Mahayuti Government : भाऊ, भाई की दादा वरचढ? महाराष्ट्रात भाजपचा शिस्तबध्द 'कार्यक्रम'...

Credit War in Mahayuti Government : भाजप कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचा उल्लेख देवाभाऊ असा केला जातो. तर शिंदेंना भाई आणि अजित पवारांना दादा ही ओळख मिळाली आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावरच निशाणा साधल्याचे पोस्टवरून स्पष्ट होते.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. महायुती सरकारमध्ये आतून नाराजी उसळत असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देताना शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका होत आहे.

  2. आचार्य तुषार भोसले यांच्या ‘नो भाईगिरी, नो दादागिरी’ पोस्टमुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर नाराजी उघड झाली आहे.

  3. मनोज जरांगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओनंतर युतीत श्रेय घेण्याची लढाई तीव्र झाली आहे.

Maharashtra Politics : राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात असले तर दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या मनातील खदखद सातत्याने बाहेर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये आपलाच नेता कसा ‘दमदार’ हे सांगण्याची स्पर्धा लागलेली असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपला नेता श्रेष्ठ वाटणारच. पण असे करताना सरकारमधील इतर नेत्यांवर आगपाखड करून युतीत मिठाचा खडा टाकण्याचे कामही त्यांच्या हातून घडत आहे.

भाजपच्या आध्यात्मिक सम्नवय आघाडीचे प्रदेश प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी तर थेट भाईगिरी आणि दादागिरी असा शब्दप्रयोग केला आहे. महाराष्ट्रात फक्त देवाचा ‘न्याय’ चालेल, नो ‘भाई’गिरी ॲण्ड नो ‘दादा’गिरी!, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणातील भाई, दादा, भाऊ कोण, हे भोसले यांना पक्कं माहिती आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचा उल्लेख देवाभाऊ असा केला जातो. तर शिंदेंना भाई आणि अजित पवारांना दादा ही ओळख मिळाली आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावरच निशाणा साधल्याचे पोस्टवरून स्पष्ट होते. त्यांनी ही पोस्ट करण्यामागे मागील दोन आठवडाभरातील दोन महत्वाच्या घडामोडी असाव्यात, असे दिसते.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Nitin Gadkari News : नितीन गडकरींच्या खांद्यावर बंदूक, टार्गेटवर मोदी; मत चोरीनंतर आता काँग्रेसच्या हाती ‘पेट्रोल बॉम्ब’

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत सर्वाधिक चर्चा झाली ती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची. मुंबईत सहा दिवस ते ठाण मांडून बसले होते. त्यांच्यासोबत आलेल्या हजारो मराठा आंदोलकांमुळे प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील काही महत्वाचे रस्ते, ठिकाणांवर तुडूंब गर्दी झाली होती. अनपेक्षित काही घटनाही घडल्या. पण मुंबई हायकोर्टाचे आदेश, शिंदे समिती आणि मंत्रिमंडळ उपसमितीमधील चर्चा अन् मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कायद्याची चौकट न सोडता जरांगे यांना खूष करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून सरकारसाठी सकारात्मक गोष्टी घडल्या.

जरांगेंनी एक पाऊल मागे येत सरसकटचा हट्ट सोडला आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार आरक्षण पदरात पाडून घेतले. पुढे सातारा गॅझेटिअरची अंमलबजावणी, मराठा व कुणबी एकच याच्या जीआरचे आश्वासनही त्यांना मिळाले आहे. त्यांनंतर जरांगेंनी उपोषण अन् मुंबईही सोडली. आता त्यावरून महायुतीत श्रेयाची लढाई सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठ्यांचे कसे भले झाले, हे दाखविण्याची चढाओढ भाजप कार्यकर्ते, नेत्यांमध्ये सुरू आहे. सोशल मीडियात त्याचा भडिमार होतोय. त्यातुलनेत शिंदे आणि पवार यांचे कार्यकर्ते, नेते बॅकफूटवर गेलेले दिसतात.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Maratha Reservation : छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंच्या हालचालींआधीच मराठा समाजाचे वकील 'अलर्ट' , हायकोर्टाला केली विनंती

जरांगे यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या शब्दांनी घायाळ न होता फडणवीसांनीही अत्यंत संयमाने हे आंदोलन हाताळले. जरांगे यांच्याकडून मागील आंदोलनावेळी वाशीमध्ये आपली फसवणूक झाल्याचे सांगितले जात होते. त्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते. शिंदेंसह महाराष्ट्रात इतक मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा समाजाला देवाभाऊनेच खरा न्याय दिला, असे सांगताना भाजप नेत्यांकडून एकप्रकारे एकनाथ शिंदेनाही टार्गेट करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसते.

दुसरी घटना म्हणजे अजित पवारांचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ. माढा तालुक्यातील कुर्डू येथे आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. अजित पवार यांनी अंजली कृष्णन यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधत कारवाई थांबण्यास सांगितले तसेच तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल, असे म्हटल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सरकारी कामात अडथळ आणल्याबद्दल कुर्डू गावातील काही जणांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे अजितदादांना फोन केलेल्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे. पण या प्रकरणामुळे आता राजकारण तापले आहे.

तुषार भोसले यांनी केलेल्या ट्विटमागे या घटनेचाही संदर्भ असावा. गृहखाते फडणवीसांकडेच आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ‘नो ‘भाई’गिरी ॲण्ड नो ‘दादा’गिरी’, या विधानामागे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी असलेली नाराजी स्पष्टपणे जाणवते. राज्याला केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस हेच न्याय देऊ शकतात, असे ठासून सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर भाजपचे बहुतेक नेते, मंत्री त्याचे क्रेडिट देवाभाऊंना देतात. महायुती सरकार असे ते क्वचितच म्हणतात. जरांगेंचे आंदोलन असो वा गणेशोत्सवाला दिलेला राज्य उत्सवाचा दर्जा, हा फडणवीसांचाच मास्टरस्ट्रोक म्हणूनच महाराष्ट्राच्या मनावर बिंबवला जात आहे.    

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली?
A: त्यांनी "नो भाईगिरी, नो दादागिरी, महाराष्ट्रात फक्त देवाचा न्याय" अशी पोस्ट केली.

Q2: या पोस्टमधून कोणाला लक्ष्य केले गेले?
A: अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे (भाई) आणि अजित पवार (दादा) यांना लक्ष्य केले गेले.

Q3: जरांगे आंदोलनानंतर श्रेय कोणाला दिले जात आहे?
A: भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांनाच मुख्य श्रेय दिले जात आहे.

Q4: अजित पवारांचा व्हायरल व्हिडिओ कशाशी संबंधित आहे?
A: माढ्यातील अवैध उत्खननावरील कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com