Sharad Pawar : एकनिष्ठ नेते-कार्यकर्ते घडविण्याचे शरद पवारांपुढे आव्हान!

Sharad Pawar News : शरद पवार यांनी राज्यात दिग्गज नेते तयार केले. मात्र, या दिग्गज नेत्यांनी दुसरी फळी तयार करण्यास उत्सुकता दाखवली नाही. कारण...
sharad pawar
sharad pawar sarkarnama
Published on
Updated on

सध्या सत्तेच्या राजकारणात पक्ष रुजविणे, संघटना बांधणे, कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया कमी झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी ज्या पद्धतीने पक्ष, संघटना, नेतृत्व तयार केले त्याची उणीव भरून काढणे, हे मोठे आव्हान आहे. एकनिष्ठ कार्यकर्ते आणि कुशल नेतृत्व तयार करण्यासाठी, पक्षातील ज्येष्ठांना कंबर कसावी लागणार आहे. अन् खरे तर हेच पुढचे आव्हान आहे.

शरद पवार यांनी काँग्रेसशी ( Congress ) फारकत घेत 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या पक्षासाठी त्यांनी तरुण नेत्यांची मोठी फौज उभी केली. या तरुणांना आमदार, खासदार, मंत्री केले. कोणाला महामंडळावर संधी दिली. तर, कोणाला साखर कारखानदार करत पक्षाची पाळेमुळे रुजविण्याचा प्रयत्न केला. शरद पवार हे या सर्वांचे राजकीय गुरू.

त्या काळचे हे पस्तीस-चाळीशीचे सर्व तरुण शिष्य आता साठीत पोहोचले आहेत. तरीही पवारांसारखे शिष्य घडवण्याची धमक आणि क्षमता कोणी अपवादानेही दाखवू शकलेला नाही, हे वास्तव आहे. आता तर 'रेडिमेड' कपड्याप्रमाणे नेतृत्त्वही इतर पक्षांतून आयात करणारी राजकीय संस्कृती उदयास आली आहे. 'जिकडे सत्ता तिकडे गर्दी' असे चित्र काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे.

पवार शिष्यांनी शिष्य घडवले नाहीत

शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राज्याला आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, दिग्विजय खानविलकर, हसन मुश्रीफ यांच्यापासून राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या सारखे दिग्गज नेते दिले. पवार यांच्या करिष्म्याने ही संख्या वाढतच गेली. महाराष्ट्रात सर्वाधिक तरुण नेत्यांची फौज केवळ ‘राष्ट्रवादी‘कडे असल्याने, राज्याच्या राजकारणात त्यांचा कायमच दबदबा राहिला. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य असलेल्या शरद पवार यांनी गुरू-शिष्य परंपरा चालू ठेवली. मात्र, पवार यांच्या शिष्यांनी पुढे या परंपरेला हरताळ फासला, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

sharad pawar
Sharad Pawar : 'वस्तादा'ची साथ सोडलेले दोन्ही दिग्गज नेते अडकले चक्रव्यूहात

या नेत्यांनी त्यांच्या खालोखाल राजकीय फळी तयार करण्यास फारसे प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. यापैकी अनेक नेत्यांनी जाणीवपूर्वक दुसरी फळी तयार होऊ दिली नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पवारांच्या शिष्यांनी स्वतःभोवतीच राजकारण फिरते ठेवले. मागे पुढे शिष्यच वरचढ होईल, अशी भीती त्यामागे असण्याची दाट शक्यता आहे. पवारांच्या तालमीत तयार झालेल्या एकाही शिष्याने आपली जागा योग्यवेळी रिकामी करून, केंद्रीय राजकारणात प्रवेश केला नाही. त्यामुळे तालुक्याला क्षमता असणाऱ्या अनेक नेत्यांचा उदय होण्यापूर्वीच अस्त झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या या सत्तेच्या राजकारणात पक्ष रुजविणे, संघटना बांधणे, कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया कमी झाली आहे. किंबहुना यात कोणाला रस राहिल्याचे दिसत नाही. धनदांडगे आणि धाकदपटशा-गुंडगिरी (मसल पॉवर) असणाऱ्यांची राजकारणात चलती आहे. पुढारी आयात करण्यावर सर्वच पक्षांचा भर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसही अपवाद नाही. त्यामुळे पवारांनी ज्या पद्धतीने पक्ष, संघटना, नेतृत्व तयार केले, त्याची उणीव भरून काढणे हे मोठे आव्हान आहे. एकनिष्ठ कार्यकर्ते आणि कुशल नेतृत्व तयार करण्यासाठी, पक्षातील ज्येष्ठांना कंबर कसावी लागणार आहे, अन् खरे तर हेच पुढचे आव्हान आहे.

sharad pawar
Mahavikas Aghadi News : आपल्या यशात महाविकास आघाडीचाही वाटा हे काँग्रेस नेते विसरलेत जणू!

मुलांचे बस्तान बसवण्यावर भर!

सध्या अस्थिरतेच्या काळात राजकीय बस्तान बसवणे दिग्गज नेत्यांनाही कठीण झाले आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोरच मुलांना राजकारणात स्थिरस्थावर करण्यास बहुतांश नेत्यांचे प्राधान्य आहे. परिणामी वेळ प्रसंगी पक्ष आणि निष्ठा गुंडाळून सत्तेसाठी आपल्या मुलांना कोणाच्याही पायावर घालण्यास ते प्राधान्य देत आहेत. लोकसभा निवडणुकीत तशी चाचपणीही काही नेत्यांनी करून पाहिली असल्याचे दिसले.

पवारांकडून कान टोचणे राहून गेले..

शरद पवार यांनी नेहमीच पक्षातील नेत्यांना सत्तेचे राजकारण शिकवले. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर या नेत्यांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. बहुमत नसेल तर कधी सत्तेत जाऊन, कधी बाहेरून पाठिंबा देऊन, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सत्तेसोबत राहण्याचे प्रयत्न केले. तसेच ‘निवडणुकीतून सत्ता आणि सत्तेतून पैसा’ असे समीकरण तयार झाले. कधी तरी पवार यांनी या सर्व सत्ताधीशांना या सर्वांचे कान पकडणे-कान टोचणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. राजकीय षडयंत्र म्हणून जरी केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला. तरी त्यातून कोणी, कसा आणि किती पैसा मिळवला याची माहिती पुढे आली. अनेकांनी अगोदरच तलवारी म्यान करत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची अवस्था सध्या 'झाकली मूठ...' अशी आहे.

नेमके काय घडले?

  • शरद पवार यांच्या शिष्यांकडून गुरू-शिष्य परंपरेला हरताळ

  • अनेक नेत्यांनी जाणीवपूर्वक दुसरी फळी तयार होऊ दिली नाही

  • आपापल्या जिल्ह्यात स्वतःभोवतीच राजकारण फिरवत ठेवले

  • यामुळे क्षमता असलेल्या अनेक नेत्यांचा उदयापूर्वीच अस्त

  • अन्य पक्षांतून आयात सत्तेचे वाटसरू नेते बेभरवशाचे

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com