Mumbai News : मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या चार महिन्यापासून जोरात रंगल्या आहेत. त्यातच आता हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात हे दोन बंधू एकत्र आले तर राजकीय समीकरण बदलणार आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच असतानाच ठाकरे बंधू एकत्र आले तर येत्याकाळात चित्र 360 डिग्रीमध्ये बदलणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका चार महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये भाजपने (BJP) आघाडी घेतली होती. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहावयास मिळत होती. मात्र, या सर्व्हेच्या आधारेच दुसऱ्या बाजूचा विचार केला तर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये 227 प्रभाग आहेत. त्यापैकी जवळपास 100 प्रभागात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या 100 प्रभागाचा विचार केला तर या प्रभागात दोन्ही ठाकरे बंधूंचे वर्चस्व असणार आहे. त्या तुलनेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) प्रभाव कमी राहणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी या 100 प्रभागातील मतदारांचा कौल हा निर्णायक ठरणार आहे.
आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या दहा जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व झुगारून चालणार नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसात शिवसेनकडील 100 पैकी जवळपास 50 माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत व भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या नगरसेवकाचा जाण्याचा परिणाम काय होणार ? यावरही या ठिकाणचे समीकरण अवलंबुन असणार आहे.
मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वी 'विकली वाईब'ने सर्वेक्षण केले आहे. या सर्व्हेक्षणात पुढे आलेली आकडेवारी लक्षवेधी ठरणार आहे. या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत भाजप सर्वात आघाडीवर आहे. तर शिवसेनेत (Shivsena) फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालविण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले तर त्यांना मुंबईकरांचा मोठा पाठिंबा या सर्वेक्षणातून मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे व शिवसेना ठाकरे गटाची युती झाली तर मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
मुंबईतील महापालिका निवडणूका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या तर कोणाला पाठींबा? देणार या प्रश्नावर 31.0 टक्के नागरिकांनी भाजपला पाठींबा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर 23.9 टक्के जणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. तर मनसेला 11.2 टक्के लोकांनी पाठींबा दिला तर एकनाथ शिंदे यांना 6.3 टक्के जणांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे एकत्र आले व दुसरीकडे भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आले तर ही लढत चुरशीची होऊ शकते.
दुसरीकडे येत्या काळात जर बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पाठींबा द्याल का? या प्रश्नावर राज आणि उद्धव ठाकरे युतीला 52.1 टक्के तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 26.2 टक्के तर काही सांगू शकत नाही असे 21.8 टक्के लोकांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहे.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र आल्यास मुंबईतला मराठी माणूस दोन्ही ठाकरेंच्या सोबत एकजुटीने उभा राहील. तर दुसरीकडे, दोन्ही ठाकरेंनी जरी मराठी मतदार केंद्रित केले तरी हिंदीच्या मुद्यावरून उत्तर भारतीयांची सुद्धा एकजूट होईल. उद्धव ठाकरेंचा मुंबईतला संघटन आणि राज ठाकरेंच वक्तृत्व यामुळे दोन्ही सेनांना मोठे यश मिळेल. तर काही जणांना वाटते की, भाजपचेही अनेक वार्डात मराठी उमेदवार असल्यामुळे त्यांना हिंदी भाषिकांचे मतदान बोनस म्हणून मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.