Mahayuti Politics: महायुतीतीलच दोन पक्षांत रस्सीखेच; फडणवीसांनाच लक्ष घालावे लागणार!

Mahayuti Pune Municipal Election 2025: महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे सध्याचे पुण्यातील चित्र आहे. किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.
Mahayuti Pune Municipal Election 2025
Mahayuti Pune Municipal Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला प्रचंड आत्मविश्वास मिळाला आहे. विजयाचा हा ‘स्ट्राइक रेट’ कायम राखत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन श्रीमंत महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या, या दृष्टीने भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस हे महायुतीतील दोन पक्ष कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलीकडचे दौरे व विकासकामांबाबतचे त्यांचे निर्णय हे त्याचेच द्योतक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये अडकल्याने सर्वच पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. तीन वर्षे महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने अनेक इच्छुक प्रभागांमध्ये खर्च करून थकले आहेत. या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून पक्षबांधणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयात मेमध्ये निर्णय न झाल्यास या याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी होईल. त्यानंतर प्रभाग रचनेसाठी तीन महिने लागतील. यामुळे दिवाळीनंतर किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत निवडणुका होतील की काय याबाबत कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी पक्षीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने देश पातळीवरच मोहीम आखत मतदान केंद्रांपर्यंत नव्याने पक्षबांधणी करण्यावर भर दिल्याचे दिसून येते.

Mahayuti Pune Municipal Election 2025
Uddhav Thackeray: उद्ध्वस्त झालेला कोकणचा गड ठाकरेंसाठी आता अवघड

काँग्रेसनेही देश पातळीवर संघटना बळकट करण्याच्या हेतूने देशातील सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्लीत निमंत्रित केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्ह्यांत फेररचना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यातही काँग्रेसच्या नव्या कार्यकर्त्यांना पदे मिळतील. या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती; तसेच संभाव्य उमेदवारांची चाचपणी करता येणार आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे सध्याचे पुण्यातील चित्र आहे. किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी

पक्ष कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देऊन सक्रिय ठेवण्यावर भाजपचा भर असतो. यासाठी केंद्रीय पातळीवरून नियोजन होते. महत्त्वाचे म्हणजे त्याची तंतोतंत अंमलबजावणीही होते. अशा नियोजनापासून अन्य पक्ष आज तरी कोसो दूर आहेत. सत्ता मिळाली म्हणून गाफील न राहता कार्यकर्त्याला सतत कार्यरत ठेवण्याचा भाजप नेत्यांचा हा गुण अन्य सर्वच पक्षांनी आत्मसात करायला हवा. भाजपने आता मतदान केंद्रांच्या पातळीपर्यंत नव्याने पक्षबांधणी करण्यावर भर दिला आहे. केंद्रीय पातळीवरून ‘मंडल प्रमुख’पदाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष (विधानसभा अध्यक्ष) म्हणून एकाची निवड न करता प्रत्येक १०० मतदान केंद्रांमागे एक मंडल अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे यापुढे भाजपमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन ते पाच विधानसभा अध्यक्ष पाहायला मिळतील. बहुतांश विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, कोथरूडमधील मतदार संख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. या नव्या नियुक्त्यांंमुळे दहा हजार कार्यकर्त्यांना थेट पदे मिळणार आहेत. पक्षाचे देश व राज्यपातळीवर होणारे निर्णय, योजना आदींची माहिती मतदारांपर्यंत नेण्यात हेच लोक कळीची भूमिका बजावत असतात.

महायुती स्वतंत्र लढणार

महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, असे सध्याचे वातावरण आहे. भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यात खासदार गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व कोण करणार याचा पक्षात अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या दोघांकडे नेतृत्व आहे. त्याचवेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, तसेच भाजपचे आमदारही त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेतील. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच पुण्यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

गेल्या वेळी निवडून आलेल्या शंभर नगरसेवकांना; तसेच अन्य पक्षातून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना कसे सांभाळायचे, हा प्रश्न आहे. मुंबई वगळता अन्य महापालिकांत महायुतीतील घटकपक्ष स्वतंत्र लढतील, असे सूतोवाच फडणवीस यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक इच्छुकांना संधी मिळणार आहे.

Mahayuti Pune Municipal Election 2025
Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोदी सरकारला डिवचलं; Video व्हायरल! आम्ही पुन्हा एकदा...

