
तटस्थ आणि खोल विश्लेषण:
लेखक वामन प्रभू हे पर्रीकर यांचे निकटवर्तीय असूनही त्यांनी तटस्थपणे पर्रीकर यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनाचा वेध घेतला आहे.
मुख्यमंत्री ते संरक्षणमंत्री प्रवास:
पर्रीकर यांच्या गोव्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री पदापासून ते दिल्लीतील कठीण संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा प्रवास अत्यंत बारकाईने टिपला आहे.
व्यक्तिमत्त्व व देशभक्तीचं चित्रण:
त्यांची साधी राहणी, कामाची निष्ठा, विरोधकांना मात देण्याची शैली, आजाराशी दिलेली झुंज व देशासाठीची तळमळ प्रभावीपणे मांडली आहे.
कुठल्याही राजकीय नेत्याचे चरित्र किंवा आत्मचरित्र वाचताना वेगळी माहिती मिळण्याची वाचकांची अपेक्षा असते. त्यातल्या त्यात चर्चित किंवा ज्याच्याबद्दल प्रवाद आहेत किंवा ज्याच्या काही बाबींमुळे त्याच्याबदल चांगली वाईट चर्चा झाली असेल तर अशा नेत्यांबद्दलचे पुस्तक जास्त चिकित्सक पद्धतीने वाचले जाते. या पार्श्वभूमीवर वामन सुभा प्रभू यांनी लिहिलेले मनोहर पर्रिकर यांच्यावरचे ‘मनोहर पर्रीकर- ऑफ द रेकॉर्ड’ हे पुस्तक वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करते. या पुस्तकाची विशेष बाब म्हणजे लेखक स्वतः पर्रीकर यांच्या जवळच्या मित्रमंडळीमध्ये असूनही त्यांनी तटस्थपणाने हे चरित्र लिहिले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर यांना अफाट लोकप्रियता मिळाली यात शंका नाही, मात्र संरक्षणमंत्री म्हणूनही देशात त्यांचे कौतुकच झाले होते. त्यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात लोकांच्या त्यांच्याकडून खूपच अपेक्षा होत्या. संरक्षणमंत्रीपद हा काटेरी मुकुट होता पण त्या पदावर कम करताना पर्रीकर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रभू यांनी पर्रीकर यांच्या या राजकीय कारकिर्दीचा उदय आणि त्यांचे दुर्दैवी निधन इथपर्यंतचा काळ जवळून पहिला असल्याने अनेक बाबी त्यांनी स्पष्टपणाने लिहिल्या आहेत.
सुटाबुटात राहणी
पर्रीकर यांची राहणी साधी असली तर ही त्यांनी ती जाणीवपूर्वक स्वीकारली होती. ते जरी स्वभावाने तसे असले तरी हा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे हे त्यांनी मनोमन मान्य केले होते त्याचबरोबर त्यांचा जीव सुटबुटाच्या राहणीत रमत नसे हे जरी खरे असले तरी हा पोशाख त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेला होता हे ते आवर्जून लिहितात. या पुस्तकात प्रभू यांनी दोन ओळींच्या मधले जे भाष्य केले आहे ते खूपच चपखलपणे केले आहे.
पर्रीकर यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी जरी उजवी असली तरी ते जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी त्यांनी सरकार हादरवून सोडले होते. लोकांना आपल्याबरोबर घेऊन त्यांनी सरकाराच्या चुकीच्या धोरणावर कोरडे ओढून सरकारला नाकीनऊ केले होते. या पुस्तकाला प्रस्तावना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकेकाळचे अध्यक्ष सुरेंद्र शिरसाट यांनी लिहिली आहे त्यामुळे मगोप आणि भाजपची युती कशी झाली त्यात काहीवेळा कशा अडचणी आल्या त्याचाही तपशील इथे कळतो.
गोव्यात विरोधकांना नेस्तनाबूत करण्यात पर्रीकर वाकबगार होते. इतकेच नाही तर विरोधी सदस्यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा माग ठेवून योग्य वेळी त्याचा वापर करण्याची त्याची कला भारीच होती. एका प्रकरणात त्यांनी एक खासगी जागा संपादन करून लोकप्रतिनिधी कसा घोळ घालत असतात हे दाखवून दिले होते त्याचा तपशील पुस्तकातून मुळातच वाचण्यासारखा आहे.
