Mahayuti Vs Mahavikas Aaghadi: 'ही' गोष्ट 'मविआ'साठी वरदान तर महायुतीसाठी ठरतंय अवघड जागेचं दुखणं...

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीत परिस्थिती वेगळी आहे. आमदार सोडून गेल्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आमदार कमी असल्यामुळे काँग्रेसची एका अर्थाने सोय झाली आहे, असे म्हणता येईल. महायुतीत आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Mahavikas Aghadi Vs Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : सध्याचा काळ युती, आघाड्यांचा आहे. एखादा पक्ष स्वबळावर सत्ता मिळवण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. युती आणि आघाडीमुळे राजकीय पक्षांची जशी सोय होते, तशीच अडचणही होते. मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागतात. त्यामुळे इच्छुक असलेल्या स्वपक्षातील नेत्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. बंडखोरीही बोकाळते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात असे चित्र दिसू लागले आहे.

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुतीत प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष असे एकूम सहा पक्ष सामावले आहेत. काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उमेदवारीवरून महायुतीत अधिक रस्सीखेच पाहायला मिळाली. काही मतदारसंघांत महायुतीचा उमेदवार कोण, हे अगदी शेवटच्या क्षणी निश्चित झाले होते.

जागावाटपावरून महायुतीत मतभेदही निर्माण झाले होते. त्याला कारणही तसेच होते. एकतर महायुतीच्या हाती सत्ता आणि दुसरे म्हणजे दोन पक्ष फोडून सोबत घेतलेल्या 80 आमदारांची शक्ती आणि भाजपचे 105 आमदार. त्यामुळे आपला विजय निश्चित, असे महायुतीच्या नेत्यांना वाटत होते. त्यातूनच उमेदवारीसाठी चुरस वाढली होती.

लोकसभेचा निकाल लागला आणि महायुतीचे पितळ उघडे पडले. सर्वार्थाने कमकुवत वाटणाऱ्या महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. आपल्यालाच जास्त जागा मिळाव्यात, येथून या लढाईचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल अशी शक्यता दिसत नाही.

महायुतीत (Mahayuti) भाजपच्या आमदारांची जागा सर्वाधिक आहे. त्यामुळे भाजपच मोठा भाऊ ठरणार आणि आपल्या वाट्याला जास्त जागा सोडवून घेणार. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांचेही उमेदवार ठरवताना, त्यांना जागा सोडताना केली तशी मनमानी आता भाजपला करता येणार नाही.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Uddhav Thackeray News : ठाकरेंचं ठरलं; मॅरेथॉन बैठकीत 100-105 जागांवर एकमत

महायुतीत सर्वात कमी जागा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, असे चित्र दिसत आहे. अजितदादांचा महायुतीतील प्रवेश हा लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे प्रमुख कारण आहे, असे चित्र भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे तयार केले.

शिवाय, आगामी काळात अजितदादांचे अनेक शिलेदार शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या डावपेचांमुळे अजितदादांच्या आमदारांमध्ये घबराट पसरली आहे. या परिस्थितीचा फायदा भाजप आणि शिंदे गट घेणार, हे निश्चित मानले जात आहे.

या सर्व बाबींमुळे महायुतीत रुसवे, फुगवे वाढणार आहेत, वाद निर्माण होण्याचीही शक्यता जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. कोणत्याही पक्षाने मित्रपक्षासाठी एखादी जागा सोडली की त्या ठिकाणी इच्छुक असलेल्या नेत्यांची नाराजी वाढणार आहे. ही निवडणूक महायुतीतील तिन्ही पक्षांच्या अस्तित्वाची झाली आहे.

शिवाय, सत्ता आल्यानंतर अनेक अपक्ष आणि लहान पक्षांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप रखडू शकते. हा तिढा लवकर सुटावा, यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे दौरे वाढले आहेत.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Akola News : दंगलीचा इतिहास असलेल्या मतदारसंघातून ठाकरेंना उमेदवारी द्या, पवार-पटोलेंना पत्र

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे गमावण्यासारख्या काहीही नाही. महायुतीच्या तुलनेत तोकडी यंत्रणा असतानाही लोकांनी महाविकास आघाडीच्या झोळीत भरभरून दान टाकले होते. त्यामुळे इच्छुकांची रांग लागली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, यावर उद्धव ठाकरे अडून बसले आहेत. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असावेत, अशी मागणी त्यांच्या पक्षातून पुढे येऊ लागली आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे प्रत्येकी 40 आमदार त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना या दोन्ही नेत्यांना फारशी कसरत करावी लागणार नाही. महाविकास आघाडीकडे नेत्यांचे इन्कमिंगही चांगलेच वाढले आहे.

महाविकास आघाडीची स्थिती महायुतीपेक्षा वेगळी आहे. महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे मिळून 80 आमदार आले आहेत. या सर्वांना उमेदवारी द्यावीच लागणार आहे. आघाडीत मात्र या 80 जागा रिकाम्या झालेल्या आहेत. तेथे तरुण, होतकरू चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची संधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उपलब्ध झालेली आहे.

काँग्रेसच्या आमदारांची संख्याही 43 आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काँग्रेसला संधी आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची अक्षरशः रांग लागल्याचे दिसत आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Prakash Ambedkar politics: दहा वर्ष भाजप सरकार झोपले होते का? प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न

आमदारांची संख्या कमी असल्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सर्व आमदारांना बिनदिक्कतपणे उमेदवारी देऊ शकतात. उर्वरित मतदारसंघांत दुसऱ्या फळीतील तरुण, होतकरू नेत्यांना संधीची वाट मोकळी झाली आहे. आपले पक्ष फुटणे, हे एका अर्थाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी इष्टापत्तीच ठरली आहे.

शरद पवार यांच्या शब्दाचा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येही मान राखला जातो. काँग्रेसचे स्थानिक नेते ऐकायच्या मनस्थितीत नसतील शरद पवार हे थेट काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलून प्रश्न सोडवू शकतात. ही परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा महायुतीच्या आधी दूर होईल, अशी शक्यता दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com