Uddhav Thackeray: उद्ध्वस्त झालेला कोकणचा गड ठाकरेंसाठी आता अवघड

Uddhav Thackeray Shiv Sena Konkan political: रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेच्या या वर्चस्वाला साधारण २००४मध्ये पहिल्यांदा धक्का बसला. कोकणचे नेतृत्व करणारे नारायण राणे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले.
Uddhav Thackeray Shiv Sena Konkan political
Uddhav Thackeray Shiv Sena Konkan politicalSarkarnama
Published on
Updated on

कोकणात विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या त्सुनामीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुरू झालेली पडझड अजून थांबलेली नाही. एक एक बालेकिल्ला ढासळत जात अगदी काही महिन्यांपूर्वी राजकीय स्पर्धेतील या दमदार पक्षासमोर आता अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नेतेच संभ्रमात असल्याने कार्यकर्त्यांना कोणी वालीच नसल्याची स्थिती आहे. कोकणात शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले; मात्र यावेळच्या स्थितीतून सावरणे त्यांना तितकेसे सोपे राहिलेले नाही.

अगदी स्थापनेपासून शिवसेना पर्यायाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण यांचे वेगळे नाते राहिले आहे. सुरुवातीला मुंबईत पक्ष वाढवत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून झुंजणारे शिवसैनिक प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्गातील होते. रायगडनेही या पक्षाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. पुढे शिवसेना महाराष्ट्रभर पसरवण्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नाला याच कोकणने बळ दिले. या पक्षाने कोकणात अनेक चढउतार पाहिले असले, तरी ‘मातोश्री’च्या मनात कोकणासाठी कायमच एक हळवा कोपरा राहिला आहे. कोकणानेही या पक्षाला तितकेच निस्वार्थी प्रेम दिले; मात्र आज 'मातोश्री'शी जोडलेली ठाकरे शिवसेना याच कोकणात अस्तित्वाची लढाई लढत आहे.

शिवसेनेचा कोकणात झंझावात

शिवसेनेची कोकणातील स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड अशा दोन टप्प्यांत विचार करावा लागेल. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांना कोकण साथ देईल असा विश्‍वास होता. कारण मुंबईत पक्ष वाढवण्यासाठी जीवाचे रान करणारे शिवसैनिक याच लाल मातीतून आले होते. मुंबईत पक्ष वाढवत असतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्गातही संघटना वाढीचे प्रयत्न सुरू होते. या काळात या भागावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा मजबूत पगडा होता. त्याला शह देत भगवा फडकवणे सोपे नव्हते. पुढे ८०च्या दशकाच्या शेवटी समाजवादी पक्षाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आणि सक्षम विरोधी पक्षाची पोकळी जाणवू लागली. याच दरम्यान बाळासाहेबांनी कोकणात उतरण्याचा निर्णय घेतला.

Uddhav Thackeray Shiv Sena Konkan political
CPM मध्ये मोठा बदल; 'सामर्थ्यवान' जोडपे बाहेर पडण्याच्या तयारीत; नव्या महासचिवाचे नाव जाहीर

मुंबईच्या राजकारणात स्थिरावलेल्या चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचा आदेश निघाला. यानंतर अगदी मंडणगडपासून सावंतवाडीपर्यंत विधानसभेच्या राजकारणात मुंबईकर चाकरमान्यांनी सक्रिय प्रवेश केला. मुंबईकर चाकरमानी असलेले नारायण राणे १९९०च्या निवडणुकीत कणकवलीमधून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर शिवसेनेचा झंझावात वाढतच गेला. सूर्यकांत दळवी, गणपत कदम, रामदास कदम, भास्कर जाधव, शंकर कांबळी, शिवराम दळवी, रवींद्र माने अशी आमदारांची फौज भगवा घेऊन कोकणातून विधानसभेत गेली. हळूहळू जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सब कुछ शिवसेना अशी स्थिती तयार झाली.

नारायण राणेंच्या रूपाने पहिला धक्का

रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेच्या या वर्चस्वाला साधारण २००४मध्ये पहिल्यांदा धक्का बसला. कोकणचे नेतृत्व करणारे नारायण राणे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्या या निर्णयाने अवघ्या काही तासांत सिंधुदुर्गातील शिवसेना जवळपास शून्याकडे आली. २००५ला झालेल्या पोटनिवडणुकीत राणे आणि कांबळी हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेची अनामत जप्त करत निवडून आले. यावेळी प्रकृती ठीक नसतानाही स्वतः शिवसेनाप्रमुख मालवण सभा घ्यायला आले होते. तरीही पक्षाचा दारुण पराभव झाला. यानंतर सिंधुदुर्गात काँग्रेसचे पर्व सुरू झाले.

