Rajya Sabha Election 2024: मोदी- शाह यांचं महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र; चर्चेतल्या नावांना कात्री तर 'सरप्राईज'...

BJP Political News : ...एकूणच पक्षवाढीसाठी जे जे काही लागेल त्याची सर्व तजवीज भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताना केली आहे.
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

संजय परब -

Mumbai News : लोकसभा असो की राज्यसभा, विधानसभा असो की विधान परिषद उमेदवार देताना चर्चित नावांना बाजूला करायचे आणि हासभास नसणारी नावं जाहीर करायची असा भाजपचा ट्रेंड असून यावेळी सुद्धा त्यांनी तो कायम ठेवला आहे. काँग्रेस सुद्धा असंच करायची आणि आता भाजपने त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केलीय. विनोद तावडे, नारायण राणे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्यापैकी तिघांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असताना अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ.अजित गोपछडे यांची नावे जाहीर करत आपलं धक्कातंत्र कायम ठेवलंय.

अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांना उमेदवारी देऊन भाजपने नांदेडमध्ये आपल्या पक्षाचा खुंटा बळकट करून घेतला. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य राणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. मात्र त्यांना उमेदवारी न देता लोकसभेसाठी आपल्या राखीव उमेदवारांमध्ये त्यांना ठेवून घेतले.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Medha Kulkarni News : ...अखेर मेधा कुलकर्णींनी करुन दाखवलंच; माजी आमदार ते थेट खासदार!

कदाचित अशोक चव्हाण यांच्यासारखा मोहरा हाताशी आला असताना राणे यांचा पुढे नक्की पक्षाला फायदा काय? याचा विचार भाजप करत असावा. दुसऱ्या बाजूला राजापूर मतदारसंघात अजून भाजपचा उमदेवार निश्चित होत नसल्याने राणे यांचा विचार होऊ शकतो. उध्दव ठाकरे शिवसेनेच्या विनायक राऊत यांना टक्कर द्यायची असल्यास राणे यांच्यासारखा तगडा उमेदवार हवा, असा भाजप विचार करत असेल. या मतदारसंघातून विनोद तावडे किंवा रवींद्र चव्हाण हे नाव सुद्धा पुढे येऊ शकेल.

विनोद तावडे (Vinod Tawde) हे सध्या भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील चौथ्या क्रमांकाचे नेते असून राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहताना त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. बिहारमध्ये सत्तापालट करताना त्यांनी नितीश कुमार यांना एनडीएत आणले. मुख्य म्हणजे इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असलेल्या नितीश यांना पुन्हा बिहारची गादी देत त्यांचे फडफडणारे पंखच कापून टाकले. तावडे यांना कदाचित उत्तर मुंबईतून लोकसभेची दिली जाऊ शकते. आणि ते न झाल्यास केंद्रीय मंत्री किंवा भविष्यातील महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होऊ शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सगळ्या चर्चित नावांमध्ये पंचाईत झालीय ती पंकजा मुंडे यांची. भाजपने (BJP) त्यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान देत पक्ष वाढीसाठी संधी दिली होती. पण, तावडे यांच्याप्रमाणे त्यांना आपली छाप पाडता आली नाही. कायम नाराजीचा सूर लावत त्या पक्षाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत राहिल्या. यामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. लोकसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार होईल की नाही, याचा सुद्धा काही भरवसा नाही. त्यांची नाराजी उघडपणे कायम राहिल्यास एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे त्या सुद्धा कायमच्या बाजूला पडू शकतात.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांचे भाजपच्या दिल्ली दरबारी चांगले वजन असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत विचार होईल असे वाटत होते. मात्र पुण्याच्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांची निवड करत भाजपने ब्राह्मण चेहरा देत सर्वसमावेशक धोरण पुढे आणलेले दिसते. मंत्री चंद्रकांत पाटील यांना हा एकप्रकारे शह असून आगामी लोकसभा निवडणुकीत मतांची गणिते सुद्धा यामागे आहेत.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Loksabha Election 2024 : मेधा कुलकर्णींना राज्यसभेची 'लॉटरी'; पुणे लोकसभेसाठी आता 'मराठा' उमेदवार

डॉ.गोपछडे यांना उमेदवारी देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचवलेल्या नावाचा विचार तर केलाच, पण डॉक्टर आणि समाजाच्या वरच्या स्तरातील लोकांना भाजप आपलासा वाटेल, याची काळजी घेतली आहे. एकूणच पक्ष वाढीसाठी जे काही लागेल त्याची सर्व तजवीज भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताना केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Loksabha Election 2024 : पवार-कलानी यांच्या भेटीनंतर भाकरी फिरल्याची चर्चा; परिणाम कल्याण लोकसभा निवडणुकीत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com