Maharasta politics : ठाकरेंचा 'बाण' गेला, पवारांचे 'घड्याळ'; महाराष्ट्राची निवडणूक असणार सर्वार्थाने वेगळी

Lok Sabha Election 2024 : पक्षांतरबंदी कायदा आणि आमदार अपात्रता प्रकरणाने कायद्याचा काथ्याकूट झाला. या प्रकरणांनी कागदोपत्री कार्यवाहीचे महत्व अधोरेखित केले.
Maharasta politics
Maharasta politicssarkarnama

Maharasta politics : राजकारणात नेहमीसाठी मित्र आणि शत्रू कोणीही नसतो, परिस्थितीनुरूप शत्रू आणि मित्र बनतात. वर्चस्व आणि सत्तेची महत्वाकांक्षा एकाच राजकीय पक्षांतील सहकाऱ्याना शत्रू बनवते तर विरोधी पक्षांतील नेते मित्र असू शकतात. राजकारणाच्या खेळातील सर्वच नियम उलटे. म्हणजे स्तुती भल्यासाठी असतेच असे नाही तर टीका केल्याने नुकसानच होते असेही नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले बदल पाहता 2024 ची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी असणार आहे आणि राजकारणाच्या मैदानातील सर्व उलट्या नियमांचे प्रात्यक्षिक असणार आहे. (Maharasta politics)

Maharasta politics
BJP VS Congress : भाजपच्या उत्पन्नात वाढ, तर काँग्रेसला फटका; कुणाला किती मिळाला निधी?

दोन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राज्याच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत (Shivsena) आजपर्यंतची सर्वात मोठी बंडाळी झाली. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले. त्यानंतर अल्पावधीतच अजित पवार यांनीही भाजप -शिवसेना युतीसोबत जात सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.पक्षांतरबंदी कायदा आणि आमदार अपात्रता प्रकरणाने कायद्याचा काथ्याकूट झाला. या प्रकरणांनी कागदोपत्री कार्यवाहीचे महत्व अधोरेखित केले. याचा सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी धडा घेतला. अखेर राज्यात दोन नवे पक्ष उदयास आले. शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.

विरोधक झाले मित्र आणि मित्र झाले शत्रू

हिंदुत्वाच्या मुद्यावर २५ पेक्षा अधिक वर्षे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशी राज्यातील प्रत्येक निवडणूक युतीने एकत्रित लढवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे युती टिकली, वाढली. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून मिठाचा खडा पडला आणि युती तुटली. शिवसेनेने पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यानी बंड करत शिवसेनाप्रमुखांचे विचार व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपशी युती केली. शिवसेना- भाजप युतीचे पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील जनतेने काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती अशी विविध भिन्न विचारसरणी असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्रित येताना बघितले. जे पारंपरिक विरोधक होते ते मित्र झाले आणि जे वर्षानुवर्षे मित्र होते ते शत्रू झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाव बदलले, पक्षचिन्हही बदलले

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत झाला. पक्षाचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड केले आणि निवडणूक आयोगाने त्यांनाही पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊ केले. 2024 ची लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढवताना पक्षाचे नाव आणि चिन्हात झालेला बदल हा राजकीय पक्ष, नेते आणि सर्वसामान्य मतदारांसाठीही सर्वात मोठा बदल असेल. शिवसेनेचे जे खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांना आता नवीन नाव आणि चिन्ह घेऊन मैदानात उतरावे लागणार आहे. अशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकप्रतिनिधीं संदर्भात आहे. जनतेसमोर जाताना या बदलाचा स्वीकार करून जाणारी ही पहिलीच निवडणूक असेल.

Maharasta politics
Uddhav Thackeray: भाजपचा बडा मासा ठाकरे गटाच्या गळाला; आज मेगा भरती

नेत्यांची कसोटी आणि राजकीय अस्तित्वसु्द्धा

राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात झालेल्या बदलानंतर प्रथमच 2024 ची लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेत्यांची कसोटी असेल. ही अनेकांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाला मतदारांचे समर्थन आहे किंवा नाही याचा निर्णय निवडणूक निकालातून दिसणार आहे आणि या निकालावरच युतीचे भवितव्य अवलंबून असेल. या दोन्ही नेत्यांच्या निर्णयाला जनतेने कौल दिला तर युतीवर नक्कीच काहीही परिणाम होणार नाही, परंतु मतदारांनी नाकारले तर युतीचे आणि पर्यायाने त्या लोकप्रतिनिधींचे राजकीय भवितव्य कसे असेल हा प्रश्नही महत्वाचा राहील. युती आणि आघाडीच्या रणनितीकारांच्या करिअरमधील हा महत्वाचा टप्पा असे.

वंचित बहुजन आघाडीनेही बदलला ट्रॅक

कॉंग्रेस आणि भाजपला तिसरा पर्याय म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली होती. ओवेसी बंधूंच्या एमएआयएमने 'जय भीम जय मिम'चा नारा देत वंचित बहुजन आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दलित- मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला भरभरून प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. तसेच राज्यातील काही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. अनेक ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक व्होटबँक असलेल्या दलित, मुस्लिमांची मते घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. यामुळे काँग्रेस नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भाजपची बी टीम असाही केला. 2024 च्या निवडणुकीला सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीनेही ट्रॅक बदलला आहे. वंचित बहुजन आघाडीने सर्वात प्रथम शिवसेनेशी (ठाकरे गट) हातमिळवणी केली. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले. आता घोडे फक्त जागावाटपाच्या मुद्द्यावर अडले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीत सहभागी असलेला एमआयएम यावेळी मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. एकूणच 2024 ची लोकसभा निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी असणार आहे.

(Edited By Roshan More)

Maharasta politics
Santosh Bangar Controversial : आधी मिशी, फाशी अन् आता उपाशी; आमदार बांगरांची गाडी थांबेचना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com