Nagpur Municipal Election 2025: भाजपसाठी प्रभागरचना ठरणार ‘गेम चेंजर’! फडणवीसांची रणनीती यशस्वी?

Nagpur Election 2025 BJP Benefited by Prabhag Rachna: नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत १०८ नगरसेवक जिंकून आल्याने भाजप निश्चिंत असल्याचे यावरून दिसून येते.
Nagpur Municipal Election 2025
Nagpur Municipal Election 2025 Sarkarnama
Published on
Updated on

तुषार पिल्लेवान

नागपूर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपला विक्रमी यश मिळाले होते. काँग्रेसमधील विकोपाला गेलेली भांडणे, पाडापाडीचे राजकारणासह भाजपच्या यशात प्रभाग रचनेचाही मोठा वाटा होता. मुळात चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनीच सर्वप्रथम घेतला होता. हा निर्णय जाहीर होताच त्यावेळी अर्धी लढाई भाजपने जिंकली होती. आता पुन्हा फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आणि त्यांच्याच शहरात झालेल्या नव्याने झालेल्या प्रभाग रचनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भाजप पुन्हा आपल्या सोयीने प्रभागांमध्ये मोठे फेरबदल करतील असेच सर्वांना वाटत होते. विरोधकांनीही हीच शंका व्यक्त केली होती. मात्र नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फक्त खानापूर्ती केल्याचे दिसून येते. एकूणच मागील निवडणुकीत १०८ नगरसेवक जिंकून आल्याने भाजप निश्चिंत असल्याचे यावरून दिसून येते.

नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पोळ्याच्या दिवशी २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. त्यानुसार राज्याची उपराजधानी असलेल्या आणि ‘अ’ वर्गाच्या श्रेणीमध्ये मोडणाऱ्या नागपूर महापालिकेत यंदाही २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ३८ प्रभागांची संख्या राहणार असून, यातून १५१ नगरसेवक निवडून येणार आहेत.

जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत २०१७ च्या तुलनेत फारसे बदल नसले तरी मोजक्या चार ४ प्रभागांमध्येच आकडेवारीत किरकोळ बदल दिसून येते. त्यामुळे या प्रभागरचनेचा याही निवडणुकीत यापूर्वीच्या सत्ताधारी भाजपलाच फायदा होईल, असे दिसून येते. शिवाय शहरात केंद्र आणि राज्यातील सरकारकडून झालेल्या विकास कामांचा फायदाही भाजपला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nagpur Municipal Election 2025
Political Horoscope: केंद्रात फडणवीसांचे महत्त्व वाढणार; PM पदाच्या स्पर्धेत अग्रक्रमाने नाव येण्याची शक्यता

नागपूर महापालिकेचा विचार केल्यास येथे गेल्या पंधरा वर्षांपासून सलग भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे. मात्र दहा वर्षे भाजपला सत्तेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या वापराव्या लागल्या होत्या. २०१७ मध्ये भाजपने प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन केली. भाजपचे १५१ पैकी तब्बल १०८ नगरसेवक निवडून आली. याकाळात प्रवीण दटके आणि संदीप जोशी महापौर झाले. सध्या दोघेही आमदार आहेत. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेवर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापौर म्हणून पद भूषविले आहे.

Nagpur Municipal Election 2025
Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट: बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

३८ पैकी चार प्रभागांत किरकोळ बदल

नागपूर मनपातील पदाधिकारी राज ४ मार्च २०२२ मध्ये संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी महापालिका निवडणुकीचे वातावरण पुन्हा तापले आहे. २०२२ मध्ये कार्यकाळ संपला असला तरी, २०१७ मध्ये निवडणुका झाल्या त्या आधारे २०२५ च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसाठी आकडेवारी घेण्यात आली. त्यानुसार, आता आठ वर्षांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आहे. दरम्यान, शहरात शेकडो मालमत्ता वाढल्या आहेत. त्यानुसार लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे, संख्येत निश्चितच वाढ होण्याची शक्यता होती. परंतु २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार, ३८ प्रभागांपैकी फक्त चार प्रभागांमध्येच आकडेवारीत किरकोळ बदल दिसून येत आहेत.

प्रभाग रचनेस फारसे बदल नाही

सध्याच्या प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचे मध्य नागपूरचे आमदार व माजी नगरसेवक प्रवीण दटके यांचा प्रभाग क्रमांक दहा दक्षिणामूर्ती या मध्येही फारसे बदल दिसून येत नाहीत. तसेच भाजपचे शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग क्रमांक ११ बजेरिया आणि आजूबाजूच्या वस्त्या यांच्यात फारसा बदल दिसून येत नाही. याशिवाय भाजपचे विधान परिषद सदस्य व माजी महापौर संदीप जोशी यांचा प्रभाग क्रमांक १७ यामध्येही काहीच बदल झाल्याचे दिसून येत नाही.

भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांचा प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्व जुन्याच वस्त्यांचा समावेश आहे. भाजपचे वरिष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांचा प्रभाग क्रमांक ३५ यामध्येही काहीच बदल झालेला नाही. याप्रभागात केवळ जुने पुनर्वसन सीमारेषेत समावेश आहे. परंतु या प्रभागात शिवणगाव असा उल्लेख नाही. तो प्रभाग क्रमांक ३८ मध्ये आहे. हा एका वस्तीचा संभ्रम या प्रभागात दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ३८ काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी नगरसेवक प्रफुल गुडधे यांचा प्रभाग आहे.

आकडेवारीत किरकोळ बदल

प्रारूप प्रभाग रचनेतील आकडेवारी पाहिली तर केवळ आकड्यांचा घोळ दिसून येतो. ज्या ४ प्रभागांमध्ये आकडे बदलण्यात आले, त्या २ प्रभागांची लोकसंख्या वाढली आहे. तर इतर २ प्रभागांमध्ये तीच संख्या कमी करण्यात आली आहे. २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील एकूण लोकसंख्या ६४,६७६ होती. तर आता या प्रभागातील लोकसंख्या ६७,७७७ इतकी नोंदविण्यात आली.

त्यानुसार, प्रभागातील लोकसंख्या ३१०१ ने वाढली आहे. परंतु प्रभाग ७ कडे पाहिले तर २०१७ मध्ये लोकसंख्या ६४,३३० होती. ती आता कमी होऊन ६१,२२९ झाली आहे. तर, २०१७ मध्ये, प्रभाग २३ ची लोकसंख्या ६३,०२५ होती. ती आता ६३,४७१ आहे. त्यानुसार, येथे ४४६ वाढ झाली आहे. तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये २०१७ मध्ये लोकसंख्या ६०,०८८ होती. तर आता ती ५९,६४२ आहे. त्यानुसार, या प्रभागाची लोकसंख्या ४४६ ने कमी झाल्याचे दिसून येत आहे.

एससी-एसटीच्या आकडेवारीत फक्त फेरफार

उल्लेखनीय की, एकूण लोकसंख्येनुसार चार प्रभागांमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मतदारांच्या आकडेवारीत फक्त फेरफार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये, प्रभाग ६ मध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या २१,३०४ होती. तर आता ती २२,०७१ आहे. त्यानुसार, येथे ७६७ अनुसूचित जातीचे मतदार वाढले आहेत.

जर आपण प्रभाग ७ वर नजर टाकली तर २०१७ मध्ये अनुसूचित जातींची संख्या २९,९४६ होती. यावर्षी ती २९,१७९ आहे. त्यानुसार, येथे ७६७ अनुसूचित जातींची संख्या कमी झाली आहे. प्रभाग २३ मध्ये २०१७ मध्ये अनुसूचित जातींची संख्या ९,८४३ होती. तर आता ती १०,०४४ आहे. त्यामुळे येथे २०१ अनुसूचित जातींची संख्या वाढ दिसून येते. प्रभाग २६ चा विचार केल्यास २०१७ मध्ये १०,४८२ होते. जे आता १०,२८१ आहे. त्यानुसार २०१ मतदार कमी झाले आहेत. अनुसूचित जातींसाठीही असेच आकडे आहेत.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, महानगरपालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून राज्य सरकारला पाठवला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीने राज्य सरकारने प्रारूप प्रभाग रचनेची घोषणा केली. प्रभाग निर्मितीसाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, १७ आणि १८ जून रोजी जनगणनेची माहिती तपासण्यात आली. १९ जून ते ४ जुलै दरम्यान अधिकाऱ्यांनी स्थळांची तपासणी केली. ५ ते १० जुलै दरम्यान गुगल मॅप्सवर नकाशे तयार करण्यात आले. ११ ते २४ जुलै दरम्यान नकाशांनुसार प्रभागांच्या सीमांची छाननी करण्यात आली.