अण्णा बनसोडे यांना संधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये दहा वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबदबा होता. आताही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष त्यांचाच आहे. पवार सध्या पालकमंत्री असल्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देताना पक्षाचे अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे सत्तेतील या दोन पक्षांत महापालिका निवडणुकीमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका लक्षात घेत त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे.

अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यात काही वर्षांत भाजपने चांगलाच जम बसविला आहे. अशा स्थितीत अजित पवार यांनी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष केले आहे. बनसोडे हे अजित पवार यांचे निष्ठावान आमदार मानले जातात. पहाटेचा शपथविधी म्हणून गाजलेल्या अजित पवार यांच्या पहिल्या बंडाच्यावेळी शेवटपर्यंत त्यांच्यासमवेत राहिले ते केवळ बनसोडे. त्यांच्या निवडीने पवार यांनी कार्यकर्त्यांना योग्य तो मेसेज दिला आहे. जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या निवडणुकांत साखर पेरणी करीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दिशेने पावले टाकली आहेत.

शिवसेनेचेही पुण्याकडे लक्ष

महायुतीतील तिसरा घटकपक्ष शिवसेनेनेही पुण्याकडे लक्ष वाढविण्यास सुरवात केली आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासोबतच काही नगरसेवक शिवसेनेत आले. काही प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला अडचण होण्याची शक्यता आहे. कसबा पेठ, कोथरूड, हडपसरमध्ये ही परिस्थिती दिसून येईल. १९९५ला राज्यात युतीचे सरकार आले त्यावेळी पुण्यातून शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. कोथरूड शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यानंतरही पुण्यातून किमान दोन आमदार निवडून येत. मात्र मधल्या काळात उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

त्याचा फटका शिवसेनेला बसला आणि शहरात भाजपने संपूर्ण वर्चस्व निर्माण केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना जिल्हा संपर्कप्रमुख बनवून त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपविली आहे. शिवसेनेकडे सर्व काही आहे. मात्र शिवसेना कुठे आणि का कमी पडते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ती योग्यही आहे. आज शिवसेनेकडे हक्काचा मतदार आहे, मात्र केवळ मुंबईतून होणाऱ्या दुर्लक्षामुळे पक्षाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे सामंत यांना प्रत्येक प्रभागात संघटना बांधणी करावी लागणार आहे.

कॉँग्रेसपुढे गटबाजीचे आव्हान

विरोधकांमध्ये मात्र सध्या फारसे आक्रमक वातावरण नाही. काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्याला भेट देत काँग्रेस भवनमध्ये माजी आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आज जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक आहेत. पण गटबाजी मात्र शाबूत आहे. घराणेशाहीचा वारसा नसलेल्या सपकाळ यांच्याकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करायचा असतील तर सपकाळ यांना गटबाजी मोडून काढत सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही (शरद पवार) पक्षबांधणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. आज या पक्षाकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यात अनेक जुनेजाणते नेते, माजी आमदार, नगरसेवक आहेत. त्या-त्या भागात आजही त्यांच्या शब्दाला वजन आहे. अशा स्थितीत जुन्या नव्यांना संधी देत पक्षाला वाटचाल करावी लागणार आहे. खडकवासला, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांतील काही प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्या ठिकाणी ते एकत्रितरीत्या भाजपला तोंड देऊ शकतील. महाआघाडीसाठी आगामी निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे पक्ष जितक्या वेगाने पक्षबांधणी करतील तितका त्यांना लाभ होईल.

विकासकामातून राजकारण

शहरी मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल तर ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांचा फार उपयोग नाही. त्यांना मेट्रो, फ्लायओव्हर, विमानतळ अशा दृश्य कामांत विकास जाणवतो. याची पुरेपूर जाण भाजपला आहे. पुण्यासारख्या शहरात आज राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण नोकरीसाठी स्थलांतरित झाला आहे. या तरुणाईला हवा आहे तो फक्त रोजगार व विकास. या पिढीला राजकारणात रस नसला तरी पायाभूत विकासाकडे त्यांचे लक्ष असते. तरुण शहरी नवमतदार जोडायचा असेल तर नजरेत भरतील असे भव्य विकास प्रकल्प राबविणे ही आजच्या राजकारणातील गरज आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारने नुकतेच दिले. यापाठोपाठ पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडॉर (औद्योगिक) महामार्गासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली. सध्या पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. ग्रीन कॉरिडॉरमुळे या शहरांतील अंतर दोन ते अडीच तासांवर येणार आहे. रिंग रोडच्या कामालाही गती देण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या काही दिवसांत केले जाण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com