Shivsena Politics : शिवसेना अर्धशतक ठोकणार की शतक?

Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभेला मिळालेल्या यशाने शिवसेना पुन्हा ताजीतवानी झाली आहे. आता राष्ट्रवादीला दूर ठेवल्यास आपल्या जागा वाढतील, असे शिंदे गटाला वाटते. परिणामी लाडकी बहीण असो की अर्थखाते. पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही.
Shivsena eknath Shinde group
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

लोकसभेला मिळालेल्या यशाने शिवसेना (Shivsena) पुन्हा ताजीतवानी झाली आहे. आता राष्ट्रवादीला दूर ठेवल्यास आपल्या जागा वाढतील, असे शिंदे गटाला वाटते. परिणामी लाडकी बहीण असो की अर्थखाते. पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही. अर्थखाते नालायक आहे म्हणण्यापर्यंत या पक्षाच्या नेत्यांची मजल गेली. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यशस्वी झाले आहेत. आज या पक्षाकडे ५० आमदार आणि सात खासदार आहेत. कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. तसेच भाजपच्या साथीने हा आकडा वाढण्याचा आत्मविश्वास शिंदे यांना वाटतो आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आजपर्यंत दोनचारच नेते बोलत होते. आता मात्र सगळेच मैदानात उतरताना दिसता आहेत. त्यांनी दारूगोळा बाहेर काढण्यास सुरवात केली आहे. शिंदे यांच्या पक्षाचे मुख्य लक्ष्य अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचा पक्ष असेल, असे दिसते. कोणत्याही परिस्थितीत पवार सत्तेत नसलेले बरे असे त्यांच्या नेत्यांना वाटत असावे पण, सत्तेत असले की तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो. अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ युतीत येईल, असे खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनाही वाटले नसेल. पण, ते घडून गेले आहे.

दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बंडखोरी केली. त्याला काही महत्त्वाची कारणे होती. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेली आघाडी. शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती होती. २५ वर्षांहून अधिक काळ हे दोन्ही पक्ष हातात हात घालून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाविरोधात लढत राहिले. १९९५ मध्ये ठाकरे-महाजन-मुंडे यांनी इतिहास घडवत युतीला सत्तेवर आणले. राज्यात कदापि युतीची सत्ता येणार नाही असे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. तसे मात्र झाले नाही. युतीच्या नेत्यांनी अशक्य ते शक्य करून दाखविले होते. हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजप आणि शिवसेनेची मैत्री घट्ट होती. ठाकरे-मुंडे-महाजन असेपर्यंत युती भक्कम होती.

२०१४ ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत सर्वकाही ठिकठाक होते. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. भाजप बहुमतात आला आणि महाराष्ट्रासह देशाचे राजकारणच पार बदलून गेले. महाराष्ट्रात तर भाजपला बहुमताने सत्तेत येण्याचे स्वप्न पडू लागले. पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली त्यानंतर युतीचेही तेच झाले. सगळेच स्वबळावर लढले. मॅजिक फिगरच्या प्रतीक्षेत बसलेल्या भाजप नेत्यांचा हिरमोड झाला. बहुमतापासून भाजपला मतदारांनी रोखले होते. शिवसेना विरोधी बाकावर बसली. तडजोडीनंतर पुन्हा युती सत्तेवर आली. त्यावेळी भाजपचे जे काही वागणं होतं ते जनतेला पसंत पडले नव्हते. ज्या मित्राने साथ दिली त्याने अर्ध्यात सोडली.

Shivsena eknath Shinde group
Maharashtra BJP Politics News : नागपूरचा दबदबा वाढला

अच्छे दिन येताच धोका दिला ही भावना शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंमध्ये होती. याचे उट्टे पुढे त्यांनी २०१९ मध्ये काढले. युतीला बहुमत असतानाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना किंमत दिली नाही. थेट दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. राज्यात आघाडी सत्तेवर आली. हा प्रयोग दोन वर्षे चालला.रिक्षा सरकार फार काळ कसे चालणार नाही याची व्यूहरचना भाजप आखत होता. आघाडीत त्यावेळी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्र्वासू नेते म्हणून ओळखले जात होते. बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला. बोटावर मोजण्या इतकेच आमदार ठाकरेंकडे राहिले. शिवसेना खिळखिळी करण्यात भाजपची मंडळी यशस्वी झाली.

