Mumbai Politics: लढाई मुंबईच्या वर्चस्वासाठी; ठाकरे पक्षासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार

BMC Local Body Election 2025: शिवसेना ठाकरे पक्षासाठी ही पडझड पालिका निवडणुकीसाठी परवडणारी नाही. परिस्थिती अशी असली, तरीही ठाकरे यांचा पक्ष अजूनही मुंबईत मजबूत असल्याचे दिसते.
BMC Local Body Election 2025
BMC Local Body Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता भारतीय जनता पक्ष सरसावला आहे. भाजपला काही करून मुंबई जिंकायची आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्ष अशीच होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने, येत्या पावसाळ्यात राज्य निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्साह वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मुंबईवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महायुतीशी दोन हात करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

ठाकरेंसमोर आव्हान

मुंबईवर १९८५ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना एकसंघ होती. शिवसेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आदी नेते बाहेर पडले; पण शिवसेना कायम एकसंघ राहिली. मराठी माणसांनी शिवसेना वाढविली, घडविली; मात्र मधल्या काळात शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून वेगळा गट केला. शिवसेना पक्षासह धनुष्यबाणही त्यांना मिळाले. या फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे उपमुख्यमंत्री झाले. आता त्यांनी मुंबईत पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शिवसेना ठाकरे पक्षातून काही माजी नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात महत्त्वाचे स्थान दिले. त्यांना पक्षात मोठी पदे दिली. शिवसेना ठाकरे पक्षाची मोठी पडझड झाली आहे. कालपरवापर्यंत शिंदे यांना अपशब्द वापरणारे माजी महापौर दत्ता दळवीही शिंदे यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांची ताकद वाढल्याचे दिसत आहे. ठाकरे यांना सोडून गेले आहेत, त्यांची कारणे वेगवगळी असली, तरी शिवसेना ठाकरे पक्षासाठी ही पडझड पालिका निवडणुकीसाठी परवडणारी नाही. परिस्थिती अशी असली, तरीही ठाकरे यांचा पक्ष अजूनही मुंबईत मजबूत असल्याचे दिसते.

BMC Local Body Election 2025
S.Jaishankar: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! ऑपरेशन सिंदूरनंतर एस.जयशंकर यांचा नवा डाव; 'दिल्ली टू काबुल'

भाजपने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा सुरूंग लावण्याचे काम केले. त्यात ते यशस्वी झाली. त्याचा फायदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला. आता सोन्याची कोंबडी असलेल्या मुंबई महापालिकेवर ताबा मिळविण्यासाठी शिंदे यांचा कसा उपयोग करता येईल, याचा विचार भाजप करीत आहेत. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्याचा विचार ठाकरे यांनीही करायला करण्याची गरज आहे. पालिका निवडणुकीत हजार-पाचशे मतेही निवडून येण्यासाठी महत्त्वाची असतात. भाजप नेमका याच गोष्टीचा फायदा उठविणार आहे. ठाकरे यांची जेवढी पडझड होईल, तेवढी भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

युती एकत्र, आघाडी नाही?

लोकसभेच्या निवडणुकीवेळी मुंबईतील बोरिवली, कांदिवली, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि मलबार हिल या सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपला मोठी आघाडी मिळाली होती. या मतदारसंघांत भाजपविरोधात लढण्यास विरोधी पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्या कमी आहे. या परिसरात जिंकण्याची भाजपला खात्री आहे. भाजपपुढे आपला निभाव लागणार नाही, असे काहीसे चित्र या मतदारसंघांत विरोधी पक्षांमध्ये आहे.

पालिका निवडणुकीसाठी हे मतदारसंघ सुरक्षित ठेवून भाजप इतर मतदारसंघांत बांधणी करीत आहे. महापालिका निवडणुकीत महायुती झाल्यास, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबईत फारशी ताकद नसल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या जागा त्यांना दिल्या जातील; मात्र महायुतीत भाजप सर्वाधिक जागा घेऊन, शिंदे यांच्या पक्षाला कमी जागा दिल्या जातील. भाजपचे १०० जागा जिंकण्याचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक चित्र आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवावी, असे दिसत नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागले आहे. पाण्यासह विविध प्रश्नावर त्यांची विभागवार आंदोलने झाली. शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद अजूनही मुंबईत आहे. ठाकरे यांना मानणारा समाजघटक अजूनही कायम आहे. त्यामुळे पालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपशी दोन हात करण्याची तयारी ठाकरे यांनी केली आहे.

राजकीय पक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडी करून लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुक लढविली. या निवडणुकांमध्ये महायुतीचे वर्चस्व कायम राहिले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता भाजप सरसावरला आहे. भाजपला काही करून मुंबई जिंकायची आहे, तर ठाकरे गटाची आताची अस्तित्वाची लढाई असून, त्यांना मुंबईवरील पकड अधिक मजबूत करावी लागणार आहे. सध्या प्रत्यक्ष निवडणुकीला वेळ असला, तरी तोपर्यंत अनेक घडामोडी घडतील, परंतु ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे अशीच होणार असल्याचे चित्र आहे.

BMC Local Body Election 2025
Local Body Election: पाच वर्षातील सर्वात मोठा प्रश्न; नगरसेवक नसल्याने प्रश्न कोणाकडे मांडायचे? प्रशासनाचे अपयश!

जातीय समीकरणे

सर्वच राजकीय पक्ष मुंबईत जातीय समीकरणे गृहीत धरून व्यूहरचना करीत असल्याचे दिसून येत आहे. पाचशे ते हजार मते विभागली, तरी ते उमेदवारासाठी धोक्याचे असते. मुंबईत मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएममधील मतविभागणी भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षासाठी नफा-तोट्याचे ठरणार आहे. तशी व्यूहरचना सर्वच पक्षांकडून केली जाणार आहे.

मुदतठेवी कळीचा मुद्दा

मुंबई महापालिकेच्या विविध बँकांत तब्बल ९२ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी जमा होत्या; मात्र गेल्या अडीच वर्षांत महापालिकेने दोन लाख कोटींची कामे हाती घेतल्याने तब्बल ११ हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या आहेत. आता बँकांत ८१ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार १६ हजार ६९९ कोटी रुपयांच्या ठेवी आणखी मोडीत काढण्यात येणार आहेत.

स्थानिक प्रश्नांवर लढत

मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास, धोकादायक इमारती, रस्ते वाहतूक, पार्किंग, पाणीप्रश्न, प्रलंबित प्रकल्प आणि स्थानिक समस्या हाच निवडणुकीचा प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे.

जबाबदारी लोकप्रतिनिधींना

निवडणुकीची प्रत्यक्ष जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींवर सोपविण्यात येणार आहे. स्थानिक आमदार, खासदार तसेच माजी नगरसेवक यांच्यात २२७ मतदारसंघाची विभागणी केली जाणार आहे.

मनसे फॅक्टर महत्त्वाचा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोन्ही पक्षांतील त्यांचे हितचिंतक तशा स्वरूपाची बॅनरबाजीही करू लागले आहेत; मात्र दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता काही दिसत नाही. तसा कोणताही फॉर्म्युला दिसत नाही. दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीला दोघे भाऊ एकत्र यावे, असे वाटत नाही; मात्र राज ठाकरे यांचा मनसे पालिका निवडणुकीत मराठी मतांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com