
कीर्तनात महाराजांकडून राजकीय संदर्भ लागणारे वक्तव्य झाल्याच्या आरोपावरून घुलेवाडी (ता. संगमनेर) येथे वाद झाला. संग्राम भंडारे महाराज यांच्या अंगावर धावून गेल्याच्या आरोपावरून कॉँग्रेसचे नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांवर संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
थोरातांनी ही घटना खूप मनावर लागून न घेता शांततेचे आवाहन केले. पण या प्रकरणातही राजकारण घुसलं. दुसऱ्या दिवशी थोरातांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला अन् तेथेच वादाची ठिणगी पडली. थोरातांना राज्यभरातून सहानुभूती मिळाली, तर भंडारे महाराज कोण? याची विचारणा होऊ लागली. नंतर मोर्चे, आंदोलने अन् बरंच काही घडलं...!
महाराष्ट्र विधानसभेतील राजकारणाची धग अजून शांत झालेली नाही. संगमनेर विधानसभा मतदारसंघात, तर ती अधिक धुमसू पाहत आहे. त्याचे प्रत्यंतर विविध घटनांमधून जाणवते. शांत असलेले संगमनेर अशांत झाल्याचा आरोप दोन्ही नेत्यांकडून होऊ लागला. ‘झालं गेलं गंगेत घोडं न्हालं’ असं म्हणून दोन्ही बाजूंची मंडळी शांत होऊ पाहत असतानाच नवीन वादाला संग्राम भंडारे महाराजांच्या कीर्तनातून फोडणी बसली.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी नावाजलेलं गाव. तेथील अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी (ता. १६) भंडारे महाराजाचं कीर्तन होतं. महाराजांनी अभंगावर विवेचन करीत असताना काही ऐतिहासिक दाखले दिले. त्याचे संदर्भ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीशी लावून थोरातांचे कार्यकर्ते इरेला पेटले. कीर्तनात मध्येच उठून गोंधळ सुरू झाला. कीर्तन बंद पाडले. शिवीगाळ केली, अंगावर धावून आले अशी कारणे देऊन सप्ताहाच्या यजमानाने संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात फिर्याद दिली.
आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल झाला. हे कार्यकर्ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे होते, असा आरोप होऊन शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच सोशल मीडिया वॉर सुरू झाले. त्याचे रुपांतर पुढील दोन-तीन दिवसांतच मोर्चे, आंदोलनात होऊ लागले.
विधानसभा निवडणुकीत थोरातांचा पराभव झाला होता. गेल्या तीन तपांची सत्ता गेली. कालपरत्वे काही गोष्टी घडणारच असतात. सत्ता ही कायमच एका घरात राहत नाही. असे असताना थोरातांच्या कार्यकर्त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. त्याचे प्रत्यंतर विविध कार्यक्रमांमधून येऊ लागले. त्याचाच भाग म्हणून या घटनेकडे पाहता येईल. हे प्रकरण येथेच थांबले नाही. सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (ता. १८) ‘रास्ता-रोको’चा इशारा देण्यात आला. त्याला आमदार खताळ यांनी पाठिंबा दर्शविला.
या घटनेत थोरात प्रत्यक्ष पुढे नव्हते. नंतर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सकल हिंदू समाजाने नाशिक-पुणे रस्त्यावर संगमनेर बसस्थानकाजवळ आंदोलन केले. घोषणाबाजी झाली. एकूणच घटनांमागून घटना घडू लागल्या. आंदोलनाने वातावरण अधिकच चिघळू लागले. हे सर्व सुरू असतानाच भंडारे महाराजांचा सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये ‘... तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’, असे थेट थोरातांना धमकीवजा वक्तव्य महाराजांनी केले. तेथून पुढे हा वाद अधिकच चिघळला.
महाराष्ट्र कॉँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. थोरातांना समर्थन दिले. महाराजांनी कीर्तनातून केवळ प्रबोधन करावे, राजकारण करू नये, असे वक्तव्य विविध नेत्यांकडून होऊ लागले. महाराजांनी दिलेल्या धमकीला थोरातांनीही जोरदार उत्तर दिले. ‘ते बलिदान आम्ही स्वीकारू,’ असे त्यांनी म्हटले अन् पुन्हा कार्यकर्ते चवताळले. वातावरण अधिक चिघळू नये म्हणून शांततेचे आवाहन करण्यात आले.
धमकी दिल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये गुरुवारी (ता. २१) सदभावना शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय, युवक व गणेश मंडळे, संत ज्ञानोबा-तुकोबा वारकरी मंडळ, आध्यात्मिक मंच, वारकरी सेवा संघ, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी, साहित्य मंच, विविध महिला व विद्यार्थी संघटना, पुरोगामी संघटना आदींनी थोरातांविषयी सहानुभूती दाखवत मोर्चात सहभाग नोंदविला. सामाजिक स्तरावर, शांतता मोर्चा काढला गेला, थोरात यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यावेळीचे व्हिडिओ फुटेज पुढे आणले.
