Shiv Sena Foundation Day : शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा उजवे!

Shiv Sena 58th Anniversary Special Analysis : इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेताना काँग्रेस शिवसेनेचे जवळचे संबंध आणि भाजप सेनेचे तत्कालीन आणि आजचे राजकीय संबंध यांचा आढावा .
Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

हर्षल प्रधान

Shiv Sena Foundation Day Special Story : " शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक राजकीय तडजोडी केल्या. अगदी काँग्रेसला थेट पाठिंबा देण्यापर्यंत ते आणीबाणीला समर्थन करून शिस्तपर्व म्हणण्यापर्यंच्या भूमिका घेतल्या.

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही भाजपने जेव्हा त्यांना राजकीय व्यवस्थेतून उखडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राजकीय धोबीपछाड देत काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेचा डाव मांडला आणि भाजपला शिवसेनाच आव्हान देऊ शकते हे दाखवून दिले.

आजच्या भाजपने त्यांच्याबद्दल आगपाखड करण्याऐवजी त्यांच्या राजकीय कूटनीतीचा अभ्यास करून त्यांच्या दूरदृष्टीला सलाम करायला हवा. कारण भाजपचे नवोदित शीर्षस्थ नेतृत्व हे भाजपच्या विरोधातील राजकीय पक्षांना संपवण्याचा खेळ खेळत आहेत हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आले आणि इतकंच नाही तर भाजपमधील महत्वाकांक्षी नेतृत्वही या नवीन जोडीला संपुष्टात आणायचे आहे हे देखील त्यांनी जाणले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा न्याय हक्क यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. शिवसेना, शिवसैनिक आणि महाराष्ट्र हाच त्यांचा श्वास असेपर्यंत एकमेव विषय राहिला.

मुंबई महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या आड कोणी येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या शिवसेनेची एक जबरदस्त तटबंदी निर्माण केली. सुरुवातीला 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या मूलमंत्रावर निर्माण होऊन इतिहास रचणारी शिवसेना पुढे पुढे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातील एक अविभाज्य भाग बनू लागली.

शिवसेनेचं शिवसेनाप्रमुखांच्या मताला महत्व प्राप्त होऊ लागले आणि शिवसेना राजकारणात अधिक सक्रिय होत गेली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक राजकीय तडजोडी केल्या. अगदी काँग्रेसला थेट पाठिंबा देण्यापर्यंत ते आणीबाणीला समर्थन करून शिस्तपर्व म्हणण्यापर्यंच्या भूमिका घेतल्या.

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही भाजपने जेव्हा त्यांना राजकीय व्यवस्थेतून उखडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजकीय धोबीपछाड देत काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेचा डाव मांडला आणि भाजपला शिवसेनाच आव्हान देऊ शकते हे दाखवून दिले.

Balasaheb Thackeray
Shiv Sena Foundation Day 2024 : मराठी माणूस बाजूला पडला होता, बाळासाहेबांनी न्याय मिळवून दिला

बाळासाहेब आणि काँग्रेस

शिवसेना स्थापन कशी झाली याचा इतिहास आता सर्वश्रुत आहे. मार्मिकमुळे शिवसेना आणि शिवसेनेमुळे सामना असा प्रवास प्रसारमाध्यमातून अनेकदा प्रसारित झाला आहे. त्या काळात माधव देशपांडे, वसंत प्रधान हे बाळासाहेबांचे सहकारी अधिक सक्रिय होते.

वसंत प्रधान यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असल्याने कामगारांच्या न्यायालयीन अडचणी दूर करण्याच्या कामात ते बाळासाहेबांना मदत करत, केवळ राजकीय फायदा उपभोगण्यापेक्षा जनतेचे प्रश्न घेऊन त्यांना वाचा फोडण्याचे काम मार्मिक आणि शिवसेनेकडून होत असे.

