Raj –Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ‘एक’ अन् काँग्रेसपुढे पेच ! महाविकास आघाडीत फूट?

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance:  भाजपसोबत राहून अनेक दशके कॉँग्रेसविरोधी राजकारण करणाऱ्या शिवसेनेने कॉँग्रेससोबत घरोबा केल्यामुळे भाजपकडून टीका झाली होती. तर राज यांनी आपला मराठीचा मुद्दा आणि कडवे हिंदुत्व सोडले नव्हते. याच मुद्द्यावर भविष्यात महाविकास आघाडी राज ठाकरे यांचे स्वागत करणार का?
MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
MNS Uddhav Thackeray Shiv Sena allianceSarkarnama
Published on
Updated on

 महत्वाचे मुद्दे (Summary)

  1. राज-उद्धव एकत्र येण्याचे परिणाम: राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची मेळाव्यातून झालेल्या एकत्रीकरणाने राज्यातील राजकारणात उत्साह, चर्चा आणि नव्या समीकरणांना चालना मिळाली आहे.

  2. मविआतील विरोध आणि काँग्रेसचा पेच:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व डाव्या पक्षांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले असले तरी काँग्रेस अलिप्त आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतांची चिंता काँग्रेससाठी निर्णायक ठरते आहे.

  3. स्थानिक निवडणुकीतील संभाव्य बदल: मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये राज-उद्धव युतीचा प्रभाव जाणवू शकतो; मात्र काँग्रेस स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता, आणि राज्यात नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची चिन्हं आहेत.

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
Aaditya Thackeray: 'मातोश्री'च्या अंगणात झळकले 'दिशा सालियान' चे बॅनर; काय प्रकार आहे?

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या मुद्दावरून मराठी जनमानस पेटून उठले. मुंबई-पुण्यासह राज्यात इतरत्र मराठीजन खवळल्याचे ओळखून आणि राज-उद्धव या दोन ठाकरे भावांनी मुंबईत एकत्र मोर्चा काढण्याचे जाहीर केले. २० वर्षांनंतर दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाची जशी सर्वांना उत्सुकता होती, तशी सरकारनेही थोडी धास्ती घेतलीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चाणाक्षपणा दाखवत पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी पहिलीपासून हिंदी सक्तीचे विधेयक मागे घेत एक पाऊल मागे घेतले.

सरकार माघारी फिरल्याची घटना मोठी होती. आणि या गोष्टीचा ‘इव्हेंट’ करणार नाही ते मग ठाकरे बंधू कसले? हिंदी सक्तीचे विधेयक मागे घेतल्याबद्दल आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे यांनी आपसातील दोन दशकाचा दुरावा मोडून काढत पाच जुलै रोजी मुंबईत एनएसई डोम येथे आनंद मेळाव्यात एकमेकांच्या हातात हात गुंफणे ही घटना सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारी अशीच म्हणता येईल.

शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन तर आधीच झाले होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या या विधेयकामुळे राज-उद्धव एकत्र येणार या गेले दोन दशक सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला. राज-उद्धव एकत्र आल्याने एकीकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दुसरीकडे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम निश्चितच होणार आहे.

राजच्या एन्ट्रीने ‘मविआ’त फूट?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ने निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणली होती. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला सहाय्यभूत ठरेल अशी भूमिका घेतली होती. राज्यात आघाडीचा प्रचाराचा भार जवळपास राज ठाकरेंनीच उचलला होता. राज ठाकरेंचे ‘व्हिडिओ’ प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना रोखण्याची भाजपला गरज वाटू लागली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला तोंड फुटण्यापूर्वी राज ठाकरेंना आलेल्या ‘ईडी’च्या नोटीसीनंतर राज ठाकरे मोदी सरकारच्या विरोधात व्हिडिओ लावण्याच्या भानगडीत पडले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरच्या काळात त्यांनी ‘मशिदीवरील भोंगे’ सारखे विषय घेऊन भाजपला मदतच केली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या ‘बिनशर्त’ पाठिंब्याचा फायदा मुंबईसारख्या शहरात भाजपला झाला. मात्र राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असतानाही त्यांच्यासाठी ती जागा महायुतीने सोडली नाही. तिरंगी झालेल्या या लढतीत शिवसेना ठाकरे पक्षाने माहिम मतदारसंघ स्वत:कडे राखला.

‘पोलिटिकली करेक्ट’ भाष्य करण्यात राज ठाकरेंचा हात कुणाला धरता येणार नाही. २०१९ मध्ये आघाडीने आणि त्यानंतरच्या काळात महायुतीने देखील पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांचे आकर्षण सर्वच राजकीय पक्षांना राहिलेले असले तरी त्यांच्या भोंगे, उत्तर भारतीय या भुमिकांमुळे काँग्रेस त्यांच्यापासून यापुढच्या काळातही अंतर ठेवण्याचीच शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना मनसे वर्ज्य असण्याचे कारण नाही.

राज-उद्धव एकत्रिकरणाच्या मेळाव्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, डाव्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मात्र ‘मविआ’चा प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसचा राज्यातला एकही वरिष्ठ नेता राज उद्धवद्वारे आयोजित ‘आनंद मेळाव्या’त हजर नव्हता. कॉँग्रेसने या मेळाव्यातील गैरहजेरीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. याचा मविआच्या एकीवर काय परिणाम होऊ शकतो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होऊ शकेल, याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

राज यांचे राजकारण कॉँग्रेसच्या अडचणीचे

शिवसेनेतून बाहेर पडून मनसे पक्ष स्थापन केल्यापासून राज ठाकरे यांनी आक्रमकपणे मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे. राज्यात सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या लावण्याचा विषय मनसेने जोरकसपणे लावून धरला होता. सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याचा मुद्दा असो की मुंबईत मराठी बोलण्याचा मुद्दा, यासाठी मनसे पक्षाने अनेकदा राज्यभर आंदोलन केले होते.

