
Indian Filmmaker Politicians History : चित्रपटसृष्टीतील कलावंतांना राजकारणाचा मोह आवरत नाही. अनेक चित्रपट कलावंतांनी करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर राजकारणात प्रवेश केला. काहीजण रमले, काहीजण अल्प कालावधीत बाहेर पडले. देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले प्रसिद्ध अभिनेते मनोजकुमार यांनी राजकारणातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची राजकीय इनिंग अल्पकाळाची ठरली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण ते राजकारणात अधिक काळ रमले नाहीत.
शुक्रवारी पहाटे मनोजकुमार यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यांचा जन्म अबोटाबाद येथे झाला. फाळणीत हा भाग पाकिस्तानात गेला. मनोजकुमार आणि त्यांचे कुटुंबीय नंतर भारतात परतले. काही महिने त्यांना निर्वासितांच्या छावणीत काढावे लागले. त्यानंतर ते दिल्लीत स्थायिक झाले. मनोजकुमार यांनी फाळणीचे दुःख अनुभवले होते. त्यांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला होता. भारतात परतल्यानंतर त्यांना चित्रपटांच्या शूटिंगसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्याचे काम मिळाले. यातूनच ते अभिनय क्षेत्राकडे वळले.
मनोजकुमार यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. महाविद्यालयीन जीवनातच त्यांचा नाटकांशी संबंध आला होता. 1957 मध्ये आलेला फॅशन हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘कांच की गुडिया’ हा त्यांची मुख्य भूमिका असलेला पहिलाच चित्रपट. हा चित्रपट यशस्वी ठरला. मनोजकुमार हे दिलीपकुमार यांचे चाहते होते. ‘शबनम’ या चित्रपटात दिलीपकुमार यांनी साकार केलेल्या पात्राचे नाव मनोज होते. यावरूनच मूळचे हरिकिशन गिरी गोस्वामी हे मनोजकुमार बनले. देशभक्तीपर चित्रपटांमुळे ते नंतर चाहत्यांमध्ये भारतकुमार या नावाने लोकप्रिय झाले.
1965 ते 1981 या काळात अभिनेता, दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांची चलती राहिली. क्रांती, पूरब और पश्चिम आदी त्यांचे देशभक्तीपर चित्रपट याच काळात आले. हे चित्रपट सुपरहिट ठरले. याद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीसह समाजमनावर आपली वेगळी पकड निर्माण केली होती. 1987 नंतरचा काळ त्यांच्यासाठी उतरता राहिला. त्यांच्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळत नव्हते. कलयुग और रामायण, संतोष, क्लर्क, देशवासी आदी त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरले. मैदान-ए-जंग हा 1995 मध्ये आलेला त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून जवळपास संन्यासच घेतला. त्यांच्या मुलालाही या क्षेत्रात यश मिळाले नाही. चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना राजकारणाचा मोह असतो. मनोजकुमारही याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच 2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र ते राजकारणात फार काळ रमले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर त्यांच्यात कटुता निर्माण झाली.
मनोजकुमार यांनी आणीबाणीला उघडपणे विरोध केला होता. अर्थातच ते इंदिरा गांधी यांना आवडले नव्हते. आणीबाणीला विरोध करणाऱ्या कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात येत होती. त्या काळात प्रदर्शित झालेल्या मनोजकुमार यांच्या दस नंबरी आणि शोर या चित्रपटांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली होती. या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्ददर्शनही त्यांनीच केले होते. त्यामुळे मनोजकुमार यांना आर्थिक फटका बसला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा देत त्यांनी तो जिंकला होता.
‘उपकार’ या चित्रपटाशी संबंधित एक किस्साही प्रसिद्ध आहे. 1965 मधील भारत-पाकिस्तान युद्धानंतर मनोजकुमार यांनी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भेट घेतली होती. त्यावेळी ‘शहीद’ चित्रपटातील मनोजकुमार यांची भूमिका गाजली होती. शास्त्री यांनाही तो चित्रपट आवडला होता. शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा दिला होता. अशाच मध्यवर्ती कल्पनेवर चित्रपटाची निर्मिती करावी, असे लालबहादूर शास्त्री यांनी मनोजकुमार यांना सांगितले होते. त्यानुसार मनोजकुमार यांनी ‘उपकार’ चित्रपट बनवला, तो सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळे मनोजकुमार यांना भारतकुमार असे नाव मिळाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.