त्यातूनच काँग्रेस शासनाच्या विरोधातली आक्रमक भूमिका घेण्याचे कार्य शिवसेनेने सुरु केले. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मारोतराव कन्नमवार अशा तत्कालीन दिग्गज काँग्रेस नेत्यांना एकीकडे बाळासाहेब विविध विषय घेऊन आव्हान देत, प्रसंगी रस्त्यावर उतरत आणि शिवसेनेच्या मार्फत मराठी माणसाला भूमिपुत्राला न्याय मिळायलाच हवा यासाठी आग्रही राहत.

पण त्याच बरोबर यशवंतराव चव्हाण, बॅरिष्टर रामराव आदिक, बॅरिष्टर अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले, मुरली देवरा अशा अनेक काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंधही होते.

Balasaheb Thackeray
Shiv Sena Foundation Day : शिवसेना ठाकरेंचीच! फुटीनंतर कौल उद्धव यांना; एकनाथ शिंदे यांना दिलासा अन् इशारा !

शिवसेनेच्या पहिल्या सभेत व्यासपीठावर काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते बॅरिष्टर रामराव आदिक होते हे अनेकांना माहित आहे. बाळासाहेबांनी शिवसेना सुरु केल्यावर अनेकांनी त्यांचा वसंतसेना म्हणून टर उडवून ह्यांचे भवितव्य फारसे नाही अशी रेवडी उडवली होती. मात्र बाळासाहेबांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

उलट जेव्हा मुंबईतली इतर भाषिकांना नोकऱ्या देणारी कार्यालय आणि त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व दाखवणारे मोठे अधिकारी यांच्या कानशिलात शिवसेनेचा प्रसाद पडायला लागला तेव्हा शिवसेना काय आहे ते हळूहळू सगळ्यांना कळले.

बाळासाहेब, रजनी पटेल, मुरली देवरा आणि इंदिरा गांधी

काँग्रेसचे तत्कालीन मुंबईचे मोठे नेते होते रजनी पटेल. यांनी शिवसेनेवर बंदी आणावी असा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावामागे शिवसेनेची वाढती ताकद आणि निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा होणारा दमदार प्रवेश हे एक कारण होतेच पण आणखी एक कारण होते.

ते म्हणजे बाळासाहेबांचे बॉलिवूडमध्ये वाढत जाणारे प्रस्थ. कन्नडिगांना विरोध करत 'उठाव लुंगी, बजाव पुंगी'चा नारा देत बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कावर जो जो गदा आणेल त्याला त्याची जागा दाखवायची हे धोरण ठरवले होते . त्यामुळे त्यात मराठी माणसाच्या विरोधात असणारे सगळेच बाळासाहेबांच्या रोषाला कारणीभूत ठरू लागले.

काही चित्रपटांची चित्रीकरण शिवसैनिकांनी बंद पाडली तर काही सिनेमांना चित्रपट पडद्यांवरून खाली उतरवले त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज बाळासाहेबांचे चाहते झाले आणि त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या छत्रछायेखाली येऊ लागले त्याचा परिणाम काँग्रेसच्या तत्कालीन काही नेत्यांच्या त्रासास कारणीभूत ठरला आणि रजनी पटेल यांनी शिवसेनेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव ठेवला. इंदिरा गांधीजींनी मात्र रजनी पटेल त्यांच्या विश्वासातले असूनही बाळासाहेब आणि शिवसेनेच्या कार्याबाबत खरी माहिती जाणून घेतली आणि रजनी पटेल यांचा प्रस्ताव धुडकावला.

बाळासाहेबांची व्यक्तिशः भेटही घेतली आणि त्यांचे कार्य जाणून घेतले . त्यानंतर बाळासाहेबांनीही मुरली देवरा याना थेट महापौर पदी बसवून आपल्या मैत्रीची चुणूक दाखवून दिली. त्याकाळात काँग्रेसच्या नेत्यांची आपापसात विळ्याभोपळ्या सारखी सख्य असत त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणातही होत असे. बाळासाहेबांनी मात्र व्यक्तिगत संबंध आणि राजकारण यात अंतर ठेवले आणि ते कायम जोपासलेही.