२००८ साली मनसेने उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या हिंसक आंदोलनानंतर राज ठाकरे यांना अटक झाली होती. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसे पक्षाने मुंबईसह पुणे, नाशिक या शहरांमध्ये चांगले राजकीय पाठबळ मिळाले होते.

याचाच परिणाम म्हणून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आले होते. २०१२ साली मुंबई महापालिकेत २७ नगरसेवक, पुणे महापालिकेत २९ नगरसेवक तर नाशिकमध्ये ४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. २००९ च्या विधानसभेत साडे पाच टक्के मते मिळविणारा मनसे पक्ष गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीड टक्क्यावर आला आहे.

मतांची टक्केवारी ओसरली असली तरी जनमानसावर राज यांचा प्रभाव कायम असल्याचे वेळोवेळी झालेले मनसेचे मोर्चे, सभा यातून दिसून आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने राज्यस्तरीय राजकारणाचे विषय असलेल्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत त्यांचे एकमत होणे सोपे आहे.

परंतु महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसला मात्र राज ठाकरे उचलत असलेले हे सर्व मुद्दे देशाच्या इतर राज्यातील राजकारणात अडचणीचे ठरणारे आहेत. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांच्या विरोधात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे यांची उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी विरोधी, नकारात्मक राजकारणी नेत्याची प्रतिमा निर्माण केली आहे. अशातच येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

बिहारमध्ये सत्ताधारी जनता दल (संयुक्त) - भाजप विरोधातील आघाडीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल सोबत कॉँग्रेस हा मुख्य मित्र पक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जर कॉँग्रेस राज ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत असेल तर त्याचा बिहारच्या निवडणुकीत कॉँग्रेसला थेट फटका बसण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याला कॉँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून विरोध होतोय. राज-उद्धव यांच्या आनंद मेळाव्यात कॉँग्रेसचा एकही नेता सामील न होण्यामागे हे प्रमुख कारण असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
Nashik politics: विधिमंडळात नाशिकची फौज; चार मंत्री अन् १० आमदार! पदरात काय पडले?

भोंगेविरोधी भूमिका; मुस्लिम मतविभाजनाचा धोका

राज्यात २०२२ साली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळावरील भोंग्यातूनन रात्री दहा ते पहाटे सहा या कालावधीत एका ठराविक डेसिबलपेक्षा अधिक आवाज असता कामा नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रार्थनास्थळावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास मनसैनिक मशिदींवरील भोंगे उतरवतील, असा इशारा सरकारला दिला होता. राज ठाकरे हे केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याविरोधी आक्रमक भूमिकेमुळे देशभरातील मुस्लिम समाजात अस्वस्थता पसरून चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मनसैनिक मशिदीवरील भोंगे उतरवायला गेल्यास संघर्ष पेटून सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती त्यावेळी व्यक्त करण्यात येत होती.

एकीकडे राज हे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करत असताना त्यांच्या भोंग्याविरोधी भूमिकेचे काय, असा प्रश्न कॉँग्रेसचे अनेक नेते उपस्थित करत आहेत. राज यांच्यासोबत एकी केल्याने उद्धव यांना त्याचा राजकीय लाभ होण्याची शक्यता दिसत असली तरी कॉँग्रेस पक्षाला मात्र त्यांचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम समाज दुरावण्याची भीती वाटत आहे.

'स्थानिक’मध्ये कॉँग्रेसचे ‘एकला चलो’?

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव यांची ‘एकी’ मुंबई, पुणे, नाशिकसह इतर काही शहरांमध्ये राजकीय चित्र बदलेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने आपली वेगळी चूल मांडल्यास त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवाय महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारसंघ अगदी छोटे असल्याने राजकीय पक्षाच्या राज्यस्तरावरील युत्या किंवा आघाड्या एकत्र येऊन निवडणुका लढतील असेही नाही. अनेकदा आपआपले गढ राखण्यासाठी विविध पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र मार्गच चोखाळत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे राज यांच्या ‘एन्ट्री’मुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे तयार होणार, हे स्पष्ट आहे.

  1. प्रश्न: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का आले?
    उत्तर: मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने ते एकत्र आले.

  2. प्रश्न: राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामाविष्ट करण्यात काँग्रेसचा आढावा काय आहे?
    उत्तर: मशिदीवरील भोंगे व उत्तर भारतीयविरोधातील राज यांची भूमिका यामुळे काँग्रेसने मनसेला दूर ठेवले आहे

  3. प्रश्न: राज-उद्धव एकत्र आल्याने स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होईल?
    उत्तर: मुंबई, पुणे, नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो, पण काँग्रेस वेगळी लढल्यास महायुतीला संधी मिळू शकते.

  4. प्रश्न: काँग्रेस नेते राज-उद्धव यांच्या एकत्र कार्यक्रमाला गैरहजर का होते?
    उत्तर: मुस्लिम मतदारांचा राज यांच्याविषयीचा राग आणि बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीमुळे काँग्रेसने अंतर ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com