Satara ZP Result Analysis : लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यात उधळलेला वारू जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यशस्वी झाली आहे, तर आक्रमक प्रचार आणि पक्षप्रवेशातून सत्ता मिळविण्याची भाजपची स्ट्रॅटेजी यावेळेस फोल ठरली आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाहीत. कधी नव्हे ते शिवसेनेला महत्त्व आले आहे.
या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून झालेला मतदारसंघातील हस्तक्षेप पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे मागचे सगळे विसरून पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार की भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करत किंगमेकरची भूमिका बजावणार, याची उत्सुकता आता जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही ग्रामीण भागावर आपले वर्चस्व सिद्ध करणारी होती. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यापासून आक्रमक प्रचार व बेरजेच्या राजकारणावर भर दिला गेला होता. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या माण-खटाव मतदारसंघासह वाई, पाटण, कऱ्हाड उत्तर, खटाव या मतदारसंघातही लक्ष घातले होते. त्यांनी मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पाटणचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांना तर थेट आव्हान दिले होते. या नादात त्यांचे स्वत:च्या माण-खटाव मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले होते.
नेमका याचाच फायदा उठवत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील व मदत पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी माण तालुक्यात लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील गटांना ताकद दिली. परिणामी, माणमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद असूनही जयकुमार गोरेंना आपले बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नीचा व अरुण गोरे यांचा धक्कादायक पराभव पाहावा लागला, तसेच ज्या मतदारसंघात लक्ष घातले तेथेही त्यांच्या हाती काहीही लागले नाही. उलट स्वत: पंचायत समितीच्या सत्तेसाठी त्यांना ईश्वरी चिठ्ठीवर अवलंबून राहावे लागले आहे.
त्यामुळे भाजपचा आक्रमक प्रचार आणि बेरजेचे राजकारण त्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकलेले नाही. अकरा पंचायत समितींपैकी कऱ्हाड, खटाव आणि सातारा या तीनच ठिकाणी सत्ता मिळवता आली.
फलटण तालुक्यात राजे गटाला आपले अस्तित्व अबाधित राखण्यात या निवडणुकीत यश मिळाले. त्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ फायद्याची ठरली. विधानसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणारे विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना या निवडणुकीत जनतेने साथ दिली. त्यासाठी त्यांना कोयना दौलत या पालकमंत्र्यांच्या बंगल्यावरील बैठक जमेची बाजू ठरली. येथे रामराजेंच्या डावपेचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला झाला. त्यामुळे आता आगामी सत्ता समीकरणात आणि अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेताना रामराजेंची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.
यावेळच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले हे थोडे बाजूला राहिले; पण अखेरच्या टप्प्यात त्यांनी भाजपच्या काही उमेदवारांसाठी स्वत: गटात जाऊन आपली भूमिका कार्यकर्त्यांपुढे मांडली. त्याचा परिणाम कोडोली गटातील नीता खरात यांचा विजय ही महत्त्वपूर्ण ठरला. आता त्रिशंकू परिस्थितीत भाजपची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोन्ही राजेंचे कार्ड वापरले जाऊ शकते. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर जबाबदारी देऊन शिंदेंच्या शिवसेनेची मनधरणीही केली जाऊ शकते. आजपर्यंत ज्या ठिकाणी सत्तेचा प्रश्न भाजपपुढे निर्माण झाला होता, त्या त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा फॉर्म्युला वापरला गेला आहे. त्यामुळे आता साताऱ्यातही यासाठी प्रयत्न केले जाणार का? याची उत्सुकता आहे.
जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी आम्ही महायुतीतील घटक पक्ष आपापल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असे सर्वजण सांगत आहेत; पण प्रत्यक्षात जिल्ह्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेते पहिल्यापासून आग्रही आहेत. आता ते वरिष्ठांचे किती ऐकणार? हा मुद्दा गौण असला तरी जिल्ह्यात हातात येणारी सत्ता सोडण्यास कोणीही तयार होणार नाही. त्यामुळे ऐनवेळी वरिष्ठांचे निर्णय बाजूला ठेवत राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतील. तसे झाल्यास २७ जागा जिंकूनही भाजपला जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. जिल्ह्यात दोन मंत्री असलेल्या भाजपला हे सहन होणार का? हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.
भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून एकला चलोचा नारा दिला होता; पण त्यांचा हा नारा त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकलेला नाही. महायुतीतील घटक पक्षांना डिवचलेले असल्याने त्यांचा रोष कायम आहे. त्यांची मनधरणी इतकी सोपी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत बहुमत करू शकतात. त्यासाठी आता पुन्हा एकदा पालकमंत्री शंभूराज देसाई व रामराजे नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील यांना एकत्र बसावे लागणार आहे. त्यातूनच जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राखण्यात या नेत्यांना यश मिळेल, तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सोपे होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.