Balasaheb Thackeray
Shiv Sena Foundation Day 2024 : मराठी माणूस बाजूला पडला होता, बाळासाहेबांनी न्याय मिळवून दिला

बाळासाहेब आणि हिंदुत्व

बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाला भूमिपुत्राला प्रथम न्याय हे आपल्या राजकारणाचे सूत्र ठेवल्यामुळे पुढे पुढे काँग्रेससोबत त्यांचे खटके अधिक उडू लागले. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला शिस्तपर्व म्हणणारे बाळासाहेबनंतर काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडून फेकण्यापर्यंतची टीका करू लागले.

अर्थात त्यास कारण इंदिरा पर्व संपल्यानंतरचा कालावधी, राजीव गांधी आणि त्यानंतरचा कालावधी अशी अनेक कारणे होती . त्याच कालावधीत आधी जनता पक्ष आणि मग भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांचा राजकारणात वाढलेला वावर आणि इतर अनेक बाबी कारणीभूत होता.

महाराष्ट्रात भाजपच्या प्रमोद महाजन नावाच्या व्यक्तीचे महत्व वाढले आणि अटलजींच्या विश्वासातील म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली. साहजिकच बाळासाहेब ठाकरे नावाच्या महान व्यक्तीला समजावण्याची ताकद महाजनन व्यतिरिक्त इतर कोणात नव्हतीच.

त्यामुळे भाजप हिंदुत्व या मुद्यावर शिवसेनेच्या जवळ आला आणि बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत झाला . बाळासाहेबांनीही हिंदुत्वासाठी भाजप सोबतच सतत राजकीय व्यूहरचना आखली आणि केंद्रात आणि राज्यात खऱ्या अर्थाने भगवा फडकावून दाखवला.

हिंदुत्वच्या आडून केवळ सत्तेच्या आट्यापाट्या खेळणारा बदललेला भाजप

भारतीय जनता पक्षात त्यांचे शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झाला. जनसामान्यांचा पक्ष अशी ख्याती असलेला भाजपाच्या लेखी हिंदुत्व हे केवळ आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या पुरते मर्यादित झाले आहे.

याउलट शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक राहिले आणि तळागळापर्यंत रुजले. भाजपने अनेक राजकीय पक्षांसोबत सरकारे स्थापली . ज्यामुळे त्यांचा अजेंडा केवळ सत्ताग्रहण इतकाच होता हे स्पष्ट झाले.

अगदी वंदे मातरम म्हणायला नकार देणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद , भाजपचा द्वेष करणाऱ्या मायावती , संघमुक्त भारत करण्याची घोषणा करणारे नितीश कुमार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील या उलट शिवसेना अगदी बाळासाहेबांपासून ते उद्धवसाहेंबांपर्यंत शिवसेनेने भाजपाला नेहमी सन्मानाची जागा दिली. अगदी तळहाताच्या फोडासारखे जपले आणि महाराष्ट्रात वाढवले देखील असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

पूर्वीच्या भाजपच्या नेत्यांनी अगदी अटलजी अडवाणी पासून प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे ते अगदी नितीन गडकरींपर्यंत सगळ्यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले ते त्यामुळेच.

मात्र भाजपच्या नवनियुक्त शीर्षस्थ नेत्यांनी भाजपने मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेला दिलेला शब्द फिरवल्याने महाराष्ट्रात एक अपरिहार्य राजकीय उलथापालथ झाली आणि अचानक भाजप कडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर संभ्रम आणि शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.

