
Mulshi Vs Bhor : भोर-मुळशी-राजगड मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून स्वतः तीन वेळा ते आमदार झाले आहेत तर त्यांचे वडील हे सहा वेळा काँग्रेसचे आमदार, मंत्री होते. थोपटे घराणे हे काँग्रसचे एकनिष्ठ म्हणून परिचित होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने संग्राम थोपटे व्यथित झाले होते. राजकीय भविष्याचा विचार करत काँग्रेसचा राजीनामा देत ते भाजपमध्ये दाखल झाले
संग्राम थोपटेंचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला होता. मांडेकरांच्या विजयामागे मुळशीतील मताधिक्क (लीड) कारणीभूत ठरले त्याचे कौतुक 'मुळशी पॅटर्न' म्हणून करण्यात आले. एकट्या मुळशी तालुक्यात मांडेकरांना 53 हजार 94 हजारांचे लीड मिळाले होते.
संग्राम थोपटेंना सलग तीन वेळा आमदार होऊनही मुळशी तालुक्यात काँग्रेसला मजबूत करता आले नाही. भोरमध्ये थोपटेंमुळे काँग्रेसची ताकद होती. मात्र, मुळशीमध्ये काँग्रेसचा चेहरा व्हावा, असे नेताच पक्षाकडे नव्हते. मुळशीच्या ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद आहे. विशेषता धरणग्रस्त भागात ठाकरेंना मानणारा शिवसैनिक येथे मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तो ठाकरेंसोबत राहिला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसैनिकांनी मांडेकरांना मदत केल्याची चर्चा आहे.
आता थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश करत शिवसैनिकांना आपल्या बाजुने वळवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. तर, पुणे शहराला लागून असलेला हिंजवडी, पिरंगुट या भागात देखील राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपचा मतदार निर्माण होतो आहे. त्यामुळे हा मतदारदेखील थोपटेंकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोपटेंचा भाजप प्रवेश हा 'मुळशी पॅटर्न'ला जड जाणार का? याचीच चर्चा आहे.
मागील काही वर्षात मुळशी-भोर मतदारसंघात काँग्रेसला कोणी टक्कर देऊ शकेल अशी ताकद शिवसेनेमध्ये होती. संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी निवडणूक लढली होती. कोंडे यांना 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 9 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुळशी मतदारसंघात शरद ढमाले हे शिवसेनेचे माजी आमदार देखील राहिलेले आहे. त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद या मतदारसंघात आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार आणि संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाने शिवसेनेला फारशी संधी मिळत नाही. शिवसेनेतील फूटीमुळे देखील शिवसैनिकांची ताकद कमी झाली आहे.
संग्राम थोपटे 2029 च्या विधानसभा निवडणूक लढायची याच तयारीने भाजपमध्ये गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुतीत आहेत. मात्र, 2029 च्या निवडणुकीत ही युती कायम असेल हे ठामपणे सांगता येत नाही. त्यातच किरण दगडे यांनी भाजपमधून बंडखोरी करत 25 हजार मतं मिळवत आपली ताकद दाखवून दिली. तर,अपक्ष लढत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले कुलदीप कोंडे हे देखील पुन्हा आपली ताकद अजमवणार. दगडे आणि कोंडेच्या उमेदवारीचा फटका थोपटेंना मागील विधानसभा निवडणुकीत बसला होता. त्यामुळे भविष्यात देखील आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी थोपटे विरुद्ध सगळे असाच सामना असणार आहे.
1980 आणि 2004 हे दोन अपवाद वगळता काँग्रेसचे मुळशी मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. तर भोर-मुळशी मतदारसंघ एकत्र येण्याआधी भोर-वेल्हे मतदारसंघावर आनंदराव थोपटे यांच्यामुळे त्यानंतर संग्राम थोपटे यांच्यामुळे भोरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, मुळशी आणि भोर या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व संपल्यात जमा आहे. थोपटेंच्यानंतर मुळशी-भोरसाठी काँग्रेसकडे चेहराच नाही. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा शुन्यातून सुरुवात करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.