Annasaheb Dange: अण्णा डांगेंना ‘घरट्या’साठी बदलावे लागले ‘अंगण’

Sangli politics, Annasaheb Dange joins BJP: प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे माझी भाजपमध्ये छळवणूक झाली आणि पक्ष सोडावा लागला, अशी खंत माजी मंत्री अण्णा डांगे यांनी भाजप प्रवेश सोहळ्यात व्यक्त केली.
Sangli politics, Annasaheb Dange joins BJP
Sangli politics, Annasaheb Dange joins BJPSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात

  1. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी दोन दशकांनंतर पुन्हा भाजपमध्ये पुनरागमन केले असून, यामुळे सांगली जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळाले आहे.

  2. डांगे यांचा प्रवेश हा त्यांच्या पुत्र ॲड. चिमण डांगे यांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे आणि भाजपला धनगर समाजाचा अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

  3. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून सांगली जिल्ह्यात सतत सुरू असलेली नेत्यांची पलायन लाट या प्रवेशामुळे आणखी वेग घेणार असल्याचे संकेत आहेत.

ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे प्रदीर्घ कालखंडानंतर आपल्या स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतले आहेत. भाजपमध्ये अन्य पक्षांतील ‘इनकमिंग’ सुरूच होते, मात्र याच पक्षातून जे काही दिग्गज बाहेर गेले, त्यापैकी थेट संघाचे वलय लाभलेले डांगे यांना पुन्हा पक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘मूळ भाजप नेतेही परतू लागलेत,’ असाच मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे दिग्गज नेते जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातही आम्ही ‘करेक्ट कार्यक्रम’ करू शकतो, असे संकेत भाजपने दिले आहेत.

अण्णासाहेब डांगे हे मूळचे संघ परिवारातले अस्सल नेते. २००३ मध्ये त्यांनी भाजपचा त्याग करून राजकीय संन्यास घेतला. पुढे, संन्यास सोडून ते राष्ट्रवादीत मोठ्या दिमाखात दाखल झाले. राष्ट्रवादी व काँग्रेसमधून भाजपमध्ये भरती होत असताना आता पक्ष सोडून गेलेले मूळ भाजपवाले देखील पक्षात परतू लागले आहेत. त्या इतरांच्या गर्दीपेक्षा अण्णासाहेब डांगे सर्वार्थाने वेगळे ठरतात.खरेतर भाजपने डांगे यांना १९९५च्या युतीच्या पहिल्या सत्तेत ग्रामविकासमंत्री करून मोठी संधी दिली.

भाजपची सत्ता गेल्यानंतर डांगे यांनी २००३ मध्ये पक्षाला ‘राम-राम’ करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तो काळ भाजपमध्ये ‘मुंडे-महाजन पर्व’ म्हणूनच ओळखला जायचा. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने अण्णांनी नाराजी व्यक्त करत भाजप सोडला होता. मुंडे, महाजन यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. हा त्यांचा थोडक्यात राजकीय इतिहास.

मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी डांगे यांनी स्वतःच याबाबत मनातील खदखद जाहीर आणि परखडपणे बोलून दाखवली. डांगे स्वभावाने तसे फटकळ असल्याचे भाजपमधील सर्वांना ठाऊक आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता म्हणून आपणास संधी द्यावी, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. पक्षाने गडकरींना संधी दिली. तिथे डांगे नाराज झाले. त्याबद्दल त्यांच्या मनात असलेला राग आज वयाच्या नव्वदीतदेखील त्यांनी कायम ठेवला आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमोद महाजन यांचे नाव पुढे येत होते आणि महाजन महाराष्ट्रात मुंडे यांनाच मुख्यमंत्री करतील, असा त्यावेळी अंदाज बांधला जात होता. हे स्वतःच अण्णांनीच सांगितले. संघ आणि पक्षासाठी आयुष्य वेचून देखील आपल्याला दूर ठेवले जाते, अशी त्यांच्या मनात साठलेली खदखद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनेच थेट माध्यमांसमोरच व्यक्त झाली. ‘अण्णांमुळे पुन्हा पक्षाला बळ मिळेल,’ असे फडणवीस यांनी कौतुक करत आणि मुंडे यांचेही अण्णांवर किती प्रेम होते, ते सांगून हा विषय तिथेच थांबविला. भाजपने त्यांना मोठे केले आणि भाजपसाठी अण्णांनीही तळागाळापर्यंत काम केले, हे वास्तव आहे.

कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अण्णांचा संघर्ष

सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दिवंगत शिवाजीराव देशमुख, पतंगराव कदम, प्रकाशबापू पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या काळात त्यांनी येथील प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध लढाई केली. लोकसभेची निवडणूक जोरदारपणे लढली, हरले. मात्र पक्षनेतृत्वाने त्यांना सातत्याने पाठबळ दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी युती सरकारच्या काळात केलेलं काम आज लोकांच्या आठवणीत आहे. त्यांचे राष्ट्रवादीत जाणे, हा भाजपसाठी धक्का होताच. मात्र आता डांगे यांनी वयाच्या नव्वदीत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांना म्हणजे भाजपच्या शीर्ष नेतृत्वासह अन्य पक्षांनाही अचंबित करणारा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी अण्णासाहेब डांगे यांनी एका गाजलेल्या मराठी गीताचा उल्लेख करत ‘शेवटचे घरटे बांधतो तुझ्या अंगणात...’ असे शरद पवार यांना सांगत प्रवेश केला होता. मात्र अण्णांना पुन्हा ‘घरट्या’साठी ‘अंगण’ बदलावं लागलं आहे, हे एक राजकीय वास्तव आहे. दुनिया गोल आहे, त्याचा हा आणखी एक अनुभव.

Sangli politics, Annasaheb Dange joins BJP
Mahadevi Elephant Case: 'महादेवी'निमित्त पेटले राजकारणाचे रण! नेत्यांचे छुपे धोरण

मुलाच्या भवितव्यासाठीची तजवीज

अण्णांचे भाजपमधील पुनरागमन हे सांगलीमधील त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासासाठीच सोयीचे ठरणारे आहे. आयुष्यभर काँग्रेसबरोबर लढाई लढणारे डांगे यांचे घराणे आहे. भाजपने त्यांना येथे बळ देताना शैक्षणिक संस्था, सूतगिरणी या सर्व गोष्टींचे पाठबळ दिले. राजकीय अडचणी येत असतात, भाजपच्या नेतृत्वाशी त्यांचे बिनसले. अशा वेळी एका टप्प्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून धक्का दिला होता.

अर्थात, पुन्हा २०१४ भाजपची सत्ता आल्यानंतरही ते राष्ट्रवादीतच राहिले होते. मात्र मधला काही काळ सोडला तर आता राज्यात केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये राहण्यात काही अर्थ राहिला नाही, म्हणून पुन्हा भाजप, असाच अर्थ यातून काढला जाईल. जयंतरावांचे प्रदेशाध्यक्षपद जाणे आणि त्यानंतर त्याच दिवशी डांगे यांनी पक्ष सोडणे, या दोन्ही गोष्टींचा योगायोग समजायचा की यातून काही आणखी अर्थ काढायचा, हा देखील संभ्रम यातून निर्माण झाला आहे. कारण जयंतरावांनी इस्लामपूरच्या राजकारणात चिमण डांगेंना उपनगराध्यक्ष करून संधी दिली होती. गेली काही वर्षे जयंतरावांच्या राजकारणात डांगे त्यांच्यासमवेत राहिले आहेत. आपल्या पुढील पिढीचे हित कशात आहे, हे बापच चांगले ओळखत असतो. एका अर्थाने डांगे यांनी सोडलेल्या भाजपच्या ‘अंगणा’त आपले ‘घरटे’ पुन्हा एकदा नेले आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठे आउटगोईंग

महिनाभरापूर्वी सांगलीतील जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. तो घडविण्यात ‘जनसुराज्य’चे नेते समित कदम यांनी पुढाकार घेतला. आता डांगे यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटीवेळी सुद्धा समित कदम यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांचाही पुढाकार दिसून आला. तत्पूर्वी राष्ट्रवादीचेच विट्याचे नेते वैभव पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे, महापौर म्हणून राहिलेले आमदार इद्रिस नायकवडी की, ज्यांचे वडील जनाब इलियास नायकवडी हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांचे घराणेही आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहे.

अशा पद्धतीने दस्तूरखुद्द जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच त्या पक्षातूनच या जिल्ह्यामध्येच ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र दिसून येते. अर्थात, जयंतरावांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा माध्यमांतून सुरू असतात. त्यावर, ते रोज खुलासे करत असतात. परवा, माध्यमांशी बोलताना स्वतः जयंतराव असे उपहासाने म्हणाले, ‘माध्यमेच माझी खूप प्रसिद्धी करत असतात. त्यामुळे माझ्यासारख्या विरोधी पक्षातील आमदाराचे महत्त्व तुम्ही वाढवता, त्याबद्दल तुमचे आभारच मानले पाहिजेत.’ यातील विनोदाचा भाग सोडला तरी जयंतराव आणि भाजप हे ‘कनेक्शन’ खूप आधीचे आहे.

