
📝 3-Point Summary
महायुतीची आक्रमक तयारी: नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकत्रित व्यूहरचना आखत प्रचार सुरू केला आहे. भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीचे वर्चस्व वाढले आहे.
महाविकास आघाडीतील विस्कळीतपणा: काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अद्याप समन्वय नाही. पदांच्या गोंधळामुळे गटबाजी आणि नेतृत्वातील संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रत्येक पक्षात अंतर्गत मतभेद: भाजप-शिंदे गटात प्राधिकरणावरून तणाव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवडीवरून वाद, काँग्रेसमध्ये कार्यकारिणीबाबत संभ्रम, यामुळे सर्व पक्षांत अंतील संघर्ष सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नांदेड जिल्ह्यात भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंखनाद सभेच्या माध्यमातून व्यूहरचना आखली. याशिवाय महायुतीतील ‘राष्ट्रवादी’, शिवसेनाही संघटनबांधणीद्वारे वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे जनाधार असलेल्या नेत्यांना पक्षात घेतले जात आहे. दुसरीकडे काँग्रेससह ‘राष्ट्रवादी’ (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) हे ‘मविआ’तील घटक पक्ष नव्याने पुनर्बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती सर्वतयारीनिशी उतरण्याची व्यूहरचना पक्षश्रेष्ठी आखत आहेत. घटकपक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यात स्थानिक पुढाऱ्यांत पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात पूर्वी माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण आणि आता माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचा दबदबा आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात काँग्रेसचाच दबदबा होता. पण १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माजी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यात आता भाजपप्रणित महायुतीचा दबदबा वाढल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकत ‘मविआ’ला धोबीपछाड दिला. यामध्ये भाजपचे ५, शिवसेना (शिंदे गट) ३, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) एक आमदार निवडून आला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण हे निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेवर सर्वाधिक काळ काँग्रेसचीच सत्ता होती. परंतु आता येथे महायुतीची सत्ता आणण्यासाठी कसोटी लागणार आहे.
शहरात भाजपचे नगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या माध्यमातून प्रभागनिहाय बैठका घेऊन पक्षबांधणी केली जात आहे. तसेच ग्रामीण भागात ॲड. किशोर देशमुख व संतुक हंबर्डे या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून भाजपकडून संघटनावाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत ताकद दाखविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आजवर अव्वलस्थानी राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो की विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका यामध्ये पक्षाने आजवर आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यामुळे सध्याची जिल्हा कार्यकारिणी कायम राहणार, की, बदलणार याबाबत नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी काही महिन्यांपूर्वीच पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अन् नेते राहुल गांधी बिहारच्या निवडणुकीत व्यग्र असल्याने जिल्ह्यामध्ये अजूनही काँग्रेसच्या नवीन नियुक्त्या झालेल्या नाहीत. काँग्रेसमध्ये सर्व जिल्ह्यात शहर जिल्हाध्यक्ष आणि महानगर जिल्हाध्यक्ष अशी दोनच पदे आहेत. परंतु कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश कार्यकारिणीने नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि नांदेड शहर असे तीन पदाधिकारी नियुक्त केले होते.
प्रदेशाध्यक्ष बदलल्यामुळे जिल्ह्याची सर्वच नियुक्त्या बरखास्त करून नव्याने करण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे लावून धरली होती. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसते. नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठका घेत आहेत. महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी शहर-प्रभागात बैठकांचे नियोजन केले आहे. असे असले तरी येथे काँग्रेस पक्ष जोरकसपणे मैदानात उतरलेला दिसत नाही.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी निवडणुका होईपर्यंत जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलू नये, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. पण निवडणुका असल्याने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. पक्षीय हितासाठी कोणीही वाद घालू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना काही दिवस पक्षाचे काम करावे लागेल. जुना-नवा वाद न घालता ताकदीने सदस्य निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असा सल्ला त्यांनी दिला.
जिल्ह्यात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांमुळे अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ची ताकद वाढली आहे. अजित पवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट झाला. या नियुक्त्या करताना ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अन् आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये समन्वय होणे आवश्यक होते.
नांदेड उत्तर व नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना चर्चा करून नियुक्त्या जाहीर केल्या. पण नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना चिखलीकरांनी स्वतःच जिल्हाध्यक्षपदी शिवराज होटाळकर यांची निवड केल्याचे सांगितले. यावेळी भास्करराव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस दिसली. चिखलीकरांनी ज्येष्ठ नेते खतगावकर यांना विचारात न घेताच नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षाची निवड जाहीर करून माझ्या नेतृत्वातच दक्षिण नांदेडात ‘राष्ट्रवादी’ चालणार, असे संकेत दिले.
यामुळे पक्षांतर्गत गटबाजी उघड झाली. आगामी काळातही अनेकांना अनेक पदांवर संधी दिली जाईल, असा शब्दही भेटीसाठी आलेल्या नांदेड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दिला. ही भेट घेत असताना ‘राष्ट्रवादी’चे सर्व नवनियुक्त सर्व पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे भास्कररावांना दूर ठेवून चिखलीकर यांनी काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांचीच भेट घडवून आणल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
सध्या जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे सेनेने ‘जंबो’ कार्यकारिणी घोषित करून जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली. जिल्हाध्यक्ष बबनराव बारसे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटना बांधणीचे काम सुरू आहे. शिंदेंच्या सेनेला मोठे आव्हान असणार आहे. जिल्ह्यात सध्या शिंदे सेनेचे विधान सभेत तीन तर विधान परिषदेत एक असे चार आमदार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत गेल्यामुळे सध्या जिल्ह्यात ठाकरेंच्या सेनेचा एकही आमदार नाही.
