विविध ‘मल्टिमॉडेल’ वाहतुकीचे पर्याय देणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एकमेव असल्याने येणाऱ्या काळात हे विमानतळ नवी मुंबईसहीत नाशिक आणि पुण्यातील आर्थिक विकासाला हातभार देणारे ठरणार आहे. नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये एकूण चार ‘टर्मिनल’ इमारती, दोन धावपट्ट्या आणि काही भाग मालवाहतूकीसाठी वापरला जाणार आहे. त्यापैकी एक धावपट्टी आणि एक ‘टर्मिनल’ इमारत तयार झाली आहे. दुसरी ‘टर्मिनल’ इमारत टप्प्या-टप्प्याने पूर्ण होणार असून २०२९ ला इमारत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर उर्वरित इमारती पूर्ण होतील. सर्व इमारती पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाहून वर्षाला ९० लाख ते एक कोटी प्रवाशी प्रवास करतील इतकी क्षमता असेल. परंतु सध्या या विमानतळावरून वर्षाला २० लाख प्रवाशांची प्रवासाची क्षमता आहे.
गेली चार दशके ज्या विमानतळाचे फक्त नाव आणि जागा ऐकून मोठ्या झालेल्या पिढीने अखेर बुधवारी, ८ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रत्यक्ष उद्घाटन होताना पाहिले. असे हे बहुप्रतीक्षित विमानतळ त्याच्या वैशिष्ट्यांमुळे सुरू होण्याआधीच जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहे. तर दुसरीकडे त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेल्या वादंगामुळे राजकीय वर्तुळातही हे विमानतळ महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. रायगडमधील प्रकल्पग्रस्तांचे नेते अन् माजी आमदार दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाची आग्रही मागणी सर्वपक्षीयांकडून केली जात आहे. दि.बांची मागणी सरकारदरबारी लावून धरण्यासाठी सर्वपक्षीय नामकरण कृती समितीही स्थापन झाली आहे. या मागणीनुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. आता केंद्र सरकार केव्हा या नावाची घोषणा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमानतळ उभारणीत आलेल्या अडचणी, अडथळ्यांची शर्यत जशी रंजक आहे. तसेच ते पूर्ण होण्याआधीच त्याचे बारसे करण्यावरून म्हणजे निर्माण झालेला नावाचा वादही तितकाच महत्त्वाचा आहे. १९९७ ला शिवसेना-भाजप सरकारच्या काळात मुंबई विमानतळाला दुसरा पर्यायी विमानतळ म्हणून संकल्पना पुढे आली. ‘सिडको’ने संपादित केलेल्या जागेवर पनवेलजवळ हे विमानतळ तयार करण्यावर एकमत झाले. त्यावेळी त्याच्या नावावर कुणीच भाष्य केले नव्हते. परंतु विमानतळाला जसा आकार येऊ लागला, तशी त्याच्या नावासाठी विविध महापुरुषांच्या नावाची यादी पुढे येऊ लागली. यात अडीच वर्षांसाठी आलेल्या महायुती सरकारने दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला. त्याला प्रखर विरोध झाला. शेतकरी, कष्टकरी, मजुर, भूमिहीन कामगारांसाठी दिवस-रात्र झटणारे प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव जोर धरू लागले. त्यांच्या नावाला विरोध करण्याचे कोणतेही कारण महायुती सरकारकडे नव्हते. त्यामुळे जाता जाता या सरकारने बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव रद्द करून दि.बांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला अन् आपल्यावरील रोष कमी करून घेतला. परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारला विमानतळाला दि.बांचे नाव घोषित करता आलेले नाही.
याबाबत महाविकास आघाडीतर्फे शेकापने अनेक आंदोलने केली. काही दिवसांपूर्वीच भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी ‘अभिवादन रॅली’ काढून दि.बांच्या नावावरून सुरू असलेल्या आंदोलनात फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार दि.बांच्या नावाला सकारात्मक असताना आंदोलनाचा घाट कशासाठी असा प्रश्न नामकरण समितीने उपस्थित करून बाळ्या मामांचे आंदोलन थंड केले.