कीर्तनादरम्यान गोंधळाचा संदर्भ, तसेच भंडारे यांची कार फोडण्याचे आरोप अशा बऱ्याच गोष्टींचा ऊहापोह झाला. या झाल्या आतापर्यंतच्या घडामोडी. अजून या राजकारणात जिल्ह्यातील इतर नेते पडले नाहीत. कोणीही जाहीरपणे पाठिंबा किंवा विरोधही केला नाही. याचा अर्थ हे प्रकरण तेथेच थांबावं, असाच सर्वांचा प्रयत्न आहे. तेही साहजिकच आहे. जिल्ह्यातील राजकारणाला मोठा इतिहास आहे. राजकीय विरोध म्हणून खुल्या व्यासपीठावर एकमेकांवर आगपाखड करतील; परंतु राजकारणाबाहेरील आरोप-प्रत्यारोपांच्या वेळी सावध भूमिका घेतात. एकमेकांचे राजकीय वैर असले, तरी अंतर्गत सोयरिकी करतील. कौटुंबिक जीवनात एकमेकांचे व्याही होतील. कौटुंबिक बाबतीतही एकमेकांना सहकार्य करतात. एवढेच नव्हे, तर एकाच घरातील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण केलेली उदाहरणे आहेत. दिवसा भांडणारे नेते संध्याकाळी एका ताटात जेवण करतानाचा अनुभव जिल्ह्याने घेतला आहे. त्यामुळे थोरात-भंडारे वाद येथेच थांबावा, अशीच इच्छा इतर नेत्यांचीही असल्याचे दिसून येते.
हल्ली अनेक महाराजांकडून राजकीय वक्तव्य केले जातात. त्यातून विनाकारण वाद निर्माण होतात. अनेक संतांनी वारकरी पताका हाती घेऊन संतांचे विचार सकलांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले. विठ्ठलभक्ती, आई-वडिलांप्रती प्रेम, समाजातील दुर्बलांना मदत, समाजिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न केले. समाजासाठी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून विठ्ठल भक्तीत लीन झालेले अनेक वारकरी सांप्रदायाचे पाइक पाहतो. हाच कित्ता नवोदित महाराजांनी गिरवून संत साहित्याचा सखोल अभ्यास करायला हवा. कीर्तनातून एखाद्या अभंगावर सखोल व शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण व्हायला हवे, अशीच अपेक्षा वारकरी संप्रदाय व सर्वसामान्यांकडून आहे. त्यामुळे महाराजांनी राजकारणात न पडता पारमार्थिक भाष्य करावे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया तसेच वारकरी संप्रदायातून व्यक्त होत आहेत.
थोरात-भंडारे वादाचे पडसाद आगामी उत्सवांवर पडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. दरवर्षी नियोजनाप्रमाणे संगमनेरमध्ये गुरुवारी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शांतता समितीची बैठक घेतली. त्या बैठकीतही काही राजकीय नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दरडावून ‘आता कोणाची दादागिरी खपून घेतली जाणार नाही,’ असा सज्जड दम दिला. त्यामुळे आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात काही गडबड होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्याचे नियोजन पोलिस प्रशासनाकडून होत आहे. गणेशोत्सव काळात स्टंटबाजी करणाऱ्यांवर थेट कारवाया करण्याच्या सूचना दिल्या असल्याने पोलिस प्रशासन सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे.
सप्ताह आयोजित करताना मोठी रक्कम खर्ची पडते. ग्रामस्थांकडून वर्गणी, देवस्थानाची गंगाजळी, भाविकांकडून देणग्या स्वीकारून कार्यक्रम आयोजित केले जातात. कीर्तनकारांना किमान ११ हजारांपासून एक लाखांपर्यंत मानधन द्यावे लागते. हरिपाठासाठी एखाद्या वारकरी संस्थेची टीम लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो.
वादक, गायक आदींना रोज किमान एक हजार रुपये द्यावे लागतात. यासाठी आयोजकही स्वतः मोठ्या प्रमाणात खर्च करतात. कीर्तनकारांना आणताना यापूर्वी ऐकलेलेच कीर्तन आणण्यात बहुतेकांचा कल असतो. त्यामुळे वादग्रस्त विधाने करणाऱ्या महाराजांना आयोजक बोलावतील का? आपल्या भागातील राजकीय व्यक्ती नाराज होणार नाही ना? आपल्या सप्ताहामुळे राजकारण तापेल का? विनाकारण पोलिस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळ येणार तर नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत
(Edited by: Mangesh Mahale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.