
शिवसेनेचा दसरा मेळावा राजकीय वर्तुळात आणि विशेषत: मुंबईत कायम चर्चेचा विषय असतो. त्यातच एकाच्या दोन शिवसेना झाल्यानंतर तर ही चर्चा अधिकच वाढली आहे. यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष होतेच. शिवसेना ठाकरे पक्षाचा मेळावा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये झाला. तर शिंदे यांच्या पक्षाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को इनडोअर ग्राउंडमध्ये पार पडला.
दसऱ्याच्या दिवशी मुंबईत सायंकाळी पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षाच्या मेळाव्याकडे कोणी फिरकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. शिवाजी पार्क मैदानही पाणी आणि चिखलाने भरलेले होते. मैदानात उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. मात्र त्याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा चांगली गर्दी झाली. यापूर्वीच्या दसरा मेळाव्याच्या तुलनेत ही गर्दी कमी असली, तरी पावसाला झुगारून ही जमलेल्या शिवसैनिकांची नोंद घ्यावीच लागेल. उद्धव ठाकरेंनी पावसात केलेले भाषण आणि शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय होता.
दसरा मेळाव्याला शिवसेना ठाकरे आणि मनसेची युती जाहीर होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित राहणार, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज ठाकरे शिवसेना ठाकरे पक्षाच्या व्यासपीठावर आले नाहीत. ते आले नसले तरी शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांच्या केंद्रस्थानी राज ठाकरेच होते हे विशेष.
शिवसेनेच्या व्यासपीठावर विशेषत: सभांमध्ये यापूर्वी राज ठाकरे यांचे नाव कायम टाळले जात होते किंवा नाव न घेता त्यांच्यावर टोमणेच मारले जात असे. यावेळी मात्र प्रथमच पक्षाच्या सार्वजनिक सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर राज यांचे नाव घेतले. राज दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार हे खोटे जाणीवपूर्वक पसरविण्यात आले होते, असे ते म्हणाले. पाच जुलैच्या मराठी मेळाव्याचा संदर्भ देत ते म्हणाले ‘एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी’ असे सूचक विधान करत मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
किमान समान कार्यक्रमाच्या आधारे राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात. त्यामध्ये मराठी भाषा, मराठी माणूस आणि मुंबईच्या हिताच्या अजेंड्यावर एकत्र येण्यासाठीचा आधार घेत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. ‘मातृभाषेचा घात होत असेल तिथे मराठी माणसांत फूट पडू देणार नाही,’ असे स्पष्ट संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या सभेत खासदार संजय राऊत यांनी, ‘या शिवतीर्थाच्या पलिकडे जे ‘शिवतीर्थ’ (राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानाचे नाव) आहे, ते आपलेच समजा,’ असे सूचक विधान केले. त्याला शिवसैनिकांकडून प्रतिसाद मिळाला.
शिवसेना ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप पक्षांतर्गत कुठे-कुठे ताकद आहे, याविषयी चाचपणी सुरू आहे. शिवाय मुंबई महापालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असल्याने युतीची घोषणा लांबणीवर टाकण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही पक्षांमधील घरोबा वाढू लागल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमधील दुरावा कमी होऊ लागला आहे.
दसरा मेळाव्यासाठी सकाळपासून शिवाजी पार्कवर येणाऱ्या शिवसैनिकांना यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी घरातून बाहेर पडून मिठाईचे वाटप केले. सायंकाळी दसरा मेळाव्याची सभा सुरू असताना घराच्या गॅलरीत उभ्या असलेल्या शर्मिला शिवसैनिकांना उत्साहाने हात उंचावून प्रतिसाद देताना दिसल्या. शिवाय दसरा मेळाव्यानंतर चार दिवसांनी खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला राज आणि उद्धव एकत्रित उपस्थित राहिले होते. राज आणि उद्धव यांच्या वाढलेल्या भेटी या एकमेकांविषयीची अढी कमी होत असल्याचेच निदर्शक आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि राज ठाकरे याच्या युतीच्या शक्यतेवर कडवट इशारा दिला आहे. ‘कोणाचे कोणासोबतही मनोमिलन होऊ द्या. त्याचा सामना करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,’ असा उल्लेख त्यांनी केला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा फटका शिंदे यांच्या पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मराठी मते विभागली जाऊ नयेत, म्हणून उद्धव आणि राज एकत्र येत आहेत असा एक तर्क आहे. उद्धव आणि राज यांच्याकडे मराठी मते आकर्षित झाली, तरी मोठ्या प्रमाणात शिंदेंमुळेही मराठी मते भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्याकडे जाणारे किती मतदान शिंदे रोखू शकतात, यावर त्यांची मुंबईतील ताकद दिसून येणार आहे.
