फायदा दानवे आगामी महापालिका निवडणुकीत करून घेणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामागे जालना भाजपचा महापालिकेत महापौर होणे या हेतूसह राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करणे, हा दुहेरी डाव आहे. लोकसभा निवडणुकीत युतीधर्म न पाळता विरोधात काम करणाऱ्या खोतकर यांना विधानसभा निवडणुकीत रोखता आले नाही, पण महापालिकेच्या राजकारणापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी दानवे-गोरंट्याल यांच्यात झालेली ही युती, या दृष्टीनेही गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिले जात आहे. रावसाहेब दानवे काट्याने काटा काढण्यात माहीर आहेत, गोरंट्याल नावाच्या काट्याने ते खोतकर नावाचा काटा काढू पाहत आहेत. यात त्यांना कितपत यश येते, हे लवकरच समोर येईल.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना आपले राजकीय भवितव्य नव्याने घडवायचे आहे. सत्ताधारी महायुतीसमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत टिकाव लागणार नाही, याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेशाची ही स्क्रीप्ट फार पूर्वीपासून तयार होती, आता स्थानिक निवडणुकांचे टायमिंग त्यासाठी साधण्यात आले आहे.
काँग्रेसमध्ये असताना गोरंट्याल यांनी शिवसेनेच्या मदतीने दहा-पंधरा वर्षे जालना नगरपरिषदेवर अधिराज्य गाजवले. या दोन्ही पक्षांनी भाजपला नगरपरिषदेवर वर्चस्व गाजवू दिले नाही. नगरपरिषदेचे एकहाती नेतृत्व करणाऱ्या गोरंट्याल यांचा महापालिका निर्मितीला तीव्र विरोध होता. त्याला रावसाहेब दानवे यांचीही साथ होती. परंतु राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने अर्जुन खोतकर यांनी महापालिकेची मंजुरी आणली. दानवे यांनी टोकाचा विरोध न करता तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे गोरंट्याल यांचाही नाइलाज झाला. आता नगरपरिषदेप्रमाणेच महापालिकेवरही आपले वर्चस्व राहावे, यासाठी कैलास गोरंट्याल यांनी थेट पक्षच बदलला. रावसाहेब दानवे आणि गोरंट्याल यांच्यात झालेल्या गुप्त समझोत्यानुसार महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून पहिला महापौर भाजपचा बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन हे दोघे मैदानात उतरले आहेत. यात सर्वाधिक कोंडी होणार आहे ती अर्जुन खोतकर यांची.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महापालिका, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यासाठीच वरपुडकर यांचा भाजप प्रवेश करून घेण्यात आल्याचे बोलले जाते. बोर्डीकर-वरपुडकर या दोन तलवारी एकाच म्यानात कशा राहतील? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला गेला. परंतु या दोन तलवारी एकमेकांना भिडणार नाही, याची व्यवस्था वरिष्ठ नेतृत्वानेच केली आहे. वरपुडकर यांचा वापर स्थानिक पातळीवर करून घ्यायचा आणि राज्य-जिल्हा पातळीवर मंत्री-पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर या काम पाहतील, अशी रचना ठरल्याने या प्रवेशाचे कुठेही पक्षात साइड इफेक्ट दिसून आले नाहीत.
जालन्याप्रमाणेच परभणीतही भाजपाला शत प्रतिशत हवे आहे, हेच वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशातून स्पष्ट होते. प्रत्येकाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, या नावाखाली महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच माजी आमदार विजय भांबळे यांचा प्रवेश झाला. भांबळे हे बोर्डीकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी भांबळे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर गंभीर आरोप करत मित्रपक्षांतील वादच चव्हाट्यावर आणले होते.
सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधीच ते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेससमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह काही नावे समोर येत असली, तरी महायुतीला टक्कर देऊ शकेल असे आक्रमक नेतृत्व सध्या काँग्रेसकडे नाही. काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यांत काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. सत्ता, मंत्री पद दिलेली मंडळी पक्ष सोडून जात असल्याने प्रदेशाचे नेतृत्व बदलूनही फारसा उपयोग होताना दिसत नाहीये.
मराठवाड्यातील जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव होता. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले. परंतु विधानसभा निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नाही. हिंगोलीमध्ये राजीव सातव यांच्यानंतर पक्षाची मदार असलेल्या आमदार प्रज्ञा सातव यांना मर्यादा आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातही काँग्रेसला नव्या नेतृत्वाचा शोध आहे. बीडमध्ये पक्षाची अवस्था बिकट आहे, तर लातूरमध्ये अमित देशमुख यांना भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसलाही तोंड द्यावे लागत आहे. एकूणच मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा झाला हेच खरे.
काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. त्यालाही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुहूर्त लागला. दरम्यान, जिल्हा बँकेतील संचालक पदावर आलेल्या गंडांतरानंतर या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग आला. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बोर्डीकर-वरपुडकर ही दोन वजनदार नावे म्हणून ओळखली जातात.
मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपद आणि स्थानिक पालकमंत्री मिळाला. त्यामुळे साहजिकच सुरेश वरपुडकर यांना त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेत सुरेश वरपुडकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आता हाच समाज वरपुडकर यांच्या माध्यमातून महायुतीकडे पर्यायाने भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न या प्रवेशातून होताना दिसत आहे.
गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस जालन्यामध्ये एकाकी पडल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालन्यात येऊन दमदार भाषण तर ठोकले, पण पक्षाची परिस्थिती आता तशी राहिलेली नाही. प्रदेश कार्यकारिणीत जालन्यातील काही नेत्यांचा समावेश करण्यात आला असला, तरी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळवून देऊ शकेल, असे नेतृत्व सध्या तरी काँग्रेसकडे नाही. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना मर्यादा आहेत, तर विधान परिषदेतील आमदार राजेश राठोड यांचा कार्यकर्त्यांशी संपर्कच नाही. नव्या दमाचे नेतृत्व देऊ, असे सपकाळ यांनी सांगितले असले तरी असे नेतृत्व काँग्रेसकडे नाही. याचा परिणाम निवडणुकीत निश्चितच होणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.