त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात भक्कम पाय रोवले आहेत. येत्या स्थानिक निवडणुकीत तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करून सत्तेत असलेल्या शिंदेंच्या सेनेला एक प्रकारे आव्हानच दिले. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने पक्ष संघटना बांधणी करून पूर्ववैभव मिळवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे शिलेदार मैदानात उतरतील. दोन्ही पक्षांना ‘पूर्व वैभव’ परत मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुती म्हणून मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महायुतीने निवडणूक लढवण्याचा निर्धार करून प्रचारकार्यालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात अद्याप कोणतीही समन्वय बैठक झाली नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
कोणत्याही पक्षाने स्वतंत्र लढायचे की एकत्रितपणे यावर ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या आघाडीत विस्कळीतपणा दिसत आहे. समन्वयाअभावी परिणामी कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी जागावाटप, स्थानिक गणिते अन् उमेदवार ठरवण्यासाठी कोणतीही चर्चा केली नाही. तर दुसरीकडे महायुतीतील पक्षांनी सदस्य नोंदणी अभियान राबवत कार्यकर्ते जोडण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ‘मविआ’मध्ये अधिक समन्वयाची गरज आहे. तरच ते आव्हान देऊ शकतील.
महाविकास आघाडीतील तीनही मुख्य घटक पक्ष एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही तर महाविकास आघाडीतील अंतर्गत गटबाजी आणि गोंधळाचा थेट फायदा महायुतीला होणार आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारही उभे राहण्याची शक्यता असल्यामुळे मतविभाजन होऊ शकते. त्यासाठी ‘मविआ’ला सर्व घटकपक्षांची वज्रमूठ बांधणे आवश्यक आहे. महायुतीने पहिला डाव खेळला असला तरी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकत्र आले अन् ठोस निर्णय घेतला, तर चित्र पालटू शकते.
जिल्ह्यातील राजकारणात सध्या प्राधिकरणाच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील तणाव चिघळताना दिसतो. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती एकत्रित लढणार, असा सूर काही दिवसांपूर्वी होता. मात्र, सध्या परिस्थिती तशी नसून प्राधिकरणाच्या मुद्यांवरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे महायुतीतील सलोखा धोक्यात आल्याचे दिसून येते. भाजपचे स्थानिक नेते प्राधिकरणांची नांदेडसारख्या शहराला खरेच गरज आहे काय? असा सवाल करत आहेत. दुसरीकडे, शिंदेंची शिवसेना आपले वजन दाखवत नांदेडसाठी प्राधिकरण कसे गरजेचे आहे, याबाबत आपली बाजू मांडत आहेत. यावरून महायुतीतील भाजप आणि शिंदेंची शिवसेनेत मतभेद स्पष्ट दिसत आहेत.
जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना तळागाळात बांधणी करत आहे. त्यासाठी जुने-नवे सहकारी एकदिलाने मैदानात उतरले आहेत. जिल्हाध्यक्ष बबनराव बारसेंच्या पुढाकारातून अनेक तालुकानिहाय तसेच प्रभागनिहाय बैठका घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनबांधणी सुरू आहे. हा पक्ष तळागाळात रुजलेला असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून महत्त्वाचा ठरेल.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) आगामी निवडणुकीसाठी संघटन बांधणीचे काम सुरू आहे. बैठकावर जोर दिला जात आहे. सदस्य नोंदणी अभियान राबवत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, महानगराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्याकडून सुरू आहे. आघाडी न झाल्यास स्वबळावरही लढण्यासाठी तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीसोबत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार की, स्वतंत्र लढणार याकडेही कार्यकर्त्यांची लक्ष लागले आहे. तरी मनसेनेही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
जालन्यापर्यंत येणारी ‘वंदे भारत ट्रेन’ नांदेडपर्यंत वाढविण्यात आली असून २६ ऑगस्टपासून नांदेड येथून मुंबईसाठी धावणार आहे. त्यामुळे नांदेडसह परिसरातील जिल्ह्यासाठी ही रेल्वे अतिशय सोयीची ठरणार आहे. त्यामुळे या रेल्वेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत राजकारण सुरू असल्याचे दिसून येते
4 FAQs with One-Line Answers:
प्रश्न: नांदेडमध्ये महायुतीची ताकद का वाढली आहे?
उत्तर: अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीचा प्रभाव वाढला आहे.
प्रश्न: काँग्रेस पक्षात सध्या काय समस्या आहेत?
उत्तर: नेतृत्वातील बदल आणि कार्यकारिणीबाबत संभ्रमामुळे काँग्रेस कमजोर भासतो आहे.
प्रश्न: महाविकास आघाडीचा प्रचार एकत्र का नाही?
उत्तर: अद्याप समन्वय बैठक न झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे.
प्रश्न: नांदेडमध्ये कोणत्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गटात तणाव आहे?
उत्तर: प्राधिकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांत मतभेद आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.