मराठी मते अधिक हिंदी भाषिक मतांच्या बेगमीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढवल्यानंतर मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांची छबी सुधारली आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना प्रतिसाद दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसशिवाय मनसेसोबत आल्याने मुस्लिम मतदार ठाकरेंपासून दुरावण्याची शक्यता आहे. मात्र तसे होऊ नये याची खबरदारी ठाकरे घेत आहेत.
भाजपकडून ‘ठाकरेंची सेना निवडून आल्यास खान मुंबईचा महापौर होऊ शकतो,’ असा प्रचार केला जात आहे. त्याचा समाचार ठाकरेंनी घेतला. ‘हिंदुत्वावरून तुम्ही आमच्या अंगावर येऊ नका. सैन्यदलातील अधिकारी सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान्यांची बहीण असल्याचे भाजपचे आमदार बोलतात, ती सोफिया कुरेशी आमची बहीण आहे. गुजरातमध्ये बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना जे तुरुंगातून सोडतात, क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो बेशरम आहे,’ असा घणाघात करत ठाकरे यांनी उत्तर दिले. राज ठाकरेसोबत आल्यानंतरही मुस्लिम समाजाविषयी भूमिका बदलणार नसल्याचेच उद्धव यांनी स्पष्ट करून टाकले आहे.
शिवसेना शिंदे यांचा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या भाषणापेक्षाही पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनी गाजला. रामदास कदम यांनी यापूर्वीही उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर खालच्या पातळीवरचे आरोप केले आहेत. यावेळी मात्र त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या घटनेवर संशय उपस्थित करत वादळ निर्माण केले आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवला, त्यांच्या बोटांचे ठसे घेतले,’ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शिवाय त्यावेळी स्वत: उपस्थित होतो, असा त्यांचा दावा आहे. कदमांना या घटनेची आठवण आता १३ वर्षानंतरच का झाली? उद्धव ठाकरे यांच्या या कृत्याला त्यांनी त्याचक्षणी विरोध का केला नाही, २०१४ मध्ये युतीचे सरकार आले त्या सरकारमध्ये मंत्रिपद कसे स्वीकारले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अर्थात त्याचे उत्तर कदमांना द्यावी लागणार आहेत. कदमांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार अनिल परब यांनी दिला आहे. रामदास कदमांनी करून ठेवलेल्या चिखलात परब यांनी कदमांसह त्यांच्या कुटुंबालाही ओढले. काही वर्षांपूर्वी कदमांची बायको कशी होरपळली? खेडमध्ये बांधलेल्या बंगल्यात कोण राहत होते, असे प्रश्न उपस्थित करत पलटवार केला. तसेच या हिवाळी अधिवेशनात कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात धक्कादायक माहिती सभागृहासमोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवसेना उभी करण्यात रामदास कदम यांचे योगदान नाकारता येणार नाही. मात्र, शिवसेना फुटीनंतर कदमांनी पुढाकार घेऊन ठाकरे कुटुंबांवर आरोप सुरू केले. पुराव्यांशिवाय स्फोटक आरोप केल्यावर सुरुवातीला ते गंभीरपणे घेतले जातात, नंतर त्यांच्यातील गांभीर्य कमी होते. कदमांच्या बाबतीतही तसेच झाले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची दखल फारशी घेतली गेली नाही. प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी त्यांना नवीन मार्ग यापुढे शोधावे लागणार आहेत.
शिवसेनेचा मूळ पिंड हा रस्त्यावर उतरून थेट मदत करणाऱ्या कार्यकर्त्याचा आहे. मराठवाड्यात महापूर आल्यानंतर पुराच्या डोहामध्ये उतरून मदत करणाऱ्यांमध्ये शिवसैनिक पुढे होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनीही मराठवाड्याचा दौरा केला. पूरग्रस्तांच्या भेटीला जाताना शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक मदत घेऊन जायला आणि मदतीच्या पिशव्यांवर स्वत:चे फोटो लावायला विसरले नाहीत. त्यामुळे एका गावात त्यांची मदतही नाकारली गेली. माध्यमांमधूनही शिवसेना शिंदे पक्ष खूप मोठ्या प्रमाणात ‘ट्रोल’ झाला. मराठवाडा कायम शिवसेनेच्या मागे उभा राहिल्याचे दिसते. यावेळी शिवसेनेचे खासदार-आमदारही पूरग्रस्तांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिले. पुराचा सर्वाधिक फटका धाराशिवला बसला आहे.
धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी पुराच्या पाण्यातून एका कुटुंबाला वाचवले. हा एकच किस्सा सर्वत्र चर्चेला जात असला तरी पूरग्रस्तांना निंबाळकरांनी दिवसरात्र मदत केल्याने त्यांना वाखाणले गेले. ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर आंदोलन सुरू केले. यापुढच्या काळात पूरग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळावी यासाठी विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी भूमिका बजवावी लागणार आहे. तर शिवसेना शिंदे पक्षाला सत्तेचा वापर करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात द्यावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.