अशातच त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर जाऊ लागले आहेत, ही गोष्ट राष्ट्रवादीसाठी निश्चितच चांगली नाही. एक काळ सांगली हा संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सर्वांत मोठा गड होता. या जिल्ह्यातील सर्व दिग्गज हे सुरुवातीला राष्ट्रवादीत गेल्याने या पक्षाची राज्यातील ताकद वाढण्यास मदत झाली होती, हे वास्तव आहे.

आता ‘राष्ट्रवादी’ रिकामा होतानाही याच पक्षाला सांगलीतून मोठे भगदाड पडू लागले आहे. याचे शल्य अर्थातच सात वर्षे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या जयंतरावांना वाटणार आहे. या पक्षाची धुरा ज्या शशिकांत शिंदे यांच्यावर आली आहे, त्यांच्यासमोर त्यांच्या पक्षातील आऊटगोईंग थांबवण्याचे मोठं आव्हान असेल. डांगे यांच्या प्रवेशानंतर पत्रकारांनी, ‘पुढचा प्रवेश कोणाचा,’ असे विचारताच फडणवीस यांनी, ‘तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही,’ असे सांगून हा चेंडू सध्यातरी टोलवून लावला आहे.

Sangli politics, Annasaheb Dange joins BJP
Nagpur Congress Protest: ‘मतदान चोर, खुर्ची सोड'; काँग्रेसच्या निशाण्यावर सत्ताधारी अन् निवडणूक आयोग

या जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात भाजपसमवेत आहे. गोपीचंद पडळकर यांच्यामुळे तो आणखी बळकट होत असतानाच डांगे यांच्या प्रवेशामुळे हा समाज आता मोठ्या प्रमाणात भाजपसमवेतच गेल्याचेही संकेत राज्यात जातील. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी मात्र घर रिकामे होताना दिसते आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिग्गज नेते जाऊ नयेत, याची पूर्ण काळजी भाजप घेताना दिसतो आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून येणाऱ्या सर्वांसाठी भाजपने आपली दारे खुली केल्याचे दिसते आहे.

टँकरमुक्त महाराष्ट्र, महापालिकेची निर्मिती

तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळात सांगली जिल्ह्यात सहा तालुके दुष्काळी होते. मोठ्या प्रमाणात टँकर सुरू होते.

राज्यातही अनेक दुष्काळी तालुक्यांत टँकर माफियांचा सुळसुळाट झाला होता. त्या काळात टँकरमुक्त महाराष्ट्र हे मिशन डांगे यांनी चालवलं होतं. तसेच सांगलीचे पालकमंत्री असतानाच त्यांनी सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांची महापालिका केली. त्यांच्या या धाडसी निर्णयाने प्रस्थापित नेतृत्वाला धक्का बसला होता.

महापालिका झाल्यानंतर पुढे महाआघाडीच्या रुपाने का होईना, काँग्रेसची महापालिकेवरील सत्ता सर्व पक्षांनी मिळून काढून घेतली. त्यानंतर महापालिकेत स्वबळावर सत्ता घेण्याइतपत भाजपची ताकद वाढली, यामध्ये आमदार संभाजी पवार यांचा सिंहाचा वाटा आहे, तसाच डांगे यांचाही भाजप रुजवण्यासाठी होता. आता पुन्हा ते भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल.

चिमण... सुसंस्कृत युवा धनगर नेतृत्व?

ॲड. चिमण डांगे हे अण्णा डांगे यांचे चिरंजीव आहेत. भाजपकडे जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने एक धनगर युवा नेते आहेत, मात्र पडळकर यांची वक्तव्ये, त्यांची राजकीय स्टाईल सतत वादात सापडत आली आहे. अशावेळी ॲड. चिमण डांगे यांच्या रुपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसला आहे. त्यांना भाजप कसे बळ देते, याकडे सर्वांचे लक्ष असेल

FAQs

प्रश्न 1: अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये का परतले?
उत्तर: राजकीय भविष्य आणि पुत्र चिमण डांगे यांच्या संधीसाठी त्यांनी भाजपमध्ये पुनरागमन केले.

प्रश्न 2: डांगे यांचा राजकीय इतिहास काय आहे?
उत्तर: ते मूळ भाजपचे नेते असून, 2003 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.

प्रश्न 3: या प्रवेशाचा सांगलीच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
उत्तर: भाजपला धनगर समाजात अधिक बळ मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गड कमजोर होईल.

प्रश्न 4: भाजपला डांगे यांचा काय फायदा होऊ शकतो?
उत्तर: सांगली जिल्ह्यात भाजपचा पाया मजबूत होईल आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांत त्यांना फायदा मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com