Vanchit Bahujan Aghadi : 'वंचित'नं स्वतःच्या हातानं स्वतःचं वाटोळं करून घेतलं?

Prakash Ambedkars VBA Performance in Lok Sabha Election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'नं स्वतःचं वाटोळं करून घेतलं. 48 पैकी 37 जागी उमेदवार उभे केले खरे पण त्यातल्या 9 जागांवर नोटालाही 'वंचित'पेक्षा जास्त मतं मिळाली.
Prakash Ambedkar and VBA
Prakash Ambedkar and VBASarkarnama

Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'शी युती केल्यानं एक उमेदवार वगळता 48 पैकी 47 उमेदवार जरी पडले असले तरी 'वंचित'ची एकंदरीत कामगिरी चांगली होती पण यंदाच्या निवडणुकीत मतांचा टक्का तर घसरलाच शिवाय कुणाशीही युती अथवा आघाडी नं केल्यानं उभे केलेले 37 च्या 37 उमेदवारही पडले.

सर्वांत महत्वाचं म्हणजे गडचिरोली-चिमूर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिण मुंबई, नंदुरबार, पालघर, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 9 जागांवर 'वंचित'ला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. इतकंच नव्हे तर बुलडाणा, दिंडोरी, जालना, नंदुरबार, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा आणि शिरूर या 8 ठिकाणी अपक्ष उमेदवारांनाही 'वंचित'च्या उमेदवारांना जास्त मतं मिळाली आहेत.

महाराष्ट्रात शून्य प्रभाव असलेल्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवारही बीड, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि वर्धा या चार मतदारसंघांमध्ये 'वंचित'च्या उमेदवारांपेक्षाही किंचित सरस ठरले. माढा नंदुरबार, पालघर आणि हातकणंगले या ठिकाणी तर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, बहुजन विकास आघाडी आणि स्वाभिमानी या पक्षांच्या उमेदवारांनाही 'वंचित'च्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली.

'वंचित'नं यावेळी 37 जागी आपले उमेदवार उभे केले होते तर 9 ठिकाणी पाठिंबा दिला होता. धुळे आणि ठाणे या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. या निवडणुकीत 37 पैकी 22 उमेदवार तिसऱ्या तर 13 उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिले. पालघरमध्ये तर वंचितच्या उमेदवार विजया म्हात्रे सहाव्या क्रमांकावर आणि नंदुरबारमधील 'वंचित'चे उमेदवार हेमंत कोळी डायरेक्ट सातव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना अवघी 4 हजार 81 इतकी मतं पडली.

Prakash Ambedkar and VBA
Satej Patil: महाविकास आघाडीत कुणाला किती जागा मिळणार? विधानसभा जागा वाटपाची तारीख ठरली!

ही मतं नोटापेक्षा 10 हजार 42 मतांनी कमी होती. हेमंत कोळी आणि याठिकाणी निवडून आलेले काँग्रेसचे (Congress) गोवाल पाडवी यांच्या मतांमधला फरक होता तब्बल 7 लाख 41 हजार 917. नाशिकमध्ये मात्र 'वंचित'चे उमेदवार करण गायकर यांना शांतिगिरी महाराजांपेक्षा जास्त मतं मिळाली ही 'वंचित'साठी त्यातल्या त्यात समाधानाची बाब! करण गायकरांना 47,193 इतकी मतं पडली तर शांतिगिरी महाराजांना 44, 524 मतं मिळाली.

2019 मध्ये 'वंचित'नं सर्वपक्षीय मिळून 13 उमेदवार पाडले होते आणि त्या 13 च्या 13 जागांवर एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती. यावेळी मात्र अवघ्या दोन जागांवर 'वंचित'ला 1 लाख मतांच्या पुढचा पल्ला गाठता आला तर तीन जणांना 90 हजारांहून जास्त मतं घेता आली. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) 2,76,747 तर हिंगोलीत बी. डी. चव्हाणांना 1,61,814 इतकी मतं पडली.

त्या खालोखाल बुलडाण्यात वसंतराव मगर यांना 98,441, परभणीत पंजाबराव डख यांना 95,967 आणि शिर्डीत उत्कर्षा रुपवते यांना 90,929 इतकी मतं मिळाली. पुण्यात 'वंचित'कडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरे काही तरी करिश्मा घडवतील, असं सर्वांनाच वाटलं होतं पण त्यांचीही जादू काही चालली नाही. त्यांना केवळ 32,012 इतकीच मतं मिळाली.

Prakash Ambedkar and VBA
Devendra Fadnavis : कुणाची कितीबी होऊदे चर्चा! महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीसच 'बॉस'?

एकूणच काय तर आपल्या पदरी एवढं मोठं अपयश पडूनही 'वंचित'मुळं भाजपच्या 18 जागा पडल्या, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मात्र, जिथं 'नोटा'ला जास्त मतं पडली, अपक्ष उमेदवारांनीही 'वंचित'च्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली त्या वंचितमुळं भाजपच्या 18 जागा पडल्या हे म्हणणं संयुक्तिक वाटतं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'नं स्वतः च्या हातानेच स्वतःचं वाटोळं करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com