
पालगड व वडघर येथे स्मारक उभारण्याची कल्पना समाजवादी कार्यकर्त्यांनी मांडली, ज्यासाठी निधी, व्यवस्थापन आणि व्यापक सामाजिक सहभाग मिळविला.
राज्यभरातील विद्यार्थ्यांनी पाच रुपयांच्या देणगीतून मोठा निधी उभारला; अनेक कार्यकर्ते, कलाकार, लेखक, दाते यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
‘आंतरभारती साहित्य संवाद’, ‘अनुवाद सुविधा केंद्र’, विविध पुरस्कार व स्मरणोत्सवांच्या माध्यमातून साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार केला जात आहे.
आपण महाराष्ट्रात जन्मलो, याचा खरोखरच अभिमान, आनंद वाटतो. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. शिक्षण, समाज, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातही अनेक दिग्गजांनी योगदान दिले आहे.
साने गुरुजी तथा पांडुरंग सदाशिव साने हे त्यातील ठळक नाव. ‘श्यामची आई’सारखी एक अजरामर कलाकृती त्यांनी मराठीला दिली. साने गुरुजी हे मराठी मनावर कोरलेलं परिवर्तनवादी शिल्प आहे. अशा या साने गुरुजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत सुरुवातीची काही वर्षे माझा सक्रिय सहभाग असावा, ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
साने गुरुजी तथा पांडुरंग सदाशिव साने हे त्यातील ठळक नाव. ‘श्यामची आई’सारखी एक अजरामर कलाकृती त्यांनी मराठीला दिली. साने गुरुजी हे मराठी मनावर कोरलेलं परिवर्तनवादी शिल्प आहे. अशा या साने गुरुजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत सुरुवातीची काही वर्षे माझा सक्रिय सहभाग असावा, ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त काही ज्येष्ठ मंडळींची बैठक झाली. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रकाश मोहाडीकर, मृणालताई गोरे, तुलसी बोडा, मधुकरराव चौधरी आदी मंडळी होती. गजानन खातू यांनाही बोलावण्यात आले होते. अर्थात यात सुधाताई बोडा यांचा पुढाकार होता. समाजवादी चळवळीत त्यांचा पुढाकार होताच; पण त्या गुरुजींच्या पुतणी म्हणजे त्यांच्या भावाची मुलगी होत्या. ‘सुधेस पत्र’ही साने गुरुजींनी त्यांनाच उद्देशून लिहिले आहे.
गुरुजींचे असे विशेष स्मारक नाही. त्यामुळे कोकणातील पालगड येथे गुरुजींचे घर आहे. ते ताब्यात घेऊन तिथे त्यांचे स्मारक करावे, असा सूर त्यात निघाला. ‘केवळ पुतळा किंवा इमारत म्हणजे स्मारक नव्हे, तर गुरुजींचे भव्य व राष्ट्रीय स्वरूपात असे स्मारक उभे राहिले पाहिजे,’ अशी भूमिका गजानन खातू यांनी मांडली आणि पाच कोटी रुपयांचा स्मारक आराखडा मांडला. ही गोष्ट सर्वांनाच त्यावेळी अशक्य वाटत होती. मात्र, गजानन खातू यांचा ‘मॅनेजमेंट’चा अनुभव, कल्पकता, नैतिकता आणि चळवळीवर असलेली निष्ठा यांचा प्रत्यय सगळ्यांनाच होता.
साने गुरुजींच्या बोर्डी येथील शाळेतील विद्यार्थी असलेल्या अमोल पालेकर यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले आणि निभावलेदेखील. या कामासाठी त्यांनी खूप वेळ दिला. स्मारकाच्या जागेच्या पाहणीसाठी फिरले आणि इतर सर्व प्रकारे त्यांनी मदत केली. वडघर येथील ३६ एकर जागेची खरेदी करताना, चेकद्वारे व्यवहार मान्य असणाऱ्या व्यक्तीकडूनच जमीन खरेदी करायची, हे अगोदरच ठरले होते. अमोल पालेकर यांच्यानंतर मला अध्यक्ष करण्यात आले. दर आठवड्याला दादरच्या कार्यालयात आमची बैठक व्हायची. या चर्चेत खातूभाई सूचना करायचे, त्यांची सूचना मांडण्याची पद्धत अफलातून होती. ते सर्वांना विश्वासात घ्यायचे. म्हणून वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे ते ‘कुलगुरू’ आहेत, असे नेहमीच म्हणतो.
एकूण संस्थेच्या कारभारातही त्यांच्या या दूरदृष्टीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. विशेषतः संस्थेचे संस्थान होऊ नये तसे तरुणांना वाव मिळावा यासाठी विश्वस्ताने पासष्टी ओलांडल्यानंतर दूर व्हावे आणि अध्यक्षपदाची मुदत दहा वर्षे असावी, हे सर्वांच्या गळी उतरवले. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी हक्काची जागा उभी राहिली आहे. परिसंवाद, शिबिरे निसर्गाच्या सान्निध्यात घडावीत, हा हेतू होता. विद्यार्थ्यांच्या शिबिरासाठी तंबू उभारले जायचे व विद्यार्थिनींची सोय वसतिगृहात व्हायची; पण विद्यार्थिनींनी तंबूत राहण्याचा आग्रह धरला. ३६ एकरांच्या परिसरापैकी सात एकरांवर बांधकाम आहे. बाकीच्या टेकड्या, जंगल, झरे आणि श्रमछावणीतून उभी राहिलेली शेती आहे.
