
Jalgaon News: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन-साडेतीन वर्षांपासून निर्माण झालेली कोंडी आता फुटणार आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरवात झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुन्हा एकदा महानगरांसह नगरपालिकांमध्ये कारभारासाठी इच्छुक तयारीला लागतील.
दीड वर्षांपासून जळगाव शहर महापालिकेवर प्रशासकराज आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक ऑगस्ट २०१८ मध्ये झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जळगाव महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आला.
सुमारे सहा लाखांवर लोकसंख्येच्या जळगाव महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आली. २०१८ मध्ये भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकत महापालिकेवर आपले वर्चस्व स्थापित केले होते. नंतरच्या काळात तोडफोडीचे राजकारण होऊन शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तासंघर्ष सुरूच राहिला.
आता जळगाव महापालिका कुणाची, त्यावर कुणाचे वर्चस्व आहे, हे सांगता येणार नाही. पण येथे भाजप, शिवसेना यांचा प्रभाव मोठा असून, त्या खालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे अस्तित्व आहे.
२००७, २०१२, २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वबळावर लढले होते. महापालिकेच्या निवडणुकीतही सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते, आताही हीच परिस्थिती असल्याने महायुती-आघाडी शिवाय स्वबळावर लढा, अशी येथील कार्यक्रर्ते व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदा होणाऱ्या महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षीय समीकरणे बदलू शकतात. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष, तसेच स्थानिक मुद्दे आणि उमेदवारांची लोकप्रियता यावर मतदार कुणाच्या पारड्यात कौल देतात, हे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाले होते. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत.
जळगाव महापालिका निवडणूकीची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महापौर आरक्षण सोडत, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, प्रभाग रचना तसेच मतदार याद्यांच्या प्रक्रियेलाच तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा निवडणुका या दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये तिकीट वाटपावरुन तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हातील ग्रामीण भागात शिवसेनेचा प्रभाव वाढला आहे. भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे. याचा परिणाम निवडणुकीच्या तिकीट वाटपावर होऊन महायुतीतील घटक पक्षातत रस्सीखेच होण्याचे चित्र आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरुन फारशी हालचाल दिसत नसली तरी नेते, पदाधिकाऱ्यांनी तयारी लागले असल्याचे सांगण्यात येते.
भाजप (BJP) – ५७ जागा
शिवसेना (Khandesh Vikas Aghadi) – १३ जागा
AIMIM – ३ जागा
(२०१८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीवरुन)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.