नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवल्याने जवळपास निम्मा पंजाब (Punjab) अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या ताब्यात आला आहे. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आलेल्या असताना काँग्रेसच्या ताब्यातील निम्मे राज्यच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ताब्यात घेतल्याचे बोलले जात होते. आता याला काँग्रेसनेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे.
अमित शहांच्या डावावर आज पंजाब सरकारने प्रतिडाव टाकला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज केंद्र सरकारने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्याच्या अधिसूचनेच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. ही अधिसूचना राज्याचा अपमान करणारी असून, ती मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. केंद्र सरकारची अधिसूचना नाकारणारा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. पंजाब विधानसभेतील भाजपच्या दोन आमदारांनी सभात्याग केल्याने हा ठराव बिनविरोध मंजूर झाला.
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी हा ठराव मांडला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी म्हणाले की, बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 40 किलोमीटरपर्यंत वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पंजाबच्या विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. पंजाबचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या प्रकरणी गरज पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत सीमा सुरक्षा, जम्मू व काश्मीर आदी मुद्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नुकताच त्यांनी बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. या भागात तपास करणे, संशयितांना अटक करणे, जप्ती करणे असे अधिकार मिळाले आहेत. पंजाब, पश्चिम बंगाल व आसाममध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र केवळ 15 किलोमीटर होते. आता सुधारित आदेशानुसार हे क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बीएसएफला तपासणी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.
बीएसएफला यापूर्वी पंजाबमध्ये केवळ 15 किलोमीटरपर्यंत अधिकारक्षेत्र होते. आता हे क्षेत्र 35 किलोमीटरने वाढवून ते 50 किलोमीटर करण्यात आले आहे. पंजाबचे क्षेत्रफळ सुमारे 50 हजार चौरस किलोमीटर आहे. आता बीएसएफच्या ताब्यात निम्मे राज्य म्हणजे 25 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गेला आहे. याला काँग्रेसने विरोध केला असून, संघराज्य रचनेवरील हल्ला असल्याचे म्हटले होते. यावरुन केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यांच्या स्वायत्ततेवरच केंद्रातील भाजप सरकार घाला घालत आहे, अशीही टीका केली होती.
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन एकाच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात कॅप्टन अमरिंदरसिंग आघाडीवर होते. पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यातच अमित शहांनी ही खेळी खेळून निवडणुकीआधीच निम्मा पंजाब केंद्र सरकारच्या ताब्यात घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.