Parbhani News : मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आणि जातीयवादाचा मुद्दा तापलेला असतांना लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मावळते खासदार संजय जाधव यांनी गंभीर विधान केले होते. परभणी व बीड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या जातीयवादाचा फायदा मला आणि बजरंग सोनवणे यांना झाला, असा दावा जाधव यांनी एका मुलाखती दरम्यान केला होता.
यावरून वाद सुरू असतांनाच आज परभणी दौऱ्यावर असलेले मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची जाधव यांनी भेट घेतली. परभणी जिल्ह्यातील नृसिंह पोखर्णी येथे मनोज जरांगे यांच्या वाहनांचा ताफा आला असतांना संजय जाधव तिथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. गंगाखेड तालुक्यात त्यांचा नियोजित दौरा होता, यानिमित्ताने जाधव यांनी त्यांची भेट घेत सत्कार केला.
काही मिनिटांच्या भेटीत या दोघांमध्ये चर्चा झाली आणि जरांगे पाटील जाधव यांचे स्वागत स्वीकारून पुढे निघून गेले. जरांगे पाटील यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्याचे जाधव यांनी सांगितले. राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून गाजतो आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याविरोधात ओबीसींनी एल्गार सभा घेत आक्रमक पावित्रा घेतला.
यातून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघात या संघर्षाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यामुळे परभणीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न लढता जातीयवादावर गेल्याचा आरोप केला होता.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
या जातीयवादातूनच मराठा समाज एकवटला आणि त्यांनी मला मतदान केले. बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना आणि परभणीत मला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फायदा झाला आणि आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहोत, असेही जाधव यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आज जाधव यांनी मनोज जरांगे यांची घेतलेली भेट आणि केलेला सत्कार यांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.