Maharashtra Politics : राजकीय संस्कृतीच्या 'या' मारेकऱ्यांना सत्ता जाण्याचे भय सतावू लागलंय का?

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : महाराष्ट्राची समृद्ध राजकीय परंपरा, संस्कृती लयाला जात आहे. विरोधकांवर मर्यादा सोडून टीका करणाऱ्या अशा नेत्यांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. असे प्रकार सहन करणार नाही, असा संदेश मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दिलेला आहे, तरीही असे प्रकार थांबलेले नाहीत.
Sanjay Gaikwad, Anil Bonde, Nitesh Rane, Amol Mitkari
Sanjay Gaikwad, Anil Bonde, Nitesh Rane, Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : गेल्या काही वर्षांपासून एकमेकांविषयी, एकमेकांच्या श्रद्धास्थानांविषयी, एकमेकांच्या राजकीय नेत्यांविषयी बोलताना मर्यादा पाळण्याची पद्धत संपुष्टात आली आहे. समाजमाध्यमांवर दिसणारे हे चित्र आता राजकीय क्षेत्रातही सर्रास दिसू लागले आहे.

अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेते याला बळी पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर याचा अतिरेक झाला आहे. ही उद्विग्नता कुठून आणि का येते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे. विरोधक असले तरी त्यांचा सन्मान ठेवला जायचा, टीका करताना भाषेची मर्यादा पाळली जायची.

ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे (BJP) नेते प्रमोद महाजन आदी नेते हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणारचे पाईक म्हणावे लागतील. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे वेगवेगळ्या पक्षांत होते, मात्र त्यांची मैत्री चर्चेचा विषय होती. अखेरपर्यंत त्यांनी ही मैत्री जपली. हे दोघे विरोधक मित्र एकाच व्यासपीठावर येणार म्हटले की त्यांना ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची.

आज चित्र काय आहे? काही राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधाने ऐकली की सूज्ञ माणसाला राजकारणाची किळस येईल, राजकारणाविषयी त्याच्या मनात तिटकारा निर्माण होईल, असेच चित्र आहे. हे असे का झाले असेल? परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईपर्यंत संबंधित पक्षांचे श्रेष्ठी शांत कसे बसले असतील?

अशा उपटसुंभांना राजकारणात आमदार, खासदार म्हणून लोकांनी तरी संधी का आणि कशी दिली असेल? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. सत्ताधारी नेते यात आघाडीवर असले तरी विरोधी पक्षांतील काही नेतेही त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत. महाराष्ट्राने यापूर्वी सुसंस्कृत राजकीय नेत्यांची मांदियाळीच पाहिली आहे.

Sanjay Gaikwad, Anil Bonde, Nitesh Rane, Amol Mitkari
Devendra Fadnavis: संभ्रमित कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे मोठे आव्हान

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार (Sharad Pawar) , बॅ. ए. आर. अंतुले, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख... यादी वाढतच जाईल, अशी महाराष्ट्राची समृद्ध राजकीय परंपरा होती. आज महाराष्ट्र काय पाहतो आहे? नितेश राणे, संजय गायकवाड, आशिष शेलार, अनिल बोंडे, अमोल मिटकरी, संजय राऊत. अशी एक ना अनेक नावे घेता येतील.

हा उथळपणा सुरू झाला तो विशेषतः 2014 नंतर. त्या वर्षी शिवसेना आणि भाजप यांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. भाजपचे सरकार स्थापन झाले आणि काही दिवसांनंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली. ती पाच वर्षे या दोन्ही पक्षांत अंतर्गत धुसफूस सुरूच होती. आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे त्याच टर्ममध्ये जाहीर सभेत उद्धव ठाकरेंना म्हणाले होते, की भाजपसोबत काम करू शकत नाही, माझा राजीनामा घ्या. या पाच वर्षांतील अस्वस्थतेचा परिपाक म्हणून 2019 ची निवडणूक झाल्यानंतर युतीत स्फोट झाला.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले. या दरम्यानच्या महिना-दीड महिन्याच्या कालावधीतील राजकीय घडामोडी, टीका, आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्राचे समाजमन सुन्न करणाऱ्या होत्या. पुढे काय होणार, याचे ते ट्रेलरच होते. ती मालिका आतापर्यंत कायम सुरू राहिलेली आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर त्याला उधान आले होते.

