Maharashtra Political Analysis : आमच्या पक्षात शिवसेना, कॉंग्रेस किंवा अमुक पक्षाचे नेते येणार असे सांगत-सांगत भाजपने आजवर बरेच राजकीय भूकंप घडवून आणले. आज भाजप नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार, असा बॉम्ब फोडून नव्या चर्चांना सुरुवात करवून दिली आहे.
२०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग राबवून महाराष्ट्राला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये (कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तेव्हाची उद्धव ठाकरेंची शिवसेना) दोन - अडीच वर्ष चांगल्याच कुरबुरी सुरू होत्या आणि ते साहजिकही होते. पण शरद पवारांसारख्या देशातील बलाढ्य नेत्याने बांधलेली महाविकास आघाडी फुटणार नाही. किमान पाच वर्ष (२०१९ ते २०२४) असा सर्वांचाच अंदाज होता, नव्हे विश्वास होता.
महाविकास आघाडीच्या सरकारचे अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांचा हा विश्वास धुळीस मिळवला आणि बाळासाहेबांची शिवसेना फोडून टाकली. येथे भल्याभल्यांची ‘सूत्र’ निकामी ठरली होती. सुरुवातीला शिवसेना नेते एकनाथ शिंदे सात-आठ आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले आणि गुजरातेतील सुरतला गेले. तेथून त्यांनी गुवाहाटी गाठली.
‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया...’ अगदी या शेरप्रमाणे गुवाहाटीला काही अपक्षांसह तेव्हाचे शिवसेनेतील खासदार, आमदार आणि मंत्र्यांची रीघ लागली. अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले.
हे सर्व येथे सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी कॉंग्रेसला ‘हात’ दाखवून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार आणि ओबीसी नेते डॉ. आशिष देशमुख यांनी परवा - परवा ‘दोन माजी राज्यमंत्री लवकर भाजपमध्ये आलेले दिसतील’, असे मोठे विधान केले. त्यानंतर आज (ता. १७) राज्यातील कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपवासी झालेले दिसतील’, दुसरे मोठे विधान केले. भाजपमधील नेत्यांनी जेव्हा जेव्हा अशी विधाने केली, तेव्हा तेव्हा कुणीतरी मोठे नेते भाजपमध्ये गेले, असा गेल्या दोन - अडीच वर्षातील अनुभव आहे.
डॉ. आशिष देशमुखांच्या आजच्या वक्तव्याने संशयाची सुई कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे वळली आहे. आपण कॉंग्रेस सोडून जाणार नसल्याचे खुद्द शिंदे सांगून आजच मोकळे झाले. तिकडे सोलापूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदे आमच्याकडे येणार नाही, असे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता राजकीय जाणकारांच्याही भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात (लोकसभा निवडणुकीच्या पहिले) भाजप कुणाला पक्षात घेऊन महाराष्ट्राला आणखी एक धक्का देणार, या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे. इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याची भाजपची हीच ‘स्पीड’ कायम राहिली तर भाजपला केंद्रातील सत्तेतून खेचणे हे कॉंग्रेससाठी दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.