
पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भाकरी फिरवल्यानंतर पक्षात काही प्रमाणात चैतन्य आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. किमान विरोधी पक्षात असल्याचे भान पक्षातील काही नेत्यांना आले आहे, त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका काय असते, याचीसुद्धा जाणीव या नेत्यांना झाली आहे.
गेले अनेक वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाला चिकटून राहिलेले जयंत पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी होतीच, परंतु जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या पुड्या पद्धतशीरपणे भाजपच्या गोटातून सोडण्यात येत होत्या. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाबद्दल साशंकता होती. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष बदलून भाकरी फिरवल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. एका सामान्य घरातून आलेल्या आणि माथाडी कामगार म्हणून काम करताना त्यांचा नेता झालेल्या शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. त्यामुळे नेतृत्वाबद्दल सामान्य कार्यकर्त्याला एक प्रकारचा विश्वास वाटणे आवश्यक असते, तो विश्वास आता निर्माण झाला आहे.
माथाडी चळवळीशी थेट संबंध असलेल्या शशिकांत शिंदे यांनी निवडणुकांच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्यात त्यांना कधी यश आले, तर कधी अपयश. मात्र यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता त्यांनी चळवळ आणि राजकारण समांतर पातळीवर चालवले आहे. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. तळागाळातील जनतेच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीस अशा प्रकारचा अध्यक्ष उपयुक्त ठरू शकतो. त्यात जमेची बाजू म्हणजे सत्ताधारी पक्षांकडून शिंदे यांच्या विरोधात फार मोठा गैरव्यवहार किंवा घोटाळा याचा आरोप अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे ते कोणाच्या दबावाला बळी पडण्याची शक्यता फारच कमी असल्याने शरद पवार यांनी त्यांच्या नावाची निवड केली असावी.
शिंदे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर पक्षातील युवकांचे नेतृत्व असलेल्या रोहित पवार यांची कामगिरी लक्षणीय ठरलेली दिसत आहे. रोहित पवार यांच्याकडेही पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिल्याने त्यांच्या एकंदर जबाबदारीत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्याकडून सत्ताधारी पक्षाच्या मंत्री आणि अन्य नेत्यांचे त्यांनी सुरू केलेले वस्त्रहरण हा त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचेच लक्षण आहे. विशेष म्हणजे केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरू असतानाही रोहित पवार यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे धाडस दाखवले आहे.
महायुतीमधील मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना गैरमार्गाने सिडकोची जमीन एका व्यक्तीला परस्पर दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी नुकताच केला. त्यासंबंधीचे कागदपत्रेही त्यांनी माध्यमांपुढे सादर केली आहेत. त्याचबरोबर माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे कोकाटे यांना कृषिमंत्री पदावरून दूर करून अन्य खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. कोकाटे यांच्या विरोधात जनमताचा रेटा वाढल्यानेच अजित पवार यांना हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी त्याची सुरुवात रोहित पवार यांनीच केली होती.
पुण्यातील कोथरूड येथील विद्यार्थिनींना पोलिसांकडून दिल्या गेलेल्या अशोभनीय वर्तनाबद्दल त्या मुलींच्या बाजूने मध्यरात्री पोलिस ठाण्यात जाऊन यासंबंधी पोलिसांना जाब विचारत, रोहित पवार यांनी थेट गृह खात्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतचोरीप्रकरणी पक्षाच्या वतीने रोहित पवार यांनीच विषय लावून धरला आहे. त्याचबरोबर आता राज्यभर सर्वेक्षण करून मतदार याद्यांची पोलखोल करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेत रोहित पवार यांनी विरोधी पक्ष असल्याचे भान अन्य नेत्यांनाही दिले आहे.
रोहित पवार आरोप करीत असलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्या मंत्री किंवा आमदारांचाच समावेश असल्याने महायुतीमधील केवळ या दोनच पक्षांच्या मंत्र्यांना लक्ष्य करीत असल्याचा संशय येण्यास वाव आहे. कारण त्यांनी भाजपच्या नेत्यावर अशा पद्धतीने गंभीर आरोप केल्याचे अद्याप दिसलेले नाही. अपवाद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आहे. मात्र तरीही त्यांनी ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांना अंगावर घेण्याचे काम सुरू केले आहे ते वाखाणण्यासारखेच आहे. भविष्यात त्यांच्या टीकेच्या यादीत भाजपचे नेतेही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षात भाकरी फिरवल्यानंतर पक्ष जोमाने कामाला लागल्याचे दिसत असले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार कितपत साथ देतात, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.