MLA Vikram Kale: शिक्षक आमदार विक्रम काळे या वेळी तरी घेणार का खासदारकीचं प्रमोशन?

Dharashiv Lok Sabha Constituency 2024:धाराशिव मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सुटल्याची माहिती आहे. मात्र, उमेदवार कोण, याबाबत काथ्याकूट सुरूच आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या उमेदवारीवर सर्वांनी सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे.
MLA Vikram Kale
MLA Vikram KaleSarkarnama

विधानसभेच्या निवडणुकीत धााराशिव-कळंब मतदारसंघातून (Dharashiv Lok Sabha Constituency 2024) राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह शिक्षक आमदार विक्रम काळे ऊर्फ बप्पा (MLA Vikram Kale) यांना झाला होता. तेव्हा त्यांनी काही कारणामुळे असमर्थता दर्शवली होती. असमर्थता हा नकार समजून नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दुसरा उमेदवार दिला होता. त्यानंतर ही नाराजी अनेक दिवस चर्चेत होती. यातच आमदार काळे यांची मंत्री होण्याची इच्छाही सातत्याने व्यक्त होत नाराजीमागे दडून राहात होती.

आता लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुटल्यानंतर पुन्हा उमेदवारीसाठी आमदार काळे यांचे नाव पुढे येत आहे. महायुतीमधील सर्व गटांनी आमदार काळे यांच्या नावाला सहमती दर्शवली असली तरी अजून त्यांचे नाव निश्चित झाले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, याची सुरुवातीपासून उत्सुकता होती. माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचा मतदारसंघात वावर वाढल्याने मतदारसंघ भाजप आपल्या वाट्यात घेणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला. यामुळे उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याचे नाव पुढे आले. मात्र, त्यांनी घड्याळाऐवजी धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढण्याची अटकळ बांधली. माजी आमदार बसवराज पाटील यांनी लिंगायत व मराठा वादात भविष्य नसल्याचे सांगत नकार दिला. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही आपला औसा विधानसभा मतदारसंघातच प्रभाव स्पष्ट करून खासदारकीचे प्रमोशन टाळले. विक्रम काळे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धाराशिव तालुक्यातील तेरजवळील पळसप हे त्यांचे गाव.

MLA Vikram Kale
Ramdas Athawale News: फडणवीसांच्या कुठल्या आश्वासनानं आठवलेंनी सोडलं शिर्डीवर पाणी?

त्यानंतर तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आले. मात्र, त्यांनीही भाजपकडूनच निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्याने अजातशत्रू म्हणून आमदार काळे यांच्या नावावर नकारघंटा वाजवलेल्यांनी शिक्कामोर्तब केल्याचीही चर्चा घडून येत आहे.

आमदार काळे यांनी 17 महिन्यांपू्र्वी शिक्षक आमदार म्हणून विजय मिळवत या आमदारकीची चौथी टर्म सुरू केली आहे. शिक्षक आमदार वसंतराव काळे यांच्या निधनानंतर 42 महिन्यांची पहिली टर्म पूर्ण करत त्यांनी शिक्षक मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघावर त्यांनी सलग चार निवडणुकीतून पगडा निर्माण केला आहे. आपल्या कर्तृत्वातून त्यांनी या मतदारासंघावर वर्चस्व निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले होते.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com