Bjp News : एप्रिल 2019 मध्ये पत्रकारांनी अमित शाह यांना एक प्रश्न विचारला होता. भाजपच्या खासदारांना अँटी इनकम्बन्सीचा सामना करावा लागत आहे का, असा तो प्रश्न होता. त्यावर शाह म्हणाले होते, प्रत्येक मतदारसंघात ते खासदार लढणार नसून, प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असतील. मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच देश मतदान करणार आहे...! नरेंद्र मोदी सर्वात वर आहेत, पक्षात इतरांना लागू होणारे नियम मोदींना लागू होणार नाहीत, असा संदेश अमित शाह यांनी त्यावेळीच दिला होता.
भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे, असे कुणाला वाटत असेल तर तसे समजण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. वास्तव काय आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आजच्या (19 जानेवारी 2024) सोलापुरातील भाषणावरून पुन्हा एकदा लक्षात आले असेल. वयाची पंचाहत्तरी पार केली, म्हणून लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आदी पक्षवाढीत मोठे योगदान असलेल्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात ढकलून देण्यात आले.
सत्तरी पार केलेल्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा अलिखित नियम करणारे 73 वर्षीय मोदी म्हणतात की, 2024 च्या निवडणुकीनंतर मीच पंतप्रधान होणार...! वय आणि उमेदवारी, यासह प्रत्येक मतदारसंघातून मोदीच लढणार आहेत, या मुद्द्यांच्या आधारे मोदी-शाह यांनी पक्षात आपल्याला कुणी स्पर्धक तयार होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
वयाची सत्तरी पार केलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही, असा अलिखित नियम भाजपने केला आहे. राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी देता यावी, यासाठी 70 पेक्षा अधिक वय असलेल्या आणि तीनवेळा खासदार झालेल्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असा फॉर्म्युला कर्नाटक भाजपनेही सुचवला होता. हा फॉर्म्युला फक्त कर्नाटकसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशभरात लागू करण्याची चर्चा त्यावेळी झाली होती.
वयाची 75 पार केलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे, असेही अमित शाह (Amit Shah) एप्रिल 2019 मध्ये म्हणाले होते. या निर्णयामुळेच लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ दिग्गज नेत्यांना बाजूला बसावे लागले होते. आता तर ते राजकीय पटलावरून गायब झाले आहेत. त्यांना राजकारणातून बाजूला करण्यासाठी मार्गदर्शक मंडळ नावाची गोंडस संकल्पना तयार करण्यात आली आणि त्यात अशा दिग्गज नेत्यांना बसवण्यात आले.
राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळालीच पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. त्याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र हा नियम सर्वांसाठी लागू असायला हवा. तसे नसेल तर भाजप किंवा कोणत्याही पक्षात अंतर्गत लोकशाही आहे, असे म्हणता येणार नाही. भाजपमध्ये मोदी, शाह यांचाच शब्द अंतिम असतो, हे एव्हाना सर्वांना कळून चुकले आहे. असे नसते तर 2024 नंतरही मीच पंतप्रधान होणार आहे, असे वयाची त्र्याहत्तरी पार केलेले मोदी म्हणालेच नसते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2024 ला पंतप्रधान झाले तरी वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण बाजूला होणार, किमान असे तरी मोदींनी जाहीर करावे. नितीन गडकरी यांच्यासारखे काही अपवाद वगळले तर केंद्रातील मंत्र्यांची नावेही सामान्य लोकांना माहीत नाहीत. सर्वकाही मोदी-शाह यांच्याभोवतीच फिरत असते. एखाद्या मंत्रालयाशी संबंधित निर्णय घेतला जातो आणि त्याची माहिती संबंधित खात्याच्या मंत्र्यालाही नसते, अशी कुजबुज नेहमीच सुरू असते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या असंघटित कामगारांसाठीच्या रे नगर वसाहतीतील 15,000 घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी 2024 च्या निवडणुकीनंतर आपणच पंतप्रधान होणार, भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमध्ये आणणार, असा दावा केला. त्यामुळे पक्षात (भाजप) इतरांना लागू होणारा नियम मोदी यांना लागू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षीच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दणदणीत यश मिळाले. या यशात महत्वाचा वाटा असलेल्या तिन्ही राज्यांतील शिलेदारांना भाजपने मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवले. कारण काय, तर अर्थातच नवीन चेहऱ्यांना संधी. शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश) यांचे वय 64, वसुंधराराजे (राजस्थान) यांचे 70, तर रमणसिंह (छत्तीसगड) यांचे 71 वर्षे. या तिन्ही दिग्गज नेत्यांना मोदी-शाह यांनी बाजूला बसवले.
मोदी-शाह यांना लोकशाही मान्य असेल का, अशीही शंका अनेकदा येऊन गेली आहे. ज्यांना पक्षांतर्गत लोकशाही रुचत नाही, त्यांना देशातील लोकशाही कशी रुचणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यांना जाब विचारण्याचे धाडस पक्षातील एकाही नेत्यामध्ये नाही. तसे असते तर इतरांना एक नियम आणि मोदी-शाह यांना दुसरा नियम असे झालेच नसते. भाजप हा पक्ष नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच तळागाळापर्यंत रुजला आहे. एकेकाळी लोकसभेच्या दोन जागा असलेला भाजप आता सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमतासह सत्तेत आहे. पक्षाला इथंपर्यंत आणण्यात लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले.
पक्षाला आज जे यश मिळत आहे, ते त्याच्याच बळावर. असे असतानाही एकेकाळी विरोधात लढलेल्या अनेक नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. काहीही करून निवडणुका जिंकायच्या, सत्ता कायम ठेवायची, असा ध्यास घेतलेला भाजप हा गेल्या काही वर्षांत एकचालकानुवर्ती पक्ष झाला आहे. मोदी-शाह यांच्याशिवाय कुणाचेही पक्षांतर्गत बाबींमध्ये काहीही चालत नाही. त्यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत हुकूमशाही आहे, हे कुणीही मान्य करेल.
(Edited by Sachin waghmare)
R...