Uddhav Thackeray Shiv Sena Konkan political
Deenanath Hospital Case: तपासाची चक्रे फिरली! गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांचे मोठे पाऊल

या घडामोडीचा रत्नागिरीवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. तेथे भगव्याची पकड कायम राहिली; मात्र २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंच्या रुपाने काँग्रेसच्या झालेल्या विजयाने पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसला. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा चाकरमानी असलेल्या विनायक राऊत यांना सिंधुदुर्गात पक्ष बांधणीसाठी रवाना केले. शिवसेनेच्या पुन:उभारणीत राऊतांना यश आले. नवे कार्यकर्ते पक्षाला जोडले गेले. यातून २०१४ ला राऊत लोकसभेवर निवडून गेले.यानंतरच्या विधानसभेत खुद्द राणेंना पराभवाचा धक्का पचवावा लागला. शिवसेना पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचली.

ठाकरेंची पीछेहाट व पुन्हा राणेराज

गेल्या अडीच वर्षात झालेल्या राज्यस्तरीय घडामोडींनी राजकारण पुन्हा बदलले. शिवसेनेत फूट पडली. असे असले तरी दीपक केसरकर आणि उदय सामंत वगळता इतर आमदार मात्र ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. लोकसभा आणि त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला कोकणातून पुन्हा ताकद मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र लोकसभेत राऊत यांच्या पराभवाने पुन्हा गणिते बदलू लागली.

शिवसेनेतील अंतर्गत कलह वाढू लागला. २०२४च्या निवडणुकीने आणलेली त्सुनामी ठाकरे शिवसेनेला कोकणातून उद्ध्वस्त करणारी ठरली. लोकसभेत नारायण राणे आणि विधानसभेत नीतेश राणे व नीलेश राणे यांच्या विजयाने पुन्हा एकदा राणेराज सुरू झाले.

विधानसभा निकालानंतर दोन्ही जिल्ह्यांतील ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते कोणी वालीच नसल्याने संभ्रमात आहेत. नेते पर्यायांच्या शोधात आहेत. या भागाचे नेतृत्व करणाऱ्या विनायक राऊत यांच्याबाबतही त्यांच्याच नेत्यांनी आरोप केल्याने एकूणच संघटना दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्गात वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक आदी ठाकरे शिवसेनेचे नेते पडझड रोखण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्याला मर्यादा आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून ठाकरे शिवसेनेत आलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे. तिकडे रत्नागिरीत माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला आहे. जिल्हाप्रमुख विलास चाळके, बंड्या साळवी यांनीही पक्ष सोडला आहे. माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी शिंदे शिवसेनेचा रस्ता धरला आहे. दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तेथेही ठाकरे शिवसेनेचे सैनिक शिंदे शिवसेना आणि भाजपकडे आकर्षित होत आहेत. या भागातून निवडून आलेले एकमेव आमदार भास्कर जाधव यांचा गुहागर व चिपळूणमध्ये असलेला प्रभाव वगळता इतर भागात कार्यकर्त्यांना वाली नसल्याचे चित्र तयार झाले आहे.

Uddhav Thackeray Shiv Sena Konkan political
Ajit Pawar Politics: अजितदादांची 'छत्रपती' मध्ये खेळी, पडसाद माळेगाव कारखान्यात!

रायगडची तऱ्हाच न्यारी

रायगड जिल्ह्याची स्थित्यंतरे याहून वेगळी आहेत. मुंबई-ठाण्याचा शेजार असूनही या भागात शिवसेना इतर कोकणाप्रमाणे कधी वाढलीच नाही. या भागात अगदी ग्रामीण भागापर्यंत असलेली शेतकरी कामगार पक्षाची पकड हे याचे मूळ कारण. शिवसेना कधी ‘शेकाप’ची तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन वाढत राहिली. शेकापकडे सहकार, विविध कामगार संघटना, शेतकऱ्यांशी संबंधीत संघटना असल्याने त्यांचा लोकांशी थेट संपर्क होता आणि आहे.

शिवसेना अगदी तळागाळातील लोकांना जोडून मजबूत होणारी संघटना मानली जाते. रायगडमध्ये ही जागा शेकापने आधीच मिळवली असल्याने त्यांना वर्चस्वासाठी कायमच संघर्ष करावा लागला. असे असले तरी श्रीवर्धनसारखे पॉकेट शिवसेनेकडे दीर्घकाळ राहिले. तत्कालीन आमदार शाम सावंत, प्रभाकर मोरे यांनी विधानसभेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले. पुढे राणेंच्या काँग्रेस प्रवेशावेळी सावंत त्यांच्यासोबत गेले; मात्र पुढच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या तुकाराम सुर्वेंनी पराभव करून भगवे वर्चस्व कायम राखले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com