Maharashtra Politics : महायुतीत हालचाली, आदळआपट, महाविकास आघाडीत नीरव शांतता...

Mahayuti : महायुतीतील अन्य पक्षांना भाजप म्हणेल तसेच वागावे लागण्याची शक्यता...
Loksabha Election
Loksabha Election Sarkarnama
Published on
Updated on

महायुतीतील पक्षांमध्ये आदळआपट सुरू झाली आहे. अनेक पक्ष एकत्र आले की तसे होणारच. आपल्याला साजेसा वाटा मिळावा, अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असणार, त्यात अयोग्य असे काहीही नाही. मात्र, या आदळआपटीचा भाजपवर लोकसभा निवडणुकीत तरी काही परिणाम होईल, अशी शक्यता नाही. राज्यात भाजपला मिशन ४५ तडीस न्यायचे आहे. त्यामुळे आता आमचे ऐका, विधानसभेला तुमचा विचार करू, अशी भूमिका भाजपकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत मात्र अद्याप नीरव शांतता दिसून येत आहे.

महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय राहावा, यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेळावे घेण्यात आले. काही ठिकाणच्या मेळाव्यांत पक्षांमधील मतभेद समोर आले. मतदारसंघ आमचाच, असे दावे करीत उमेदवारीच्या काटाकाटीचे संदेश देण्यात आले. काही पक्षांनी मेळाव्यांकडे पाठ फिरवली. त्यानंतरही मतभेदांच्या बातम्या येत आहेत. धाराशिवच्या मेळाव्यात तर शिंदे गटातीलच मतभेद समोर आले. येथून उमेदवारासाठी प्रबळ दावेदार असलेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बोलू दिले नाही. प्रा. गायकवाड यांचे शिष्य आमदार ज्ञानराज चौगुले यांनी संयम राखला, अन्यथा मतभेद उफाळून आले असते.

आता शिंदे गटात असलेल्या भावना गवळी यांची खासदारकीची ही सलग पाचवी टर्म आहे. यंदा यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, अशी शंका मेळाव्यातील घडामोडींवरून निर्माण झाली आहे. त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे मेळाव्यात सांगितले. उमेदवारीसाठी त्यांच्याऐवजी पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ते लक्षात आल्यामुळे भावना गवळी यांनी आक्रमक भूमिका घेत मेरी झाँशी नही दूंगी... असे सांगून टाकले. यानिमित्ताने उमेदवारीसाठीची रस्सीखेच समोर आली आहे. लातूर येथील मेळाव्याला आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांची अनुपस्थिती खटकणारी होती. राज्यातील अन्य भागांतही असे प्रकार घडत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला काहीही करून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे महायुतीतील अन्य पक्षांच्या फार मागण्या भाजपकडून मान्य केल्या जातील, अशी शक्यता वाटत नाही. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि अजितदादा गटाचे उमेदवारही भाजपकडून ठरवले जातील, अशी शक्यता आहे. मतदारसंघांत भाजपकडून सर्वेक्षण केले जात आहे. त्यातील निष्कर्षानुसार उमेदवारांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. काही हायप्रोफाइल इच्छुकांकडून कॉल सेंटरद्वारे मतदारसंघातील नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. उमेदवारी देताना अनेक मतदारसंघांमध्ये भाजप धक्कातंत्राचा वापर करणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आतापासूनच आदळआपट सुरू झाल्याचे चित्र आहे.

महायुतीत घडामोडी, हालचाली सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीत मात्र अद्याप नीरव शांतता आहे. वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याची प्रक्रियाही मंदगतीने सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीत फारसे पर्यायही राहिलेले नाहीत. असे असले तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती नागरिकांमध्ये टिकून असल्याचे दिसत आहे. ती मतांमध्ये रुपांतरित व्हावी, यासाठी संबंधित पक्षांच्या हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. एकंदर काय तर, झोळी फाटकी अशी अवस्था महाविकास आघाडीची सध्या तरी दिसत आहे.

R...

Loksabha Election
Ratnagiri : ऐन मध्यरात्री आमदारानं केलं जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचं 'ऑपरेशन' : डॉक्टरांना झापलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com