Raj Thackeray News : राज ठाकरेंचा एकच शब्द 'महायुती'च्या पोटात गोळा आणणारा; पहिल्यांदाच थेट भाष्य...

Raj Thackeray’s Big Statement at MNS Mumbai Rally : मी विकासाच्या आड येणारा माणूस नाही. पण मराठी माणसाच्या थडग्यावर हा विकास होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpgsarkarnama
Published on
Updated on

MNS Mumbai rally : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत मतदारयाद्यांतील कथित घोळावरून सत्ताधाऱ्यांवर चांगलाच आसूड ओढला. अदानी-अंबानी, वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करत राज यांनी थेट अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. त्याचे कनेक्शन त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी जोडले. तसेच युतीबाबतही त्यांनी पहिल्यांदाच सूचक भाष्य केले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी यापूर्वी अनेकदा तसे संकेत दिले आहेत. त्यानंतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतही निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत दिसले. आतापर्यंत त्यांनी एकदाही युतीबाबत थेट विधान केले नव्हते. पण आज मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात त्यांनी एकाच शब्दातून आपली भूमिका जणू स्पष्ट केली आहे.

मतदारयाद्यांमधील घोळाबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज यांनी घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सांगितले. त्याचवेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना त्यांनी आमच्या पक्षाचे नेते, सहयोगी पक्षाचे नेते जेव्हा येतील, त्यांना सहकार्य करा, असे म्हटले. या विधानातील ‘सहयोगी’ हा शब्द महत्वाचा आहे. राज यांनी यापूर्वी एकदाही कुठल्याही निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी युती केलेली नाही. त्यांनी सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांवर, नेत्यांवर टीका केली. पण या भाषणांमध्ये त्यांनी कधीही सहयोगी पक्ष असा उल्लेख केल्याचे ऐकिवात नाही.

आज राज यांनी सहयोगी पक्ष असा उल्लेख करत जणू युतीवर शिक्कामोर्तबच केले आहे. आता फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. पण ही युती फक्त उद्धव ठाकरेंसोबतच असणार की काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यात असणार, याबाबत संभ्रम आहे. त्यावरचा पडदाही पुढील काही दिवसांत उघडेल. पण दोन्ही बंधू एकत्रित येणार हे निश्चित झाले आहे.

महायुतीसाठी ही बातमी पोटात गोळा आणणारी असेल. प्रामुख्याने मुंबईसाठी दोन्ही बंधू पहिल्यांदाच एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा निश्चित ठाकरेंना फायदा होणार, अशी चर्चा आहे. मनसेची मुंबईत अजूनही ताकद आहे. ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे, भाजपकडे गेले असेल तरी युती झाल्यास मतदार मात्र ठाकरेंच्याच बाजूने राहतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे काँग्रेसची जेमतेम तर शरद पवारांच्या पक्षाची ताकद क्षीण आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे विरुध्द महायुती अशीच लढत अपेक्षित आहे.

आज राज यांनी आपल्या भाषणातून याच लढाईकडे आपल्या मोर्चा वळवला आहे. ठाणे जिल्हा हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून हे सगळं चाललं आहे. बुलेट ट्रेनला याचसाठी विरोध केला होता. वाढवण बंदर, विमानतळ येतेय. हे कशासाठी? ह्यांचा प्लॅन काय तो लक्षात ठेवा. मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स कमी करून नव्या विमानतळावर नेण्यात येईल. कार्गो वाढवणला नेण्यात येईल. अदानी, अंबानी, गुजरातचा वरंवटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हालाही बघणार नाहीत. शहरे अदानी, अंबानीला आंदण म्हणून देण्याचा प्लॅन आहे. सगळे अदानीला दिले जात आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

मी विकासाच्या आड येणारा माणूस नाही. पण मराठी माणसाच्या थडग्यावर हा विकास होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आमच्याकडे कुंपणच शेत खातंय. आपलीच काही मराठी माणसं ह्यांच्यासाठी दलाल म्हणून काम करत आहेत. केंद्र, राज्य तर हातात आहेच. उद्या जिल्हा परिषदा, महापालिका हातात आल्या तर रानचं मोकळं, असे म्हणत राज यांनी पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा पुढे आणला आहे.

हे सहज सुरू नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला होता. हे जुनं आहे. आता बोगस मतदानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदा, महापालिका ताब्यात घेत आहेत. हे सगळं हातात आलं की नंतर तुम्ही काय करणार? एकदा जमीन हातातून गेली की परत येत नाही. जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे त्यासाठीच ही सगळी रचना असल्याचे सांगत राज यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील मतदारांनी सतर्क राहावे. आमच्या पक्षाचे नेते, सहयोगी पक्षाचे नेते जेव्हा येतील, त्यांना सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांनाही केले. मतदान यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान राज ठाकरेंनी दिले. जे मतदान होईल, ते खरं होईल, याच दृष्टीने निवडणुका झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. सर्वांनी मतदारयाद्यातील मतदारांची पडताळणी करा, कोण कुठे राहतंय, किती जण राहतात, हे शोधा. प्रत्येक घरात जाऊन, सर्वच पक्षांनी हे तपासले पाहिजे. हे स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. मतदारयाद्या स्वच्छ व्हायला हव्यात. आधीच पाच वर्षे गेली आहेत. आणखी एक वर्षे जाऊ द्या, असेही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com