Local Body Elections 2025: भाजपच्या छत्रछायेखाली शिवसेनेला वाटतेय सुरक्षित; महायुतीसाठी शिंदेच आग्रही

Mumbai–Thane Local Body Elections Shinde–Fadnavis Strategy: एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाची ताकद आणि भाजपची शक्ती यांच्यातला फरक ते जाणून आहेत. त्यामुळेच भाजपचा पदर सोडण्याचा ते विचारही करु धजावत नसावेत.
Mumbai–Thane Local Body Elections Shinde–Fadnavis Strategy:
Mumbai–Thane Local Body Elections Shinde–Fadnavis Strategy:Sarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या चार महापालिका वगळता इतरत्र भाजप स्वतंत्र निवडणुका लढवेल, असे सूतोवाच केले. त्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी नवी दिल्ली गाठून अमित शहांची भेट घेतली आणि महायुती करूनच निवडणुका लढवाव्यात, असे आर्जव त्यांच्याकडे केले. लोकसभा व विधानसभा एकत्र लढल्यानंतर व सतत भाजप या महाशक्तीच्या पाठिंब्यावरच यश पदरात पाडून घेतल्यानंतर त्यांनी हे आर्जव केल्याची चर्चा आहे.

दिवाळी संपली असली तरी यापुढच्या काळात राजकीय फटाके वाजवायला सुरुवात झाली आहे. पत्रकारांसोबत दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये बॉम्ब लावत त्याला सुरुवात केली. या अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांनी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या चार महापालिका वगळता इतरत्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. हा इशारा ज्यांच्यासाठी होता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुढच्याच विमानाने दिल्लीला रवाना झाले.

भाजपच्या पदराला धरुन मागील तीन वर्षे प्रवास झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने असे वाऱ्यावर सोडल्यावर त्यांच्यासाठी हा प्रवास अवघड असण्याचीच चिन्हे आहेत.

एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाची ताकद आणि भाजपची शक्ती यांच्यातला फरक ते जाणून आहेत. त्यामुळेच भाजपचा पदर सोडण्याचा ते विचारही करु धजावत नसावेत. त्यामुळे ते कितीही नाराज झाले तरी मौन धारण करुन चार दिवस दरे गावात जावून ‘विपश्यना’ करतात. गावात गेल्यावर राजकारणाची पांढरी वस्त्रे ते त्यागतात. शेतात मन रमवून हवापालट करतात. पण परत येवून भाजपसोबत मैत्रीच्या आणाभाका घेतात. शिंदे भाजपवर इतका जीव ओवाळून टाकत असताना भाजपने मात्र त्यांच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याने शिंदे सेनेच्या पोटात कालवाकालव होणे साहजिक आहे.

Mumbai–Thane Local Body Elections Shinde–Fadnavis Strategy:
Girish Mahajan: अमित शहांचा शब्द गिरीश महाजनांनी पाळला! स्थानिक आमदाराचा विरोध डावलून दिला विरोधकांना प्रवेश!

महायुतीसाठी शिंदेच आग्रही

मुंबईसह मुंबई महानगर प्रादेशिक विकास निगममधील (एमएमआरडीए) महापालिका वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून नव्हे तर शिवसेना शिंदे पक्ष म्हणून स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ शिंदेंवर येण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना विभक्त झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था ही तिसरी निवडणूक असणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचा स्ट्राईक रेट हा इतर कोणत्याही पक्षापेक्षा अधिक असल्याने शिेंदेंच्या शिवसेनेला खरेतर भिती असण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीत सात खासदार, विधानसभा निवडणुकीत ५७ आमदार त्यांनी निवडून आणले आहेत. या बळावर शिंदेंनी खरेतर स्वतंत्रपणे निवडणुकीचे मैदान मिळणार म्हणून आनंद मानायला हवा होता. पण तसे होताना दिसत नाही. दिल्ली भेटीत शिंदेंनी महायुती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावी यासाठी भाजप श्रेष्ठींकडे आग्रह धरला असल्याचे समजते.

महायुतीशिवाय निवडणुकीला स्वतंत्र सामोरे जाण्यास शिंदेंची शिवसेना का कचरत असावी? यामागच्या कारणांचा शोध शिवसेना शिंदें पक्षाच्या जन्मातच सापडतो. शिवसेना शिंदे पक्षाच्या जन्माची पहाट होत होती त्यावेळेस ‘आपल्या पाठीशी महाशक्ती आहे’, असा विश्वास पक्षनेते शिंदे यांनी स्वत:ला आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या आमदार - खासदारांना दिला होता. ‘त्या’ महाशक्तीनेच भाजपपेक्षा कमी आमदार असतानाही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत देखील त्यांना स्थानापन्न केले होते. त्यानंतरही शिंदेचे कोडकौतुकच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने केले. मात्र त्या शक्तीविना निवडणुकीला सामोरे जाताना शिंदेंच्या शिवसेनेचे पाय जड होणे साहजिकच आहे.

ज्यांच्या आशीर्वादाने पक्षाचा जन्म झाला त्यांच्यासमोरच बेडक्या फुगवून ताकद दाखवावी लागणार आहे. महायुतीतील मित्रपक्षांना निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा मार्ग मोकळा आहेच. मात्र निवडणुकीत जागा जिंकून येण्याची एकट्या पक्षाची क्षमता किती आहे याची चाचणी या निवडणुकीत होणार आहे. त्यात पानिपत झाले तर हात दाखून अवलक्षण केल्यासारखेच होईल. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची असावी यासाठी महायुतीमध्ये निवडणुका लढता याव्यात यासाठी शिंदेंच्या पक्षाचा प्रयत्न आहे.

शिवाय राज्यात भाजपसोबत सत्तेमध्ये शिवसेना पक्ष असला तरी भाजपची पक्षाची यंत्रणा जितकी मजबूत आणि सर्वदूर आहे, तेवढी शिंदेंच्या शिवसेनेची नाही. त्यामुळे या यंत्रणेचा उपयोग देखील शिंदेंना होतो. तसेच मुंबई आणि एमएमआर परिसर वगळता इतर ठिकाणी भाजप - शिवसेना शिंदे स्वतंत्र लढली तर शिवसेना शिंदेंच्या स्थानिक आमदार - खासदारांसमोर भाजपचे मोठे आव्हान असेल.

भाजपच्या यंत्रणेला आव्हान देण्यापेक्षा त्यांच्यासोबत जुळवून घेणे शिंदे सेनेसाठी अधिक सोयीचे ठरण्याची शक्यता आहे. भाजपसोबतच शिवसेना ठाकरे पक्ष मनसेसोबत मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे चार हिंदुत्ववादी पक्ष मैदानात असणार असल्याने शिंदेंचे स्थान यामध्ये कितवे असणार आहे? तसेच शिवसेना ठाकरे आणि मनसे यांना तोंड देणे, काँग्रेस राष्ट्रवादी यांचे आव्हान स्वीकारणे शिवसेना शिंदे पक्षासाठी डोईजड ठरणार आहे. त्यामुळेच भाजपच्या छत्रछायेखाली स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाव्यात याच्या प्रयत्नात शिंदे असल्यास नवल वाटायला नको.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com