हिंदुत्वात त्यागाला अनन्यसाधारण महत्व

2014 साली मोदींना पंतप्रधान पदावर बसवल्यावर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने सोबत युती का तोडल्या गेली याचे उत्तर देण्यासाठी भाजपकडे आजही तोंड नाही. जवळजवळ तीन दशके भाजपला चांगल्या वाईट काळात सदैव पाठिंबा देणारी शिवसेना भाजपला स्वतःचे भविष्य उज्जवल दिसत असतांना नकोशी झाली. हा इतिहास भाजपला बदलता येणारा नाही.

आजच्या पेक्षा दिग्गज तत्कालीन भाजप नेत्यांसमवेत शिवसेना आणि मातोश्रीने कौटुंबिक संबंध जोपासले. भाजपात आलेल्या नवीन नेतृत्वाच्या राक्षसी महत्वाकांक्षांच्या पुढे 2014 नंतर क्षणात शिवसेना अचानक परकीय ठरु लागली. शिवसेनेची गरज ही केवळ सत्तेसाठी इतकी मर्यादित करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला. शिवसेनेच्या नेतृत्वातले महाविकास आघाडी सरकार उलथवून लावण्याचे षडयंत्र याच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने केले हे लपून राहिलेले नाही.

हिंदुत्वात त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या भाजपात त्यागाचा लवलेशही दिसून येत नाही. कटकारस्थाने करुन येनकेन प्रकारे सत्ता मिळवणे ह्या एकमेव उद्देशाने भाजपची वाटचाल सुरु आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कसेही आणि काहीही करुन कुठल्याही थराला जाऊन ताब्यात घेणे हा ह्या षडयंत्राचा भाग.

हिंदुत्वाच्या नावाखाली धनाढ्य, भांडवलदारांच्या घशात प्रगत मुंबई आणि महाराष्ट्र घालणे हा एकमेव उद्देश आहे. हिंदुत्वाच्या नावाने भांडवलदारांच्या अपेक्षा पूर्ण करुन स्वतःचे आर्थिक हित साध्य करणे हा एकमेव हेतू यामागे आहे. एका प्रकारे केवळ राजकीय आणि आर्थिक आप्तस्वकीयांच्या उत्कर्षासाठी केंद्रीय भाजपचा डोळा मुंबई महाराष्ट्रावर आहे.

Balasaheb Thackeray
Legislative Council Election : महायुती की मविआ कोण ठरणार 'किंग'; दादा अन् शिंदेंचे आमदार फुटणार?

उध्दव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या त्यागाची परंपरा कायम ठेवली

सुसंस्कृत, शालीन उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्वाच्या त्यागाची परंपरा कायम ठेवली. राज्याचे प्रमुख म्हणून इतक्या मोठ्या पदाचा सहजतेने त्याग करतांना उध्दव ठाकरेंचा त्याग हा भाजपच्या सत्तेच्या लालसेचा खरा चेहरा उघडा करुन गेला. मुख्यमंत्र्याचे मोठे पद स्वीकारुन अडीच वर्षांनी त्याचा सहज त्याग करतांना उध्दव ठाकरे अधिक मोठे भासत होते.

देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून गणना होऊनही त्याचा कोणताही अहंभाव उद्धव ठाकरे यांच्या वागण्या बोलण्यात कधीच जाणवला नाही, मुख्यमंत्री पदाचा मोह त्यांना कधी शिवला नाही, ते उलट सांगत आले मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतही नाही.

दुसरीकडे मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते असे म्हटल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भाजपने मोहाची परंपरा कायम ठेवली तर उध्दव ठाकरेंनी त्यागाची ठाकरे कुटुंबाची परंपरा जपली हा भाजप आणि उध्दव ठाकरेंच्या वर्तवणुकीतील मोठा फरक आहे.

वर्षा ते मातोश्री उध्दव ठाकरेंचे साश्रु नयनांनी झालेले स्वागत नव्या छोटेखानी शपथविधीपेक्षा अधिक दिमाखदार आणि तेजस्वी ठरले. अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि भाजपने उभ्या केलेल्या अनैसर्गिक आपत्तींना सामोरे जात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाईल.

