OBC Vs Maratha
OBC Vs MarathaSarkarnama

Maratha Vs OBC : मराठा- ओबीसी आरक्षण संघर्षाचा मराठवाडा इफेक्ट!

Maratha-OBC Reservation and Loksabha News : या लढ्यातून कधी नव्हे तो राज्यात विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचा भडका उडाला.

Marathwada Loksabha Elections News : मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराटी सारख्या छोट्याश्या गावातून मराठा समाजाला कुबणी जातीच्या प्रमाणपत्राआधारे ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी काही महिन्यापुर्वी लढा सुरू झाला. राजकीय पटलावर कुठेही नाव, चेहरा नसलेल्या एक सडपातळ शरीरयष्टीच्या मनोज जरांगे नावाच्या तरुणाने या लढ्याचे नेतृत्व केले. राज्यातील महायुतीचे सरकार हादरवले आणि दिल्लीपर्यंत या लढ्याची चर्चा गेली.

या लढ्यातून कधी नव्हे तो राज्यात विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा(Maratha Reservation) विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचा भडका उडाला. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले. पैकी मराठवाड्यात 26 एप्रिल, 7 आणि 13 मे या तीन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष झडला. याचा इफेक्ट मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही जाणवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

OBC Vs Maratha
Manoj Jarange News : '13 तारखेपर्यंत मराठे चांगले होते, त्यानंतर वाईट झाले का?' ; मनोज जरांगेंचा सवाल!

मराठा विरुद्ध ओबीसी(OBC Reservation) संघर्षातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी जातीयवादाला खतपाणी मिळाले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सहा महिन्यानी होणाऱ्या विधानसभेत लोकसभेत दिसलेल्या ट्रेलरचा पूर्ण पिक्चर दिसला तर नवल वाटायला नको. गेल्या वर्षभरापासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी मराठवाडा राहिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न, त्यासाठी सुरू असलेला न्यायालयीन लढा आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या नव्या मागणीसाठी सुरू झालेला लढा याचा परिणाम राज्यभरात झाला.

अंतरवाली सराटीतील या आंदोलनाला पोलिसांकडून झालेला लाठीहल्ला, गोळीबार या घटनेने गालबोट लागले आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन राज्य अन् देशपातळीवर गेले. झाडून सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देत या समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूने या प्रकरणाला आपापल्या सोयीनुसार हवा देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न झाला.

मराठा आरक्षणाची मागणी करता ते ओबीसीतून मिळावे ही जरांगे(Manoj Jarange) यांची मागणी नव्या वादाला जन्म देणारी ठरली. यातून ओबीसी-विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला. खरतर हा संघर्ष जूनाच पण जरांगे यांनी आक्रमकपणे लढा उभारत सत्ताधाऱ्यांना काही ठोस निर्णय घेण्यास भाग पाडल्यामुळे ओबीसी नेत्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला. यातून मग जरांगे यांच्या सभा आणि आरक्षण मागणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरुवातीला मराठवाड्यात आणि मग राज्यभरात ओबीसींचे एल्गार सभा, मेळावे सुरू झाले.

ओबीसींचे नेते म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, धमक्या, नकला, वैयक्तिक टीका असं सगळं घडलं. हा संघर्ष इतका टोकाला गेला की राजकीय नेत्यांच्या आॅडिओ क्लीप व्हायरल करून बीड, गेवराईसह काही भागांमध्ये मराठा आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्या किंवा जरांगे यांचे नेतृत्व नाकारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घराची राखरांगोळी करण्याचे प्रयत्न झाले. या जीवघेण्या संघर्षानंतर राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादही तुटला.

जरांगे यांची तातडीने निर्णय आणि अंमलबजावणीची मागणी, तर सरकारकडून पुरेसा वेळ हवा म्हणून दोघांमधील संघर्ष वाढला. यातून जरांगे यांचा बोलवता धनी दुसराच आहे, अशा प्रकारचे आरोप आणि मग त्याला जरांगे यांच्याकडून आक्रमकपणे दिले गेलेले प्रत्युत्तर याचा परिणाम या संपुर्ण लढ्यावर झाला. जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबईच्या दिशेने काढलेल्या पदयात्रा वरून राजकारण झाले. जरांगे यांच्या भूमिकेत होणारे बदल याबद्दल शंका उपस्थीत केल्या गेल्या. मुंबईत दाखल न होऊ देता जरांगे यांचा मोर्चा वाशीत रोखून सरकारने मागण्या मान्य केल्याचे पत्र त्यांच्या हाती सोपवले. विजयाचा गुलाल उधळत जरांगे माघारी फिरले,

OBC Vs Maratha
Parbhani Loksabha Constituency : संजय जाधव यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; नेमकं कारण काय...

सगेसोयऱ्याच्या मुद्यावरून पुन्हा आंदोलनाचा इशारा देत ते सुरू केले. दरम्यान लोकसभा निवडणुका(Loksabaha Election) जाहीर होण्याच्या काही दिवस आधी राज्य सरकारने दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत जरांगे यांच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली. सरकारचे आरक्षण मान्य नाही, ओबीसीतूनच आरक्षण द्या, सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करा या जुन्याच मागण्यासाठी नव्याने आंदोलनाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. पण आंदोलन सुरू करण्याआधीच लोकसभा निवडणुक जाहीर झाली, आचारसंहिता लागू झाली आणि जरांगेंना थांबावे लागले.

सरकारविरोधातील राग व्यक्त करण्यासाठी जरांगे यांनी सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. पण पुढे तो बदलला आणि कुणालाही विरोध किंवा पाठिंबा नाही, ज्याने मराठा आरक्षणाला विरोध केला, त्याला पाडा, असा संदेश देत संभ्रम निर्माण केला. यातून मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना व इतरही मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात जातीयवाद फोफावला. मराठा विरुद्ध ओबीसी असे स्वरुप काही मतदारसंघाला प्राप्त झाले अन् इतर मुद्दे मागे पडले.

मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे(Pankaja Munde) असा संघर्ष पेटला. जरांगे यांनी जातीयवादाचा आरोप खोडून काढला, तर मुंडे बहिण-भावाकडून गावात न येऊ देण्याची भाषा वापरल्या गेल्याचे आरोप झाले. आता या मराठा-ओबीसी संघर्षाचा परिणाम मतदानावर किती प्रमाणात झाला हे चार जूननंतरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. पण या संघर्षाने अनेकांचे राजकीय गणित बिघडणार एवढे मात्र निश्चित. एकूणच मराठा आरक्षण आणि त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्माण झालेला संघर्ष, जातीयवाद याचा मोठा प्रभाव मराठवाड्यासह राज्याच्या राजकारणावर झाला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com