
Sangli News : मागील तीन ते चार वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय आणि शासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या नव्या आदेशानुसार महापालिकांतील प्रभाग रचना चार सदस्यीय असणार आहे. महापालिका पातळीवर या या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पण यासाठी 2022 चीच सदस्य संख्या कायम ठेवण्याचे आदेश सांगली महापालिकेसाठी देण्यात आले आहेत. यामुळे येथे जैसे थे ची स्थिती असणार आहे. तर तासगाव, पलूस नगर पालिकेत चित्र वेगळे असणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच पूर्वी 72 सदस्यांची संख्या होती. ती वाढणार नाही. तर प्रभागांची संख्याही 20 च राहणार आहे. मतदारसंख्येत मात्र वाढ झालेली आहे. तर मतदार याद्या विधानसभेच्याच गृहीत धरल्या जातील.
इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण व प्रभाग रचनेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जवळपास पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी या निवडणुका तत्काळ घेण्याचे आदेश देताना ही प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे व त्यासंदर्भातील अधिसूचना एक महिन्यात काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने मंगळवारी ‘ड’ वर्ग महापालिकांतील प्रभाग रचनेचे आदेश काढले. यात सांगली, कोल्हापूर, इचलकरंजीसह राज्यातील 19 महापालिकांचा समावेश आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीत वाढलेल्या मतदारसंख्येनुसार सुधारीत मतदार यादी तयार होईल. तसेच आरक्षण व प्रभागरचनेच्या नव्या आदेशानुसार प्रभागरचना काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी देखील आता सुरू झाली असून येथे व्दिसदस्यीय प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे. तसेच आदेशही नगर विकास विभागाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता येथे 24 सदस्य संख्या होईल. तासगाव पालिकेच्या नगरसेवकांची मुदत 2 जानेवारी 2021 ला संपली होती. पण कोरोना आणि ओ.बी.सी. आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्याने नवी प्रभाग रचना आणि आरक्षणे प्रक्रिया रखडली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने पुन्हा हालचालींना वेग आला आहे.
नगर विकास विभागाने व्दिसदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याप्रमाणे आता मुख्याधिकाऱ्यांकडून प्रभाग रचना आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर तो निवडणूक आयोगाला सादर करण्यात येईल. 'क' वर्ग नगरपालिकांसाठी कमीत कमी सदस्य संख्या 20 व जास्तीतजास्त सदस्य संख्या 25 इतकी निश्चित करण्यात आली आहे. 25 हजार लोकसंख्येपुढे प्रत्येकी 3 हजार लोकसंख्येसाठी एक सदस्य वाढणार आहे. लोकसंख्या कितीही असली तरी सदस्य संख्या 24 पेक्षा वाढणार नाही. तासगाव शहराची लोकसंख्या 37 हजार 945 असल्याने सध्या 21 असलेली सदस्य संख्या वाढून 24 होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षापासून प्रशासक असणाऱ्या पलूस नगरपरिषदेत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्या प्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात येणार आहे. नव्या आदेशाप्रमाणे येथे दोन प्रभागांची वाढ होऊ शकते. यामुळे सदस्य संख्याही वाढणार आहे. पलूस नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर येथे दुसऱ्यांदा निवडणूक होणार आहे. येथे आठ प्रभाग असून सदस्यांची संख्या आठरा आणि दोन स्विकृत असे वीस सदस्य आहेत. पण आता यात वाढ होणार असून 2022 च्या लोकसंख्येच्या आंदाजावर प्रभाग रचना आणि सदस्य संख्या वाढणार आहे.
सध्याचा विचार केल्यास येथे काँग्रेसची सत्ता आहे. येथे मधल्या काळात मोठ्या राजकीय उलथा पालथी झाल्या आहेत. तसेच राजकीय समीकरणंही बदलली आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, मतभेद, पक्ष प्रवेश, गट-तटाच्या राजकारणामुळे येथील राजकारण ढवळून निघालेलं आहे. तर सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस आतापासूनच रणनीती आखत आहे. भाजपसह अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आता राजकीय आखाड्यांची बांधणी करताना दिसत आहेत. तर आगामी काळात दोन प्रभाग आणि 4 सदस्य वाढणार असल्याने इच्छुकांडून मोर्चे बांधणीस वेग आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.