स्मारक उभे करताना निधीची आवश्यकता असतेच. मृणालताई, सुधाताई बोडा पाठीशी होत्याच. सुधाताईंनी गुजरातमधूनही चांगला निधी जमवून दिला. शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे मोठे योगदान आहे. साने गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते बघता यात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी पाच रुपयांची मदत केली आणि यातूनच २५ लाख रुपयांचा निधी उभा राहिला. पाच रुपयांची मदत देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव असलेल्या तीन मोठ्या नोंदवह्या तयार करण्यात आल्या. त्यांचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते.
पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा ढाचा आणि स्वरूप गुरुजींच्या विचारांशी सुसंगत असावे, यासाठी देश पातळीवर एक स्पर्धा नीरा आडारकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून घेण्यात आली होती. त्यातून निवडलेल्या दहा जणांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. नाशिकचे नितीन कुटे या रचनाकाराची निवड करण्यात आली. या बांधकामातील कॉरीडॉर (व्हरांडा) लक्षणीय आहे.
आंतरभारती’ हे साने गुरुजींचे स्वप्न होते. भारतीय भाषा या भाषाभगिनी आहेत. कोणत्याही भाषेचा मत्सर, द्वेष न करता किंवा ती संपविण्याचा प्रयत्न न करता त्या सुसंवादी राहिल्या पाहिजेत ही त्यांची भूमिका होती. म्हणून राज्य पातळीवर स्मारकाच्या वतीने ‘आंतरभारती साहित्य संवाद’ या नावाने साहित्य संमेलने भरविली. कमलेश्वर, इंदिरा गोस्वामी, जोसेफ मकवाना यांसारख्या वेगवेगळ्या भाषांतील मान्यवर लेखकांनी तिथे हजेरी लावली आहे. त्याचाच भाग म्हणून ‘अनुवाद सुविधा केंद्र’ सुरू केले. रामदास भटकळ यांचा यात मोठा वाटा आहे. विंदा करंदीकरांनी ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाच्या रकमेतील दोन लाख रुपये या कामासाठी स्मारकाला देणगी दिली.
यातून विंदाच्या इच्छेनुसार दरवर्षी उत्कृष्ट भाषांतरासाठी ‘दर्पण’कार आणि विविध ज्ञानशाखांतील तज्ज्ञ बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतात. गंगाधर गाडगीळ यांनीदेखील या कामासाठी एक लाख रुपये दिले. पुष्पा भावे, प्र. ना. परांजपे यांच्यासारखे दिग्गज यात कार्यरत होते. ‘मायमावशी’ हे उचित नाव असलेले षण्मासिक चालविले गेले, यात भारतीय भाषांतील उत्कृष्ट अशा कलाकृती अनुवादित करण्यात आल्या. गुरुजींच्या कोकणातील पालगड येथील मूळ घरासाठी सरकारने मदत केली आणि ते घर स्मारकाच्या ताब्यात दिले आहे. स्मारकाच्या वतीने साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाची पंचाहत्तरी नाशिकच्या कारागृहात साजरी केली.
सुधीर देसाई, संजीव साने, सुरेश कराळे, उमेश कदम, युवराज मोहिते, जवाहर नागोरी, युवराज सावंत, नीरजा, सुनील कर्णिक, प्रमोद निगुडकर, उषा मेहता, रत्नाकर मतकरी, दत्ता इस्वलकर, नीरा आडारकर, नंदिनी आत्मसिद्ध, संजीवनी खेर, अलका गाडगीळ; तसेच स्मारकाच्या जागी काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते अशा किती तरी नावांची गुंफण या राष्ट्रीय स्मारकाच्या भोवती आहे.
Q1. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची सुरुवात कशी झाली?
➡️ गुरुजींच्या स्मृतीसाठी पालगड व वडघर येथे स्मारक उभारण्याची योजना ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी केली.
Q2. स्मारकासाठी निधी कसा उभारला गेला?
➡️ विद्यार्थी, शिक्षक संघटना, दाते आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांच्या मदतीतून कोट्यवधींचा निधी उभा राहिला.
Q3. स्मारकात कोणते उपक्रम राबवले जातात?
➡️ साहित्य संवाद, शिबिरे, अनुवाद केंद्र, पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
Q4. ‘आंतरभारती साहित्य संवाद’ म्हणजे काय?
➡️ भारतीय भाषांमधील संवाद व साहित्यिक एकतेसाठी स्मारकाच्या वतीने आयोजित संमेलने.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.