शेतकरी कर्ज मुक्ती, कोरोना काळातील मुख्यमंत्री म्हणून दिसलेला सेवाभाव, पर्यावरण क्षेत्रातील हरित क्रांतीच्या दिशेने घेतलेले अनेक निर्णय, पुरातन मंदिरांचे संवर्धन इत्यादी अनेक निर्णय आणि जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दि.बा पाटील ही नामांतरे उध्दव ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर हिंदुत्वाचे भगवे शिक्कामोर्तब करणारी ठरली.

Balasaheb Thackeray
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुंबईत ठाकरे की शिंदे, आवाज कुणाचा?

लोकशाहीत डोकी मोजण्याची परंपरा भाजपने कायम ठेवली. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो आणि अनपेक्षितपणे पद त्यागतो आहे हे उध्दव ठाकरेंचे विधान सामान्यांच्या काळजाचा ठाव घेणारे होते. त्यातून केवळ आणि केवळ उध्दव ठाकरेंच्या मनातील स्वच्छ, निरागस आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन अवघ्या देशाला घडले. मुख्यमंत्री पदावर असूनही नगर विकास मंत्रालयाचा कारभार आपल्या सहकाऱ्यास म्हणजेच एकनाथ शिंदेंना देण्याचे मोठे मन उध्दव ठाकरेंनी दाखवले.

दुसरीकडे महाराष्ट्र भाजपातील माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाने दिलेली वागणूक राज्य भाजपाला अधिकच निराशेच्या गर्तेत घालणारी ठरली. विविध विषयांचा व्यासंग असलेल्या फडणवीसांना दुय्यम दर्जाचे पद देऊन जे मुळात संविधानात अस्तित्वातच नाही असे उपपद देऊन भाजपने (BJP) स्वत:च्याच निष्ठावंताचे खच्चीकरण कसे करायचे त्याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद करणारे ठरले.

राज्य भाजपात अगोदरच बाहेरून आलेल्या उपऱ्यांकडून निष्ठावंतांची उपेक्षा सुरु असतांना फडणवीसांची केंद्रीय नेतृत्वाच्या लेखी त्यांचे मूल्य किती हे दाखवण्याची आयती संधी मिळाली आणि ती साध्य करण्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कुठलीही तमा ठेवली नाही.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने दोन पावले पुढे

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने दोन पावले पुढेच टाकली आहेत. 2014 आणि 2019 च्या निवडणुकांतील अनुक्रमे 63 आणि 56 आमदार हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निवडून आले तसेच मुंबई , ठाणे , कल्याण डोंबिवली या महानगरपालिका गेल्या पाच वेळा उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात निवडून आणल्या शिवसेनेने. त्यामुळे येणार्‍या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला उत्तरोत्तर अधिक उंची गाठून देतील यात कोणतीही शंका नाही.

बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही देशातील नेत्यांना आपलेसे केले ..

काँग्रेसचं आजचे राजकारण आणि ते करणारे नवे नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित झालेले पाहायला मिळाले , शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या तोंडून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय इतकंच नव्हे तर प्रशासकीय कौशल्याबाबत प्रशंसा निघणे हे काही साधे नाही. सोनिया गांधी राहुल गांधी. यांनी मुंबईतील इंडिया बैठकी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कौशल्याचे विशेष कौतुक केले.

देशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे फारुख अब्दुल्ला हे देखील उद्धव ठाकरे यांच्या राजकीय रणनीतीला सलाम करत म्हणले लढते राहा आपल्या वडिलांचं नाव असेच पुढे न्या, ममता बॅनर्जीं , स्टॅलिन, लालू प्रसाद यादव यांच्या सारख्या दिग्गजांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करणे ही छोटी गोष्ट नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य आहे आणि येणाऱ्या काळात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही .

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते तथा जनसंपर्क प्रमुख आहेत.)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com