Maharahstra Assembly Election : संकटाची चाहूल! अजितदादा, पंकजाताईंनी केला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला उघड विरोध!

Ajit pawar and pankaja Munde : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेत 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला होता. त्याला आता महायुतीतील मित्रपक्षासह भाजपकडूनही विरोध केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी अशी घोषणा इकडे चालणार नाही, असे सुनावले आहे. अजितदादा, पंकजाताई यांना लोकसभेसारख्या संकटाची चाहूल लागली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Ajit pawar pankaja Munde
Ajit pawar pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र पुरोगामी आहे का, याबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुष होऊन गेले आहेत. या सर्व महापुरुषांनी समानतेची शिकवण दिली. या थोर पुरुषांच्या विचारांना डावलून काहीकाळ राजकारण करता येईलही, पण ते नेहमीच करता येईल, असे नाही. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांना झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनाही तशी जाणीव झाल्याचे दिसत आहे.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी केली. महाजन, मुंडे यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते. बहुजन समाजात भाजपला खऱ्या अर्थाने स्थान मिळवून देण्याचे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना जाते. अशा या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात भाजपचे नेते उत्तरेकडील राज्यांतील भाजप नेत्यांसारखी भाषा बोलू लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा दिला होता. त्यांचा रोख अर्थातच एका विशिष्ट समाजाकडे होता. योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेला भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी आता उघड विरोध केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची नकली संतान असल्याचे विधानही त्यांनी केले होते. अशा टीकेची किंमत भाजपला मोजावी लागली. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्या 18 सभा झाल्या होत्या आणि महायुतीचे 17 उमेदवार निवडून आले होते. त्यापासून पंतप्रधान मोदी यांनी धडा घेतल्याचे दिसत आहे. पुण्यात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी त्यामुळेच शरद पवार यांच्यावर टीका केली नाही.

Ajit pawar pankaja Munde
Nitin Gadkari : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का ? भाजपच्या नितीन गडकरींचं मोठं विधान

महाराष्ट्रातील भाजप (BJP) उत्तेरतील राज्यांसारखी नाही. काही नेत्यांचा अपवाद वगळला तर बहुतांश नेते विभाजनवादी विधाने करत नाहीत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र उत्तरेकडील राज्यांतील नेते आणि केंद्रातील काही नेत्यांमुळे महाराष्ट्र भाजपची अडचण होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 'अबकी बार चारसौ पार' असा नारा दिला होता. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 जागा जिंकायच्या आहेत, अशी विधाने भाजपच्या नेत्यांनी केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नव्हता.

या घोषणेचा आणि त्यानंतर नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. भाजपचे 'मिशन 45' सपशेल अय़शस्वी ठरले आणि केवळ 17 जागा मिळाल्या. भाजप नेत्यांच्या अशा वादग्रस्त विधानांचा महायुतीतील मित्रपक्षांनाही फटका बसत आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचा विरोध केला. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांना मानणारे लोक सर्व समाजांत मोठ्या प्रमाणात आहेत. अल्पसंख्याक समाजातील लोकही गोपीनाथ मुंडे यांचा आदर करत असत.

Ajit pawar pankaja Munde
Nitin Gadkari : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का ? भाजपच्या नितीन गडकरींचं मोठं विधान

'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा महायुतीतील मित्रपक्षांना फटका बसण्यााची शक्यता आहे. भाजपमधील काही नेत्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार यांनी समोर येऊन योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेला विरोध केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांनाही वादग्रस्त विधानांचा परिणाम कळला आहे. विधानसभा निवडणुकीवरही विपरित परिणाम होऊ नये, यासाठी पंकजा मुंडे यांनीही या घोषणेला विरोध केला आहे.

आम्ही शिवरायांचा विचार घेऊन चालत आहोत, येथे बटेंगे कटेंगे चालणार नाही, असा इशारा अजितदादा पवार यांनी दिला आहे. या घोषणेमुळे अल्पसंख्याक समाज आपल्या पक्षापासून दुरावणार, याची कल्पना अजितदादांना आली आहे. त्यामुळेच त्यांनी रोखठोक भूमिका घेत योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे. सरकारला सर्व समाजांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागते. याची आठवणही अजितदादा पवार यांनी यानिमित्ताने भाजपला करून दिली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले समजणे हे नेत्यांचे काम असते, असे पंकजा मुंडे यांनी सुनावले आहे.

Ajit pawar pankaja Munde
Majalgaon Assembly Constituency : कनेक्टीव्हीटी, सहानुभूती आणि विश्‍वासहार्यतेमुळे मातब्बरांची साथ; म्हणून बनला माजलगावमध्ये आडसकरांचा माहोल

मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे विधानसभेलाही महायुतीत चिंतेचे वातावरण आहे. एकेक समाज आपल्यापासून दूर जात नाही ना, अशी भीती महायुतीला, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू लागली आहे. विकास करण्यासाठी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेलो, असे अजितदादा पवार आताही सांगत आहेत, मात्र भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांची कोंडी होत आहे. काही भाजप नेत्यांची कट्टर विचारधारा अजितदादा पवार आणि त्यांच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्त्वावर संकट निर्माण करणारी ठरू शकते. पंकजाताई मुंडे यांना वडील गोपीनाथ मुंडे यांचा सर्वसमावेशक राजकारणाचा वसा जपायचा आहे. आता भाजपचे शीर्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com