पुस्तकातील एका प्रकरणात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि पर्रीकर यांच्या कारकिर्दीची तुलना केली आहे. पर्रीकर यांच्या खासगी आयुष्यातल्या काही गंमती जंमती अर्थातच जीवनशैलीमधल्या, म्हणजे छोटी झोप घेऊन ते पुन्हा कामाला कसे तयार होत, तसेच मासे हा त्यांचा कसा विकपॉइंट होता आणि लोकांशी बोलणे त्यांना कसे आवडत याचे तपशील प्रभू यांनी येथे दिले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत एजंटांचा कसा सुळसुळाट आहे हे त्यांनी कसे आवर्जून सांगितले व स्वतःला कामात कसे झोकून दिले होते त्याचा तपशील प्रभू इथे मोजक्या आणि नेमक्या शब्दात देतात.
गोव्याचा विकास आणि कामाची आस यातून, व पक्षाची सत्ता अबाधित राखण्यासाठी पुन्हा गोव्यात येणे त्यांनी कसे पसंत केले ते या पुस्तकातल्या माहितीवरून स्पष्ट होते. पर्रीकर यांचे हे चरित्र असले तरी केवल कोडकौतुक असे या पुस्तकाचे स्वरूप नाही. तर पर्रीकर यांना एका विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास कसा नडला त्याचीही तपशील इथे दिला आहे. आपल्या मतदारसंघात संपर्क ठेवण्याची त्यांची पद्धत कशी होती, त्यांनी त्यासाठी कशी एका समितीची स्थापना कशी केली होती तेदेखील प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.
गोव्यातले राजकारण आणि तेथील विविध पक्षांच्या नेत्यांचे दुसऱ्या पक्षात जाणे आणि भाजपने गोव्यासारख्या बहुभाषिक राज्यात आपले पाय कसे रोवले याचाही तपशील हे चरित्र वाचताना कळतो. पर्रीकर आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे संबंध किती चांगले होते ते कळतेच पण केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते असलेले प्रमोद महाजन यांचा वियोग पर्रीकर यांना कसा चटका लावणारा होता याची माहिती मिळते.
प्रखर देशाभिमान तसेच कामाचा उरक आणि एखादा प्रश्न समजावून घेण्याची पर्रीकर यांची हातोटी या गोष्टी या चरित्रातून वाचकांसमोर नेमकेपणाने उभ्या राहातात. त्यांच्या आवडीचे खेळ तसेच त्यांच्या आजारपणात त्यांची झालेली अवस्था पण त्यावर त्यांनी केलेली मात व त्यांनी आजाराशी दिलेली झुंज याची माहिती तर मिळतेच पण एवढ्या दुर्धर आजाराला ज्या धीरोदत्तपणाने पर्रीकर सामोरे गेले त्याची छाप वाचकाच्या मनावर पडते. या माणसाला आणखी आयुष्य मिळायला हवे होते, नियतीने त्यांच्यावर असा अन्याय करायला नको होता अशी चुटपूट वाचकाला लागते ही या चरित्राची ताकद आहे. पर्रीकर याचे आयुष्य कसे व त्यांची कामाची तळमळ कशी होती हे प्रभू यांनी वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली आहे.
पुस्तक - मनोहर पर्रीकर -ऑफ द रेकॉर्ड
लेखक - वामन सुभा प्रभू
प्रकाशक - सहित प्रकाशन, तिसवाडी, गोवा.
किंमत - २००
रुपये पृष्ठे - १८६
या पुस्तकात काय विशेष आहे?
लेखकाने पर्रीकर यांचे चरित्र तटस्थपणे आणि आंतरिक दृष्टिकोनातून मांडले आहे.
पर्रीकर यांच्या कोणत्या बाजूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे?
राजकीय कारकीर्द, वैयक्तिक जीवनशैली, देशभक्ती, आणि आजाराशी दिलेली लढा.
पुस्तक कोणत्या वाचकांसाठी उपयुक्त आहे?
राजकीय अभ्यासक, विद्यार्थी, आणि पर्रीकर यांच्या कार्याने प्रभावित झालेल्यांसाठी.
लेखकाने कोणती माहिती खास दिली आहे?
भाजप-गोमंतक युतीचे अंतरंग, दिल्लीतील एजंट संस्कृती, व पर्रीकर यांची लोकांशी असलेली नाळ.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.