

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभेत व्यासपीठावर भाषण करण्याचा योग आला. तिथे न डगमता भाषण केली. मात्र, आज दादासाहेबांसोबत जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच बोलताना नकळत दडपण येत आहे अशी आदरयुक्त भावना भाजपच्या माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी सासरे तथा माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रती व्यक्त केली.
निलंगा येथे रविवारी (ता. 21) आयोजित माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधुवर सुचक मेळाव्यात चौदा वर्षांनी सासरे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व त्यांच्या स्नुषा रूपाताई एकाच व्यासपीठावर आले होते. डॉ. निलंगेकर हे व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर रूपाताईंचे आगमन झाले. व्यासपीठावर येताच त्यांनी सासरे शिवाजीरावर पाटील निलंगेकर यांचे चरण स्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले व त्यांच्या शेजारी विराजमान झाल्या.
निलंग्याचे माजी आमदार (कै.) दिलीपराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर रूपाताई निलंगेकर कुटुंबांपासून दुरावल्या. त्यानंतर त्यांनी व पुत्र संभाजी पाटील यांनी उमरगा येथे लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच 2004 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून रुपाताईंनी भाजपकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत रूपाताई यांनी माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला होता.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंग्याचे अनेक वर्ष आमदार, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या आजोबा शिवाजीराव पाटील यांचा निलंगा विधानसभा मतदारसंघातून पराभव केला. तेव्हापासूनच सून सासरे आणि नातू आजोबा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. गेल्या अनेक वर्षापासून आजोबा विरूद्ध नातू असे राजकारण निलंग्यात सुरू आहे.
मध्यंतरी एकदा संभाजी पाटील यांचा आजोबांकडून पराभव झाला. पण पुन्हा 2014 च्या निवडणुकीत संभाजी पाटील यांनी आजोबांचा पराभव करत विजयश्री मिळवली होती. रुपाताई पाटील निलंगेकर यांनी आपल्या राजकीय प्रवासात भाजपच्या जिल्हाध्यक्षा म्हणून काही वर्ष काम केले.
संभाजी पाटील निलंगेकर सध्या कामगार व कौशल्यविकासमंत्री आहेत. मागील दोन वर्षात त्यांनी जिल्हा परिषदेसह लातूर महापालिकेत भाजपला यश मिळवून दिले. जिल्ह्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्यात ते चांगलेच यशस्वी ठरले. पक्षाला विजय मिळवून देत असतांना कुटुंबातील दुरावा मात्र वाढतच गेला. रविवारी चौदा वर्षानंतर पहिल्यांदाच डॉ. निलंगेकर व रूपाताई एकत्र आले. रूपाताईंनी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून व एक सून म्हणून वठवलेली भूमिका कौतुकाचा विषय ठरली. कार्यक्रमात त्यांनी डॉ. निलंगेकर यांचे नाव न घेता दादासाहेब असाच उल्लेख केला. डॉ. निलंगेकर यांनी मात्र, रूपाताईंचा उल्लेख "रूपा दिलीप पाटील निलंगेकर असाच केला. या व्यतिरिक्त त्यांनी भाषणात त्यांचा उल्लेख करणे टाळले.
निलंगेकर कुटुंबातील दुराव्याचा वनवास चौदा वर्षांनी तरी संपतो का? हा प्रश्न कायम असला तरी चौदा वर्षानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर व त्यांच्या सुनबाई रुपाताई एकाच व्यासपीठावर शेजारी बसले हे चित्र देखील निलंगेकरांना सुखावणारे ठरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.