शिवसेना महाविकास आघाडीत गेल्यामुळे, सर्वाधिक 105 आमदार असूनही सत्तेबाहेर बसावे लागल्याची सल देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना होती. त्यातून मग शिवसेना फोडण्यात आली. याद्वारे भाजपने स्वतःचा घात करून घेतला होता. इतके पुरेसे नव्हते की काय म्हणून वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फोडण्यात आली. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगलाच अनुभवला आहे.

राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीमुळे, मरणासन्न वाटणाऱ्या काँग्रेसचे पुनरागमन झाल्यामुळे महायुतीचे नेते बिथरले असावेत का, असेही लोकांना वाटत आहे. अशा वादग्रस्त विधानांमुळे महायुतीचे नुकसान झाले आहे, निवडणुकीत फटका बसला आहे. याचे उदाहरण ताजे असतानाही पुन्हा तशीच वक्तव्ये का केली जात असतील? कोणत्याही आधारावर समाजात पाडली जाणारी फूट मान्य करणार नाही, असा संदेश मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दिला आहे. असे असतानाही महायुतीचे नेते वादग्रस्त, समाजात दुही निर्माण करणारी विधाने कशी काय करू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sanjay Gaikwad, Anil Bonde, Nitesh Rane, Amol Mitkari
MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाडांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार; किती अंगलट येणार अन् काय कारवाई होणार?

आता महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे, की ही उद्विग्नता, हा उथळपणा या नेत्यांमध्ये कुठून आला? सत्ता जाण्याचे भय यामागचे मुख्य कारण असावे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचे डावपेच आणि त्यांना असलेली सहानुभूती, उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती, अॅक्शन मोडवर आलेली काँग्रेस नेत्यांची तरुण पिढी, आदी कारणांमुळे महायुतीची मोठी पीछेहाट झाली.

Sanjay Gaikwad, Anil Bonde, Nitesh Rane, Amol Mitkari
Maharashtra Assembly Politics : सावध ऐका... प्रचाराच्या हाका...

भाजपने पक्षांची फोडाफोडी केल्यामुळे लोकांमध्ये राग होताच. फुटून बाहेर जाणाऱ्यांनी आपल्या आधीच्या नेत्यांवर मर्यादा सोडून केलेली टीका लोकांना आवडलेली नव्हती. लोकांनी याचा राग लोकसभा निवडणुकीत काढला आहे. ते विधानसभा निवडणुकीत तसाच राग काढतील का, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, मात्र, लोकांनी तसा राग काढावा, अशी परिस्थिती महायुतीचे नेते आपल्या वादग्रस्त विधानांद्वारे निर्माण करत आहेत.

महायुतीत अंतर्गत धुसफूस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतच ती दिसून आली होती. पक्ष न फोडता पाच वर्षे भाजप विरोधात बसला असता तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले असते, असे भाजपचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. दोन पक्ष फोडूनही महायुतीला लोकसभेच्या केवळ 17 जागा मिळाल्या. त्यामुळे केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्यात अडचणी आल्या.

एकनाथ शिंदे, अजितदादा पवारांना सोबत घेऊन भाजपचे नुकसान झाले, अशी भावना पक्षात निर्माण झाली. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतयं. अशी अवस्था महायुत झाली आहे. त्यात भर पडत आहे उथळ मानसिकतेच्या नेत्यांच्या विधानांची. अडचणी कमी होणे दूर राहिले, त्या वाढणारच आहेत, हे देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांना सांगायची गरज आहे का?, अर्थातच नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com