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू असताना विधानसभा मतदारसंघांची सीमा आणि महापालिकेचे झोन कार्यालयाचा विचार नवी प्रभाग रचना करताना विचारात घ्यावे असे निवेदन केले होते. मात्र याची फारशी दखल घेण्यात आलेली नाही. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रभागांचा काही भाग दक्षिण नागपूर आणि उत्तर नागपूरच्या मतदारसंघात समाविष्ट आहे. दोन प्रभागाच्या सीमा वेगवेगळ्या महापालिकेच्या झोन कार्यालयांच्या हद्दीत येतात. त्यामुळे विकास कामे करताना अनेक तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.

विकासकामांचा भाजपला फायदा?

विकास प्रकल्प आणि नवी प्रभाग रचना यांचा परस्पर संबंध अनेक प्रभागांमध्ये दिसून येते. ज्यामध्ये पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास कामे सुरू आहेत. या विधानसभा क्षेत्रात सलग १५ वर्षांपासून भाजपचेच आमदार निवडून येत असून, या भागातूनच केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना प्रत्येकच निवडणुकीत शहरातील सहाही विधानसभा मतदार संघांपेक्षा पूर्व नागपुरातूनच सर्वाधित मताधिक्य मिळत आले आहे.

अशातच या विधानसभा क्षेत्राचा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्येही विकासकामांचा प्रचंड जोर आहे. या विधानसभेत सुमारे सहा प्रभाग येत असून, येथे सध्या सिम्बॉसिस युर्निर्व्हसिटी, ३०० खाटांचे नवे रूग्णालय, साई क्रीडा अकादमी, अनेक उड्डाणपुले, विविध मोठी प्रतिष्ठाने आदी येथे आली आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्‍चिम नागपुरातही मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. येथे रस्त्यांचे सुशोभीकरण, मेट्रोचे जाळे उभारण्यात आले.

उद्यानांचे सुशोभीकरण, अत्याधुनिक वाहतूक सिग्नल प्रणाली, वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांचे चकाकीकरण विविध कामे पूर्ण झाली व काही प्रगतिपथावर आहेत. याशिवाय दक्षिण नागपुरात रिंगरोडवरील वाहतूक आटोक्यात आणण्यासाठी म्हाळगीनगर ते मानेवाडा चौकापर्यंत उड्डाणपूल तयार होत असून यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे.

याचा फायदा पूर्व-दक्षिण नागपुरातून एमआयडीसी, हिंगणा, बुटीबोरी, मिहान येथे कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे. पश्‍चिम नागपुरात सर्वसामान्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सुरू झाले आहे. मध्य नागपुरातील सुभाष रोड येथे मोठे व्यापारी संकुल तयार होत आहे. याशिवाय मध्य, पूर्व, उत्तर, पश्‍चिम आणि दक्षिण-पश्‍चिम नागपुरात मोठ्या प्रमाणात ‘मेट्रो रेल्वे’चे जाळे उभारण्यात आल्याने याचा फायदा नागरिकांना होत असून, त्यांचा प्रवास सुकर होण्यास मदत झाली आहे. शहरात मागील दहा-बारा वर्षांच्या काळात एक ना अनेक अशी कामे झाली असून त्यामुळे खऱ्या अर्थाने नागपूरला ‘स्मार्ट सिटी’चा लुक आला आहे.

स्वतंत्र लढण्याचाच इतिहास

नागपूर शहरात भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षाचे प्रामुख्याने अस्तित्व आहे. याच कारणामुळे दोन्ही पक्षांना महायुती आणि महाविकास आघाडी नको आहे.शिवसेना भाजपची युती असताना आठ ते दहा नगरसेवक निवडून येत होते. हीच स्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची होती. मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेना दोन तर राष्ट्रवादी एका नगरसेवकावर येऊन थांबली. सध्या भाजपचे शहरात चार आमदार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. उद्धव सेनेची ताकद जवळपास संपुष्टात आली आहे.

शिंदे सेनेला यावेळी खाते उघडायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली आहेत. अशी परिस्थिती भाजप आणि काँग्रेस त्यांच्यासाठी काही जागा सोडण्याची शक्यता नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही याची शाश्वती वाटत नाही. १० नगरसेवक असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या हत्तीचीही ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. एकूणच नागपूरमध्ये भाजपविरोधात युती आणि आघाडीची सध्यातरी शक्यता दिसत नाही.

ठळक मुद्दे

  • एकूण लोकसंख्या २४,४७,४९४

  • अनुसूचित जाती ४,८०,७५९

  • अनुसूचित जमाती १,८८,४४४

एकूण प्रभाग ३८

  • एकूण सदस्य संख्या १५१

  • चार सदस्यीय

  • प्रभाग संख्या ३७

  • तीन सदस्यीय प्रभाग संख्या 

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com