Vasantrao Naik: शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री

Vasantrao Naik Journey Maharashtra Politics : काँग्रेसनं वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदी संधी दिली. त्यानंतर ते सलग 11 वर्षे 78 दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. त्यांनी राज्यात हरितक्रांती घडवली.
Vasantrao Naik
Vasantrao NaikSarkarnama
Published on
Updated on

आपला देश शेतीप्रधान आहे. देशासह राज्यातील मुख्य व्यवसायही शेतीच आहे. असं असलं तरी देश पारतंत्र्यात राहिल्यामुळे कृषी तंत्रज्ञान प्रगत झालेलं नव्हतं. सिंचनाच्या सुविधा म्हणाव्या तितक्या नव्हत्या. अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची वानवा होती. त्यामुळं 1955 मध्ये अमेरिकेतून गहू आयात करावा लागला होता. देशाला एका हरितक्रांती गरज होती. 1960 च्या दशकात देशात हरितक्रांतीला सुरुवात झाली होती.

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचा उल्लेख झाला की तत्कालीन मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते वसंतराव फुलसिंग नाईक यांचं नाव समोर येतं. सर्वाधिक काळ, म्हणजे सलग 11वर्षे 78 दिवस मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम अद्याप वसंतराव नाईक यांच्या नावावरच आहे. 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 यादरम्यान मुख्यमंत्रिपदावर राहलेले नाईक हे हाडाचे शेतकरी होते. शेती आणि मातीवर श्रद्धा ठेवणारे नाईक हे कषितज्ज्ञ होते. महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक अशी त्यांची ओळख आहे.

1947 मध्ये देशाची फाळणी झाली. भारताच्या वाट्याला 82 टक्के लोकसंख्या, तृणधान्य पिकवणारं 75 टक्के आणि बागायती 69 टक्के क्षेत्र आलं. 1960 च्या दशकात हरितक्रांतीमुळं अन्नधान्याचं उत्पादन वाढण्यास सुरुवात झाली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम. एस. स्वामीनाथन यांनी अमेरिकेतील कृषितज्ज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना भारतात आमंत्रित केलं. कृषी क्षेत्रात नॉर्मल बोरलॉग यांचं योगदान मोठं आहे. पुढे 1970 मध्ये त्यांना शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नॉर्मन बोरलॉग भारतात आल्यानंतर केंद्र सरकार आणि अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन यांच्या प्रयत्नांतून मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचं बियाणं आयात करण्यात आलं. जास्त उतारा देणारं बियाणं, जलसिंचनाच्या सुविधा यामुळे 1960 च्या दशकात अन्नधान्याचं उत्पादन वाढायला सुरुवात झाली.

हे सर्व होत असताना कीटनाशकं, रासायनिक खतांचा वापर वाढला होता. त्यामुळं शेतजमिनीचा कस कमी होऊ लागला होता. जमिनीवर विपरित परिणामही होऊ लागला होता. इकडं, महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यात ते यशस्वी झाले होते. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवणार, असा निर्धार त्यांनी केला होता, तो त्यांनी पूर्ण करून दाखवला. पुढे 1972 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. त्यावरही नाईक यांनी मात केली होती.

Vasantrao Naik
Sanjay Raut : महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सेनेला धक्का बसणार; राऊतांच्या बैठकीला माजी नगरसेवकांची दांडी

दुष्काळावर मात करण्यासाठी वसंतरावांनी विविध देशांचे दौरे केले होते. त्यात जपान, चीन, श्रीलंका, सिंगापूर आदी देशांचा समावेश होता. या देशांतील संकरित वाणांची त्यांनी पाहणी केली, माहिती घेतली आणि ती राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली. त्यामुळं शेतकरी नगदी पिकांकडं वळू लागले. ऊस आणि कापसाची लागवड वाढू लागली. कारखान्यांकडून ही नगदी पिकं खरेदी केली जाऊ लागली तशी शेतकऱ्यांकडे सुबत्ता आली. त्यांच्या हातात पैसा खुळखुळायला लागला. 1972 च्या दुष्काळानंतरही काही वर्षे राज्यात मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळं वसंतरावांनी रोजगार हमी योजना सुरू केली. या माध्यमातून हजारो विहीरी, तलावांचे काम झाले. राज्यातील 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना या माध्यमातून काम मिळालं होतं.

वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गहुली या खेडेगावात झाला. हुनकीबाई आणि फुलसिंग हे त्यांचे माता -पिता. ते सधन शेतकरी होते. वसंतरावांचे आजोबा चतुरसिंग नाईक यांनी गहुली हे गाव वसवलं होतं. ते या तांड्याचे प्रमुख होते. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण गहुली शेजारच्या पोहरादेवी, उमरी, भोजला आदी गावांत झालं. अमरावती येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेमधून बी.ए.चं शिक्षण पूर्ण केलं. नागपूरला असताना त्यांचा पुस्तकांशी सहवास वाढला होता. त्यातूनच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले आणि डेल कार्नेगी यांचा प्रभाव पडला. वसंतरावांना 1941 मध्ये चले जाव आंदोलनात सहभाग घेतला. त्यातून ते महात्मा गांधीजी यांच्या संपर्कात आले.

त्यानंतर 1938 मध्ये ते कायद्याचे पदवीधर झाले. त्यांनी पुसद येथे वकीली व्यवसाय सुरू केला. गरजू लोक, शेतकरी यांचा त्यांना कळवळा होता. या घटकांसाठीच त्यांची वकिली समर्पित राहिली. 1941 मध्ये त्यांचा नागपूर येथील वत्सलाताई घाटे यांच्याशी विवाह झाला. हा आंतरजातीय प्रेमविवाह होता. वत्सलाताई याही वसंतरांवाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात सहभागी होत असत. अरुंधती, अविनाश आणि निरंजन ही त्यांची तीन अपत्ये.

वकिली करत असताना वसंतराव नाईक यांचा जनसंपर्क वाढत गेला. त्यांच्या वकिलीला सामाजिक जाणिवांची किनार होती, त्यामुळे ते लोकप्रिय होत गेले. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी विदर्भातील हा भाग मध्यप्रदेशात होता. 1951 मध्ये त्यांची मध्यप्रदेश मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांनी 1946 ते 1952 दरम्यान ते पुसदचे नगराध्यक्ष होते. मध्य प्रदेश सरकारमध्ये 1952 ते 1956 दरम्यान ते महसूल खात्याचे उपमंत्री होते. 1956 मध्ये राज्यांची फेररचना झाली. त्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश मुबंई राज्यात झाला. त्यानंतर 1957 मध्ये ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले.

1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. नाईक यांना महाराष्ट्राचे पहिले महसूलमंत्री होण्याचा मान मिळाला. 1962 मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळातही त्यांच्याकडून महसूल खात्याचा कारभार होता. 24 नोव्हेंबर 1963 रोजी कन्नमवार यांचं निधन झालं. त्यानंतर काँग्रेसनं वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदी संधी दिली. त्यानंतर ते सलग 11 वर्षे 78 दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. यादरम्यान त्यांनी राज्यात हरितक्रांती घडवून आणली, राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी केलं. समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी त्यांच्याच काळात झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले. त्यानंतर कन्नमवार मुख्यमंत्री बनले. त्यांच्या निधनांतर काही दिवस पी.के.सावंत यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा वसंतरावांच्या हाती आली होती.

धान्याच्या बाबतीत दोन वर्षांत महाराष्ट्र स्वयंपूर्ण नाही झाला तर मी शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईन, अशी घोषणा वसंतरावांनी केली होती. त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. त्यातूनच त्यांनी ही घोषणा पु्ण्यातील एका जाहीर प्रचारसभेत केली होती. राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं होतं. त्यामुळं ते चिंतित झाले होते. प्रचारसभेत केलेल्या घोषणांकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. लोक ती घोषणा विसरून गेले होते, मात्र नाईक यांना त्याचा विसर पडला नव्हता. शेतीशी संबंधित विषयांचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या.

कृषितज्ज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यांना मिळेल, अशी सोय वसंतरांवांनी केली. याद्वारे शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती मिळत गेली. सिंचनाच्या सुविधाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी या पद्धतींचा अवलंब सुरू केला होता. या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला आणि राज्यातील अन्नधान्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलं. अशा पद्धतीनं वसंतरावांनी आपली घोषणा पूर्ण केली होती. अनन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र तर स्वावलंबी झालाच, अन्य राज्यांनाही धान्याचा पुरवठा केला जाऊ लागला. त्यामुळं वसंतराव नाईक यांना हरितक्रांतीचे जनक अशी ओळख मिळाली.

Vasantrao Naik
Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला! प्रतिमेला डाग लागल्यानंतर तरी सरकारला जाग येईल का?

वसंतराव नाईक यांची त्यांच्या मूळ गावाशी, ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधीही तुटली नाही. त्यांना मुंबईतच राहावं लागायचं. जूनमध्ये पहिला पाऊस झाला की त्यांचा आनंद गगनात मावत नसत. पहिला पाऊस पडली की ते शिपायाला आपल्या खिशातून पैसे काढून द्यायचे आणि पेढे आणून वाटायला लावायचे. शेती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ओढ होती, हे यावरून कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल. शेतीसह शिक्षण, उद्योग क्षेत्रातही त्यांनी मूलभूत सुधारणा केल्या. रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठांची उभारणी त्यांच्याच काळात झाली. पाझर तलाव आणि वसंत बंधाऱ्याचे श्रेयही त्यांनाच जाते.

