NCP Leader Eknath Khadse Joining BJP: दोन्ही डगरींवर हात ठेवले की कधी कधी प्रचंड कोंडी होते, याचा प्रत्यय सध्या एकनाथ खडसे यांची अवस्था पाहून कोणालाही येईल. भाजप प्रवेशाला विरोध असल्यामुळे उद्विग्न झालेल्या नाथाभाऊंनी आपण अद्यापही ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहोत, असे म्हणत भाजपला इशारा दिला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही त्यांच्या प्रवेशाला विरोध होईल, असे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये घरवापसी केली आहे, असे सांगणारे माजी मंत्री नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे हे त्यांच्या विरोधकांच्या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे दिसत आहे. एकेकाळी भाजपमध्ये वजनदार नेते म्हणून गणती असलेले 72 वर्षीय नाथाभाऊ आता आरोग्याच्या विविध समस्या आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे बेजार झाले आहेत. या चक्रव्यूहातून ते बाहेर कसे पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या नाथाभाऊंना पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे कॅबिनेट मंत्रिपदावर समाधान मानावे लागले होते. त्यातही त्यांच्या मागे कथित गैरव्यवहारांच्या प्रकरणांचा भुंगा लावण्यात आला आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
भाजपचे काही नेते आपले राजकारण संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते घरवापसी करणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू झाली होती. नाथाभाऊंनीही त्याला दुजोरा दिला.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असे त्यांनी नुकतेच सांगितले आहे. नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परतण्याचे संकेत दिले होते, मात्र तेथूनही त्यांना विरोध होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत खुन्नस असते, कुरघोड्या केल्या जातात. मात्र नाथाभाऊंच्या बाबतीत त्यांचे भाजपमधील विरोधक दाखवत असलेली खुन्नस अचंबित करणारी अशीच आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपची मोठी पीछेहाट झाली. गेल्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, 2024 च्या निवडणुकीत त्या 9 वर आल्या.
प्रदेश नेतृत्वाचे हे सपशेल अपयश म्हणावे लागेल. असे सांगितले जाते, की नाथाभाऊ यांनी भाजपला मदत केल्यामुळे जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघांत भाजपचा विजय सोपा झाला. रावेर मतदारसंघातून विजयी झालेल्या नाथाभाऊंच्या सून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही तशा प्रकारचे विधान केले आहे. एकनाथ खडसे यांच्यामुळे माझा विजय सोपा झाला, असे त्या म्हणाल्या आहेत.
भाजपमधील काही नेत्यांचा माझ्या प्रवेशाला विरोध आहे, असे म्हणताना नाथाभाऊंचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असतो. नाथाभाऊ आता चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे. मी राजीनामाही दिलेला नाही, त्यामुळे मी परत जाऊ शकतो, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे. यातून त्यांची उद्विग्नताही समोर आली आहे. मात्र आता तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही त्यांची कोंडी केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत नाथाभाऊंनी भाजपचे काम केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी नाव न घेता नाथाभाऊंवर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 8 उमेदवार विजयी झाले. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावरून डॉ. पाटील यांनी टायमिंग साधत टीका केली आहे. स्थानिक गद्दारांमुळे रावेरमध्ये आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे ते म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत नाथाभाऊंमुळे माझा विजय सोपा झाला, असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. त्यामुळे डॉ. पाटील यांचा रोख नाथाभाऊंकडेच असावा. इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था नाथाभाऊंची झाली आहे. भाजपमधूनही त्यांना विरोध होतो आहे आणि ज्या पक्षात जाण्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे, तेथूनही त्यांना विरोध होतो आहे.
नाथाभाऊ सुनेच्या विजयासाठी भाजपमध्ये गेले आणि आता रावेर विधानसभा मतदारसंघातून कन्या रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी परत येत आहे, असा समज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा झाला आहे. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. त्यातच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही नाथाभाऊंवर निशाणा साधत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. खडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी प्रवेश दिला असेल तर त्यांना विरोध करणारा मी कोण, असे प्रत्युत्तर महाजन यांनी खडसे यांच्या आरोपांना दिले आहे.
कन्या रोहिणी खडसे यांच्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवायची आहे, त्यांचा प्रचार करायचा आहे, यासाठी ते बहाणे करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही बोलले आहेत. खडसे यांच्या प्रवेशाला भाजपमधून विरोध नाही, मात्र काही विषयांवर त्यांच्याशी चर्चा करणे बाकी आहे, असे म्हणत त्यांनी खडसे यांचा प्रवेश आणखी लांबू शकतो, असे संकेत दिले आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.