बुधवारी, ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.बांच्या नावाची घोषणा करतील, किमान कल्पना तरी देतील असे वाटले. परंतु तसे झाले नाही. दि.बांचे नाव ऐकण्यासाठी आलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड झाला. मात्र, यामुळे पुन्हा दि.बांच्या नावासाठी लढा सुरू करण्याचा शेकापकडून विचार सुरू झाला आहे. याआधी विमानतळास नाव न दिल्यास काम बंद पाडू, अशी वल्गना विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत होती. परंतु प्रशासकीय कामाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी वेळ काढून घेत अखेर विमानतळ सुरू केले आहे. आता विमानतळाची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे केली जाणार आहे. सोबतीला राज्याचे पोलिस दलही असणार आहेत. अशा परिस्थितीत आता विमानतळाचे काम बंद पाडू असे म्हणणे प्रत्यक्षात शक्य होणार नाही.
दि.बांच्या नावावरून पनवेल, उरण या दोन महत्वाच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात चळवळ झाली आहे. या दोन्ही भागांतून भाजपचे आमदार निवडून आले आहेत. या दोन्ही तालुक्यांवर भाजपची मोठी पकड आहे. दि.बांच्या नावावरून सरकारने घूमजाव केले तर त्यामुळे होणारा परिणाम पनवेल आणि उरणच्या जागांवर होणार आहे.
पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्राबल्य आहे. तर उरणमध्ये आमदार महेश बालदी यांचा प्रभाव वाढत आहे. नव्याने आलेल्या माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रेंमुळे ही शक्ती दुप्पट झाली आहे. अशा परिस्थितीत दि.बांच्या नावामुळे का होई ना विरोधकांना एक भक्कम मुद्दा मिळाला आहे. विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी मागील काही काळात सत्तेतील पक्षात घरोबा केल्याने बाहेरच्या जिल्ह्यांतील राजकीय नेत्यांना पनवेल-उरणमध्ये येऊन आंदोलन करावे लागले. विमानतळ सुरू करून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपप्रणित महायुतीची सरशी झाली आहे. विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी विरोधकांकडे आहे. पण त्याचे मतात परीवर्तन करण्याचे मोठे आव्हान पनवेल, उरणमधील विरोधकांवर आहे.
या विमानतळामुळे नवी मुंबईसहीत पनवेल, उरण, खालापूर, खोपोली, पेण, अलिबाग या रायगड जिल्ह्यातील शहरांचा आर्थिक, भौगौलिक आणि सामाजिक स्तरावर कायापालट होणार आहे. विमानतळाआधी मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात मोठा सागरी ‘अटल सेतू’ निर्माण झाला. या प्रकल्पामुळे पुण्याहून मुंबईला जाणे सर्वांत सोपे झाले आहे. पनवेल, उरण आणि दक्षिण नवी मुंबईतील लोकांना अवघ्या अर्ध्या तासात दक्षिण मुंबई गाठता येत आहे.
आता विमानतळास गतिमान दळणवळणाची जोड देण्यासाठी उलवे सागरी मार्गाचे काम वेगाने सुरू होत आहे. सहा किलोमीटरच्या मार्गावर ‘सिडको’तर्फे ६०० कोटी रुपये खर्च केला जात आहे. याखेरीज विमानतळाच्या चारही बाजूंनी रस्ते तयार होत आहेत. पुण्याहून नवी मुंबईच्या विमानतळाकडे जाण्यासाठी पळसपेहून येणाऱ्या मार्गाला ‘कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी’जवळ तीन वर्तुळाकार उड्डाणपूलांची जोड मिळणार आहे. कल्याणहून येण्यासाठी नवा मेट्रोमार्ग आहेच. शिवाय रस्त्यानेही या वर्तुळाकार उड्डाणपुलांनी विमानतळ गाठता येणार आहेच.