पुढे शिंदे मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री बनले. इतपर्यंत ठिक होते. तोपर्यंत जनतेला ते मान्यही होते. पण, ज्यादिवशी महायुतीत अजित पवारांची एंट्री झाली तेव्हा खरा धक्का एकनाथ शिंदेंना बसला असेल. ज्या कारणासाठी ठाकरेंची साथ सोडली तेच पुन्हा घडत होते. ही महायुती जनतेला पसंत पडली नाही.

Shivsena eknath Shinde group
Maharashtra BJP Politics News : नागपूरचा दबदबा वाढला

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण रूचले नाही. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहाण्यास मिळाले. या निवडणुकीत मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून निश्‍चितपणे वजन वाढले. भाजपला जोरदार फटका बसला. जनतेची नाराजी ओढावून घेतली. संघाची मंडळी तर या मुद्यावर सडेतोड बोलतात. भाजपला (BJP) घरचा आहेर मिळतो आहे.

आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेला मिळालेल्या यशाने शिवसेना पुन्हा ताजीतवानी झाली आहे. त्यांनी भाजपपेक्षा आता थेट अजित पवार आणि त्यांच्यापक्षाला लक्ष्य केले आहे. लाडकी बहीण असो की अर्थखाते. पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही. अर्थखाते नालायक आहे म्हणण्यापर्यंत या पक्षाच्या नेत्यांची मजल गेली. जर राष्ट्रवादी विधानसभेला बरोबर राहिली तर नुकसान होईल अशी भीती कदाचित शिवसेनेला वाटत असावी. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यशस्वी झाले आहेत. ते या प्रतिमेचा फायदा उठवू पाहात आहेत. आज या पक्षाकडे ५० आमदार आणि सात खासदार आहेत. कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. तसेच भाजपची साथ असेल तर शहरीभागात बऱ्यापैकी जागा जिंकण्याचा त्यांना विश्र्वास वाटतो आहे.

महायुतीपेक्षा महाआघाडीच्या बाजूने लोक बोलताना दिसताहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट अजूनही ओसरलेली नाही. लाडक्या बहिणीला ओवाळनी दिली हे चित्र थोडे आशावादी होते. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजगडला कोसळला. त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात विशेषत: भाजपलाच उभे राहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर माफी मागावी लागली. बॅकफूटवर जावे लागले. हे सर्व मुद्दे निवडणुकीत गाजणार आहेत. महायुतीत मात्र जितके देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर टीका होते. सोशल मीडियात ट्रोल केले जाते त्या तुलनेत एकनाथ शिंदे होताना दिसत नाही. आजतरी शिवसेना प्रत्येक मतदारसंघाची बांधणी करीत आहे. जे आमदार आहेत ते टिकविण्याचे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी अर्थात शिंदे पितापुत्रांवर असेल हे नक्की!

Shivsena eknath Shinde group
Devendra Fadnavis: संभ्रमित कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे मोठे आव्हान

या आहेत जमेच्या बाजू

  • लोकसभा निकालांनंतर एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास वाढला

  • विधानसभेते अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना

  • शिंदे गटाकडून राज्यभरात शिवसेनेच्या मतदारसंघाची मजबूत बांधणी सुरू

  • मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात

  • प्रत्येक आमदाराला भरपूर निधी व कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात

  • शिवसेनेचे आमदार निवडून आलेल्या जागांवर शिंदे गट दावा करणार

  • महायुतीत अजित पवार नसतील तर शिंदे गटाला अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा

  • सोशल मीडियावर फडणवीस, अजित दादांच्या तुलनेत एकनाथ शिंदेवर टीका कमी

  • या सर्व राजकारणात सर्वांत गोची. महायुतीत सर्वाधिक नाराजी भाजपवर.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com