Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली आणि त्यांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. गेली दोन वर्षे या बहिणींची आठवण सरकारला आली नव्हती. ही योजना विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच आणण्यात आली आहे, याचा प्रत्यय नुकताच आला. त्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अपक्ष आमदार रवी राणा यांनी सरकारच्या लाडक्या बहिणींना थेट धमकीच देऊन टाकली. एक भाऊ धमकी देत असताना दुसरे भाऊ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत.
छोट्या ग्रामपंचायती, सेवा सहकारी संस्था, बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांची संख्या कमी असते. कोणत्या मतदाराने काय केले, म्हणजे कोणाला मतदान केले, हे कळू शकते. अशा निवडणुकींतही मतदारांना पैसे वाटपाचे प्रकार घडतात. काही मतदार बेरकी असतात. पैसे घेऊनही ज्याला करायचे आहे त्यालाच मतदान करतात. मग पैसे देणाऱ्याचा पारा चढतो आणि त्यातून हाणामाऱ्यांसारखेही प्रकार घडतात. मत न दिलेल्या मतदारांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. लाडकी बहीण योजनेबाबतही आमदार रवी राणा यांनी अशाच प्रकारचे विधान करून खळबळ माजवून टाकली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत मला मतदान नाही केले तर तुम्हाला दिलेले 1500 रुपये परत काढून घेणार, असे धक्कादायक विधान आमदार राणा यांनी केले. आमदार राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. वादग्रस्त विधाने करण्याची त्यांना जणू सवयच आहे. त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून पराभव झाला आहे. नवनीत राणा यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालिसा पठणावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडवली होती. या प्रकरणात नवनीत राणा यांना कारागृहात जावे लागले होते. इतके करून पत्नीचा पराभव झाल्यामुळे आमदार रवी राणा यांनी धसका घेतला आहे.
या धसक्यामुळेच आमदार राणा यांच्या तोंडून वादग्रस्त विधान निघाले, तेही लाभार्थी महिलांच्या समोरच. लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणापत्रांचे आमदार राणा यांच्या हस्ते महिलांना वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर महिलांना 1500 एेवजी 3000 रुपये दिले जातील. यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला मत नाही दिल्यास तुम्हाला देण्यात आलेले 1500 रुपये तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून परत काढून घेईन, असे आमदार राणा म्हणाले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मनात जे आहे, ते आमदार राणा बोलून गेले आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षांचे नेते, आमदार, खासदार उठसूठ लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत आहेत. त्यामुळे महायुती सरकार अन्य सर्व आघाड्यांवर सपशेल अयशस्वी ठरले आहे, असे लोकांना वाटू शकते, याचा विसर सरकारला पडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलींडरची किंमत 900 रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिल्यामुळे ती नाराजी दूर होईल, असा सत्ताधाऱ्यांचा अंदाज आहे. विरोधक या योजनेवर टीका करत आहेत. एका अर्थाने विरोधकांनी या योजनेचा धसका घेतला आहे. मात्र आमदार राणा (Ravi Rana) यांच्या वक्तव्यामुळे योजनेबद्दल महिलांच्या मनात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना ही रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे. त्यादिवशी लाभार्थी महिलांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' असे नाव उपक्रमाला देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्ष या योजनेचा फायदा घेण्यासाठी सरसावले आहेत. ही योजना महिलांच्या काळजीपोटी नसून त्यामागे राजकीय हेतू आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. हेतू राजकीय नसता तर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरच ती लागू केली गेली असती. पक्षांची फोडाफोडी केल्यामुळे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला आणि सरकारला लाडक्या बहिणी आठवल्या. त्यातच आता एक भाऊ धमकावतो आहे, तर दुसरा संवाद साधून लाडीगोडी करण्याचा प्रयत्न करत आहे.