पुणेकर अन् नाशिककरांना आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आता मुंबई विमानतळावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. नाशिककरांसाठी वसई-विरारहून सुरू होणारा आणि पनवेलहून अलिबागच्या दिशेने जाणारा ‘वसई-विरार-अलिबाग कॉरीडॉर’ नवी मुंबई विमानतळाजवळ घेऊन जाणारा ठरणार आहे.
परदेशातील विमानतळाच्या धर्तीवर सिडको महामंडळातर्फे विमानतळ जवळच्या दहा किलोमीटरच्या परिघात ‘एरो सिटी’, ‘एज्युसिटी’, ‘मेडिसिटी’ असे प्रकल्प होत आहेत. त्यात परदेशी गुंतवणूक आली आहे. त्यामुळे स्थानिक मुलांना सुमारे एक लाख रोजगार आणि व्यवसायाला चालना मिळणार आहे. ‘सिडको’च्या ‘एज्युसिटी’मध्ये परदेशातील दहा विद्यापीठांनी गुंतवणूक केली आहे.
या शैक्षणिक गुंतवणुकीमुळे रायगड जिल्ह्यातील मुलांना वेगळ्या पातळीवरील शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. नवी मुंबई विमानतळामध्ये ‘कार्गो टर्मिनल’सुद्धा असणार आहे. मालवाहतूकही करता येणार आहे. ३२ लाख मेट्रिक टन इतक्या मालाची वाहतूक करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त ८ लाख मेट्रिक टन इतक्या क्षमतेची मालवाहतूक करता येणार आहे. विमानतळामध्ये मालसाठवण करण्याची सोय आहे. नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथील शेतकऱ्यांना त्यांचा शेत माल थेट परदेशात पाठवून देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही माल साठवण्यासाठी नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात शीतगृहांची मागणी वाढणार आहे.
सध्या नवी मुंबई, पनवेल आणि उरण या भागात कंटेनर यार्डसाठी जागा मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यां शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. मुंबईनंतर नवी मुंबई आणि पुणे या भागातील ‘आयटी’ उद्योगाला मोठा लाभ होणार आहे. पुण्यातील बाणेर, हिंजवडी भागातील उद्योजकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे परदेशात जाण्यासाठी मुंबई आणि पुणे विमानतळावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. नवी मुंबई विमानतळावर ‘जनरल एव्हिएशन टर्मिनल’ही तयार केले जाणार आहेत. ज्या लोकांकडे स्वतःची विमाने (चार्टेड एअरक्राफ्ट) असणार आहेत अशांसाठी १०० पेक्षा जास्त ‘चार्टड एअरक्राफ्ट’ उभे करण्यासाठी जागेचे नियोजन केले आहे.
मुंबईला पर्याय म्हणून तयार झालेल्या नवी मुंबईची व्याप्ती आता वाढत जात आहे. नवी मुंबईचे पनवेल, उरण या पलिकडे जाऊन कर्जत, खालापूर, खोपोली, पेण, पाली, अलिबाग, श्रीवर्धनपर्यंत ‘तिसरी मुंबई’ होऊ पाहात आहे. तर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरामुळे वसई-विरार हा सर्व भाग एकत्रित करुन ‘चौथी मुंबई’ तयार करण्याचे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ उद्घाटनाच्या मंचावरून भाषणात स्पष्ट केले. तसेच आगामी काळात मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई आणि पालघर हे महाराष्ट्राच्या विकासदरात एक टक्क्याने वाढ करतील असा विश्वासही व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी थेट विकासाची व्याख्या विशद केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने न केलेल्या कामांमुळे मुंबईकरांचे झालेले हाल आणि काँग्रेसने दहशतवादासमोर सिद्ध केलेले दुबळे आव्हान सांगून मतदारांच्या ह्रदयात हात घातला. त्यामुळे हे विमानतळ सत्ताधाऱ्यांकडून आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. विमानतळामुळे पनवेल, उरणसहित नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याचा कसा सर्वांगीण विकास होईल याच मुद्द्यावर भविष्यातील निवडणुका लढवल्या जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.