Nagar News : नगर जिल्ह्यात आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्याची तारीख जशी जवळ येत आहे, तसे स्थानिक ओबीसी नेते आक्रमक शैलीत गावपातळीवर मेळावा यशस्वी होण्यासाठी चौकसभांचा जोर वाढवत आहेत. 'ओबीसींना घटनेने दिलेले हक्काचे आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो हाणून पाडण्यासाठी ओबीसींनी जात-पात आणि धर्म विसरून आणि राजकीय जोडे बाजूला सारून एकत्र येणे गरजेचे आहे. मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका मराठा समाजासाठी खरंच हिताची आहे का, हे एकदा मराठा समाजानेच तपासून बघितले पाहिजे. त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. हा कठपुतलीचा खेळ सुरू झाला आहे,' अशी टीका ओबीसींचे ज्येष्ठ कार्यकर्ते मीनानाथ पांडे यांनी केली. (OBC Reservation)
ओबीसींच्या नगरमधील एल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या कोतूळ येथे आयोजित सभेत मीनानाथ पांडे बोलत होते. कोतूळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश भुजबळ सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत कोतूळ आणि आजूबाजूच्या परिसरातून नगर येथे होत असलेल्या एल्गार मेळाव्यासाठी एक हजारपेक्षा जास्त ओबीसीबांधवांना नेण्याचे नियोजन करण्यात आले.
मीनानाथ पांडे यांनी सद्यःस्थितीच्या राजकारणावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. राजकारण आणि समाजकारण खूप केले. परंतु अलीकडच्या काळातील बिघडलेले राजकारण गावकुसासाठी गंभीर होत चालले आहे. गावातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे राजकारण पोहोचले आहे. यातून पुढे गंभीर स्वरुपाच्या सामाजिक समस्या उभ्या राहतील. अशा काळात गावातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी एकत्र राहिले पाहिजे. आता राजकारण करण्याची वेळ नाही. समाजासाठी काम करण्याची वेळ आहे. ओबीसींना घटनेने आरक्षण दिले आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी मैदानात आलेच पाहिजे, असे मीनानाथ पांडे यांनी म्हटले.
मराठा समाजाला, आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसींच्या आरक्षणाविरोधात बोलू लागल्याने गावातील मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये (OBC) संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राजकीय खेळात गावकुस उद्ध्वस्त करण्याचा हा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही मीनानाथ पांडे यांनी म्हटले. यावेळी अकोले नगरपंचायतीचे नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, गणेश ताजणे, श्रीनिवास रेणुकादास, वसंतराव बाळसराफ यांची भाषणे झाली.
नगर शहरात तीन फेब्रुवारीला क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदानावर दुपारी तीन वाजल्यानंतर होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याला श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातून 30 ते 35 हजार ओबीसीबांधव येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे आणि समता परिषदेचे शहराध्यक्ष विवेक गिरमे यांनी ही माहिती दिली.
Edited By : Rashmi mane
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.