नाईक घराण्याची राजकारणात वेगळी ओळख आहे. पुसद विधानसभा मतदारसंघावर 1952 पासून नाईक घराण्याचं वर्चस्व आहे. वसंतरावांचे पुतणे सुधाकरराव नाईक हेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सुधाकरराव नाईक यांचे बंधू मनोहरराव नाईक हे राज्याचे मंत्री होते. वसंतराव नाईक यांचे पुत्र अविनाश नाईक यांनीही राज्यात मंत्री म्हणून काम केलं. इंद्रनील नाईक, नीलय नाईक यांच्या रूपाने नाईक घराण्याची पुढची पिढी आता राजकारणात सक्रिय आहे.

कृषिमंत्री असताना वसंतराव नाईक यांनी भूमिहिनांसाठी महत्वाचा निर्णय घेतला होता. वसंतरावांची कारकीर्द बहरत होती, मात्र त्यांचे पाय जमिनीवरच होते. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. याद्वारे त्यांनी आपल्या जन्मभूमीतील म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील भूमिहीनांना एक लाख एकर जमीन मिळवून दिली. सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या पंचायत राज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा मान वसंतरावांचाच. प्रत्येक घटकाला सत्तेत सहभाग मिळाला पाहिजे, याकडं त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलं होतं.

वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यावेळी राज्यात शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष होता. मुंबईतील कामगार संघटना डाव्या पक्षांच्या होत्या. डाव्या कामगार संघटनांच्या एका हाकेवर मुंबई बंद होत असे. जॉर्ज फर्नांडीस यांचाही दबदबा प्रचंड वाढलेला होता. त्यामुळं काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. शिवसेनेच्या उदयाने यावर उपाय उपलब्ध झाला होता. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये केली. डाव्या पक्षांना शह देण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला बळ दिलं, असे आरोप त्यावेळी सातत्याने झाले होते. वसंतराव नाईक उघडपणे शिवसेनेची पाठराखण करतात, असा आरोपही व्हायचा. वसंतराव नाईक यांची शिवसेनेशी जवळीक होती. त्यातूनच शिवसेनेला उपहासानं 'वसंत सेना' असं म्हटलं जायचं.

महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर सलग 11 वर्षे राहणं साधी गोष्ट नव्हती. वसंतराव किती मुरब्बी राजकारणी होते, हे यावरून स्पष्ट होतं. ते मुख्यमंत्री बनले त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर साखर कारखानदार आणि मराठा समाजाचं वर्चस्व होतं. वसंतराव नाईक हे विदर्भातले. त्यांच्याकडे यापैकी कशाचंही पाठबळ नव्हतं. ते बंजारा समाजाचे. तरीही ते सलग 11 वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिले. चाणाक्षपणा, परिस्थिती अचूक हाताळण्याचं कौशल्य यामुळंच हे शक्य झालं. याच्या बळावरच ते काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणाला पुरून उरले आणि पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली.

वसंतराव नाईक यांना फेब्रुवारी 1975 मध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. 1972 च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं, मात्र पक्षात बंडखोरी झाली. 20 पेक्षा अधिक बंडखोर निवडून आले होते. लोकसभेच्या 4 आणि विधानसभेच्या 9 जागांवार 1974 मध्ये पोटनिवडणूक झाली. यातील बहुतांश जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. तेथूनच वसंतरावांची पकड सैल होण्यास सुरुवात झाली होती. विदर्भात महाविदर्भ संघर्ष समितीचे नेते जांबुवंतराव धोटे आणि रामभाऊ हेडाऊ यांचा विजय हा वसंतरावांसाठी जणू धोक्याची घंटाच होती. पोटनिवडणुकीतील या पराभवामुळं वसंतरावांना पक्षातून आव्हान मिळू लागलं. त्यातूनच त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं.

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर वसंतराव नाईक यांनी 1977 मध्ये वाशीम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवल्यानंतर झालेली ही निवडणूक होती. आणीबाणीमुळं काँग्रेसच्या विरोधात देशभरात संताप निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेली होती. अशा वातावरणातही वसंतराव विजयी झाले होते. वसंतरांवाचा 1 जुलै हा जन्मदिन कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जीवनकार्यावर 'महानायक वसंत तू' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सिंगापूर येथे 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतरावांचं निधन झालं.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com